|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » राग दरबारी आणि बनारस

राग दरबारी आणि बनारस 

पुलंच्या पुस्तकातल्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ 1943 ते 1961 साली जन्माला आल्या. या पुस्तकासाठी पुलंना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यानंतरच्या पन्नास पंचावन्न वर्षात कोकण भरपूर बदलले. आपण बदलत गेलो. आज कोकणात हिंडताना त्या व्यक्ती, ते वातावरण आपल्याला भेटत नाही.

श्रीलाल शुक्ल हे त्याच कालखंडातले ख्यातनाम हिंदी लेखक. ‘राग दरबारी’ या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. कादंबरीत उत्तर प्रदेशातील तत्कालीन खेडे आणि त्यातली एकजात सगळी इरसाल माणसे विनोद-उपहासाची वस्त्रे चढवून सादर केली आहेत. शिवपालगंज नावाच्या खेडय़ात कामचुकार आणि गटबाजी करणारे प्राध्यापक, भ्रष्ट प्राचार्य, भ्रष्ट शिक्षण संचालक, सहकारी संस्थेतली खाबू माणसे, सरकारी कचेरीतले अमानुष बाबू, भरकटलेली तरुणाई, जातपातीची उतरंड, माणूस बघून टर्रेबाजी करणारे किंवा शेपूट घालणारे पोलीस, व्यवस्था बदलण्याचे स्वप्न बघणारा भाबडा आणि भित्रा रंगनाथबाबू, लाच न देता सरकारी कचेरीतून दाखला मिळवण्यासाठी दीर्घकाळ लढत राहणारा आणि त्यात शेवटी हरून खचून जाणारा केविलवाणा लंगड आपल्याला भेटतात. हे शिवपालगंज खेडे आहे तरी कसे? गावाकडे जाणारा हाय वे धुळीने माखलेला आणि खड्डय़ांनी भरलेला आहे. गावात वीज आहे नाही. कोणत्याही सोयी नाहीत. एकुलत्या पोलीस चौकीत फोन नाही, जीप नाही, मोडकेतोडके फर्निचर आहे. एफआयआर लिहायला कागद, पेन किंवा शाई देखील नाही. एकूण गावाची सगळी अवस्था अशीच. आणि कशाचा राग न कशाचा लोभ उरलेला स्थितिप्रिय असहाय समाज.

गेल्या आठवडय़ात काशीला गेलो तेव्हा राग दरबारी आणि त्यातले शिवपालगंज पुनः पुन्हा आठवत राहिले. फक्त दुकानदारांनी घेरलेल्या विश्वनाथ मंदिराकडे जाणारा अतिशय अरुंद रस्ता. पावलोपावली अडवणूक आणि लुबाडणूक करणारे अरेरावी दुकानदार. असहाय भाविक पर्यटक. व्यक्ती आणि वल्लीतले कोकण बदलले. शिवपालगंज केव्हा बदलेल?   गंगा देखील दूरवरून अतिशय सुंदर दिसते. तिचा पलीकडचा काठ आणि शुभ्रधवल पात्र इकडून एखाद्या साडीसारखे दिसते. मला अशोकवनातल्या सीतेची आठवण झाली. अशोकवनात शुभ्र वस्त्रातली सीता हिडीस राक्षसिणींच्या पहाऱयात रामाची आठवण काढीत खिन्न जगत होती. गंगेच्या तीरावर देखील असाच असंख्य संधीसाधूंचा पहारा आहे. अशोकवनातल्या सीतेप्रमाणे गंगा देखील खिन्न भासली.

गंगाजलाचे शुद्धीकरण कदाचित होईलही. पण तिच्याभोवतीचा पहारा कधी उठेल?

Related posts: