|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अतिरिक्त गुणांचा आदेश तिसऱयांदा बदलला

अतिरिक्त गुणांचा आदेश तिसऱयांदा बदलला 

दहावीसाठी सवलतीचे गुण, आता नवी कार्यपद्धती

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

शास्त्राrय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱया व लोककला प्रकारांत सहभागी होणाऱया विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबत याच वर्षभरात  यापूर्वी तीन शासन आदेश काढण्यात आले होते. मात्र, आता हे तिन्ही आदेश रद्द करण्यात आले असून 2017-18 या वर्षापासून या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत देण्यात येणाऱया सवलतीच्या गुणांची नवीन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रासाठी सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येणार असल्याने अकरावी प्रवेश देताना कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱया विद्यार्थ्यांना 2 टक्के जागा राखीव ठेवण्याची सवलत रद्द करण्यात आली आहे.

शास्त्राrय नृत्य, गायन व वादन यात ज्या विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त संस्थेच्या सलग तीन अथवा पाच परीक्षा दिल्या असल्यास ग्रेडनुसार द्यायचे गुण निश्चित करण्यात आले आहेत. यात 75 व त्यापेक्षा जास्त गुण असल्यास ए प्लस ग्रेड, 65 ते 75 टक्के गुण असल्यास व तीन परीक्षा दिलेल्या असल्यास कमाल 10, तर पाच परीक्षा दिलेल्या असल्यास कमाल 15 गुण, 55 ते 65 टक्केपर्यंत बी प्लस व तीन परीक्षा असल्यास 7 व पाच परीक्षा असल्यास 10 गुण, 45 ते 55 टक्के गुण असल्यास बी ग्रेड व तीन परीक्षा असल्यास अथवा पाच असल्यासही 5 गुण, तर 45 टक्केपेक्षा कमी गुण असल्यास सी ग्रेड व 3 गुण देण्यात येणार आहेत. पाश्चात्य नृत्याकरिता सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येणार नाहीत. ज्या संस्थेची परीक्षा देणार आहेत, ती संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करून पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी झालेली असली पाहिजे. तसेच संस्थेकडे मागील तीन वर्षांचा लेखा अहवाल आवश्यक आहे.

लोककला

लोककलेमध्ये प्रयोगात्मक प्रकारात किमान 50 प्रयोग सादर करणाऱया संस्थांना/ मंडळांना सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देण्यासाठी मान्यता देण्यात येणार आहे. त्यानुसार सातवी, आठवी, नववी व दहावी या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रयोगात्मक लोककला प्रकारातील सादरीकरणाबाबत अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत. 25 पेक्षा जास्त पण 5 पेक्षा कमी प्रयोग संख्या असल्यास 5, तर 50 पेक्षा जास्त प्रयोगसंख्या असल्यास 10 गुण देण्यात येणार आहेत.   या शैक्षणिक वर्षात राज्य शासनातर्फे राज्यस्तरावर घेण्यात येणाऱया बालनाटय़ स्पर्धेत वैयक्तिक प्राविण्य मिळविणाऱया विद्यार्थ्यांना प्रथम (सुवर्णपदक) 15 गुण, द्वितीय (रौप्यपदक) 10 गुण व तृतीय (कांस्यपदक) 5 गुण अतिरिक्त देण्यात येणार आहेत. चित्रपटासाठी राष्ट्रीयस्तरावर अभिनय प्रकार (वैयक्तिक) प्राप्त होणाऱया बाल कलाकाराला 10 अतिरिक्त गुण, तर राज्यस्तरावर पुरस्कार असल्यास बाल कलाकाराला 5 अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत.

भविष्यात लोककला क्षेत्रात काम करणारे अभ्यासक, संस्था व मंडळ यांनी प्रयोगात्मक लोककलासंदर्भात अभ्यासक्रम तयार करावा. हा अभ्यासक्रम तपासून प्रमाणीकरणाबाबतची यंत्रणा सांस्कृतिक कार्य विभागाने निश्चित करावी. याकरिता स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन करून गुणदान योजना ठरविण्यात येणार आहे.

चित्रकला

इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत ग्रेड ए प्राप्त विद्यार्थ्यांना 7, ग्रेड बी प्राप्त विद्यार्थ्यांना 5, ग्रेड सी प्राप्त विद्यार्थ्यांना 3 गुण देण्यात येणार आहेत. विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे गुण मिळणार नाहीत. एखादा विद्यार्थी क्रीडा, शास्त्राrय कला, चित्रकला व लोककलेतील सहभाग यापैकी एकापेक्षा जास्त क्षेत्रात प्रविण्य प्राप्त करीत असला, तरी कोणत्याही एकाच क्षेत्रात सवलतीचे अतिरिक्त गुण घेण्यासाठी अर्ज करता येणार आहेत. दहावीचे निकाल विहीत कालावधीत लावणे राज्य मंडळाला शक्य व्हावे, यासाठी शाळांकडून सवलतीचे गुण देण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहेत. यात 15 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेकडे प्रस्ताव सादर करायचे असून शाळांनी विभागीय मंडळाकडे 15 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करायचे आहेत. दहावीच्या नियमित परीक्षेसाठी प्रविष्ठ होणारा कोणताही विद्यार्थी या सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी पात्र असणार आहे.

Related posts: