|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » …नंतर उरल्या सुरल्यांनी कुणाला गुलाम करू नये!

…नंतर उरल्या सुरल्यांनी कुणाला गुलाम करू नये! 

कविवर्य . सो. शेवरे साहित्य जागर कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजेद्र मुंबरकर / देवगड:

नंतर उरल्या सुरल्याने कुणाला गुलाम करू नये, नाती मानण्याचा, आयाबहिणी ओळखण्याचा गुन्हा करू नये. माणसाने माणसाचे गाणे गावे..’ श्रेष्ठ मराठी कवी नामदेव ढसाळ यांच्या माणसावरच नितांत प्रेम करायचा संदेश देणाऱया अशा कविता ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांनी सादर केल्या आणि उपस्थितांमधून टाळय़ांचाच प्रतिसाद मिळत गेला. निमित्त होते, ते जामसंडे येथील नलावडे सभागृहात आयोजित कविवर्य . सो. शेवरे स्मृती साहित्य जागर संमेलनातील निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे!

नामवंत कवी भगवान निळे (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवी अजय कांडर, मधुसुदन नानिवडेकर, प्रा. मोहन कुंभार, अरुण नाईक आदींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कविसंमेलनात दिवसभर चाललेल्या या जागर साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे असलेल्या कवी काळसेकर यांनी ढसाळ, अरुण कोल्हटकर या जागतिकस्तरावर मराठी कवितेची दखल घ्यायला लावणाऱया कवींच्या कविता सादर केल्याच परंतुहे सगळे काही घडत आहे हे प्रथमच घडत आहे असे नाही, ही उभी असलेली अजस्त्र भिंत उभी आहे, ती ओलांडता येणार नाही असे नाही,’ अशी आजच्या असहिष्णूतेचा संदर्भ सूचित करणारी कविता सादर केली आणि या सगळय़ांवर संवेदनशील माणूस मात करू शकतो, असाही विश्वास व्यक्त केला!

राजवाडय़ातून तू ये बाहेर आता

सिद्धार्थ तांबे यांनी अर्थवाहीभाववाही सुत्रसंचालन केलेल्या या कविसंमेलनात निळे यांनी आपल्या वाढत्या वयाच्या मुलीत आणि आपल्यात वाढत जाणाऱया अंतराची भावना व्यक्त करीत सगळय़ाच बापांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘टीव्हीवर प्रणयदृष्य येताच आम्ही चुकवतो एकमेकांच्या नजरा, तिला कपडे तंग होऊ लागताच माझी वाढत जाते अनाहूत भिती, हल्ली माझी मुलगी कधीच होऊ नये मोठी असं वाटत राहतं,’ असे म्हणताच उपस्थितीतही धीरगंभीर झाले. मात्र, यावेळी नानिवडेकर यांनीराजवाडय़ातून तू ये बाहेर आता,’ अशी प्रेमविषयक भावना आपल्या गझलमधून व्यक्त केली आणि वातावरणात थोडा गारवाच निर्माण झाला.

आमची जमीन तेंका मिळा दे

प्रा. कुंभार यांनी आपल्या मालवणी कवितेतून आजच्या कोकणातील प्रकल्प ग्रस्तांच्याच कोंडलेल्या भावनांचा आक्रोश व्यक्त केला. मायनिंग, सेझ आदी प्रकल्पांचे संदर्भ देत सादर केलेली कविता ऐकताना प्रकल्पग्रस्तांच्या मनातील भयावहता प्रकट झाली, तीआराड गे बेंडके सांज जांव दे, घराकडल्या डोंगराक मायनिंग येंवदे, आमच्या गावात सेझ येवंदे, ऊर्जेचो प्रकल्प नांदा दे, आमची जमीन तेंका मिळां दे,’ अशा काव्यपंक्तीतून. मात्र, राजेश कदम यांनीअंधार वर्तुळातील एकेक कप्पा उलगडत जाताना, तू कोरत होतास सोनेरी किरणांची नक्षी, तेव्हा झाडांच्या अर्धमिटल्या पापण्यांमधून झेपावत गेले किलबिलते पक्षीअसा बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा आदरभाव कवितेमधून व्यक्त केला आणि पुन्हा सभागृहात चैतन्य फुलत गेले.

घर आणि घर वाचवू पाहतोय

कांडर यांनी आजच्या असहिष्णू संदर्भातीलतुम्ही राष्ट्रवाद सांगता आणि तुमच्या मनातील धर्म मोठा करू पाहता, मी प्रत्येक धर्मातील घर आणि घर वाचवू पाहतोय,’ अशी कविता सादर करीत आपल्या कवितेतून समतेचीच भावना व्यक्त केली. सुनंदा कांबळे यांनी मालवणी कविता सादर करून सभागृहात प्रचंड हशा पिकविला. अरुण नाईक, मधुकर मातेंडकर, अनिल जाधव आदी कवींनी आपल्या कवितांमधून विद्रोही भावना व्यक्त करीत आजच्या वास्तवतेचेच भान आणून दिले. काळसेकरांनी सादर केलेल्या प्रार्थनेने कविसंमेलनाची सांगता झाली.

कविवर्य शेवरे यांच्याविषयी आदरभाव

कविसंमेलनात संध्या तांबे यांनी . सो. शेवरे यांची कविता सादर केली, तर दीपक तळवडेकर यांनी शेवरे यांना आदरांजली वाहणारी कविता सादर केली. यावेळी मिलिंद जामसंडेकर, उदय सर्पे, विद्यानंद भिरगावकर, जनीकुमार कांबळे, सुनील गस्ती आदींनीही कविता सादर केल्या.

Related posts: