|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महामार्ग दुरवस्थेबाबत काँग्रेसचा ‘रास्ता-रोको’

महामार्ग दुरवस्थेबाबत काँग्रेसचा ‘रास्ता-रोको’ 

मुंबई-गोवा महामार्गावर 6 ठिकाणी आंदोलन

खड्डेमय महामार्गाकडे वेधले शासनाचे लक्ष

खासदार दलवाईच्या नेतृत्वाखाली चिपळुणात ठिय्या

प्रतिनिधी /रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्थेबाबत भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला जाग आणण्यासाठी खासदार हुसेन दलावाई यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावर रास्तो रोको आंदोलन केले. चिपळूण, रत्नागिरी, खेड, राजापूर आदी 6 ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधात तीव्र निदर्शने करत महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करणाऱया या कार्यकर्त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे वाहतुकीवर फारसा परिणाम जाणवला नाही.

मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था व त्या रस्त्यांच्या दुरूस्तीच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे प्रवासी जनता, पर्यटक व वाहनचालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ‘आपले सरकार’ अशा जाहिरातबाजीचा डांगोरा पिटणाऱया भाजप-शिवसेना युती सरकारच्या कानावर हा जनतेचा आक्रोश पोहोचवण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने 27 नोव्हेंबर रोजी ‘रास्ता-रोको’ आंदोलन करण्यात आले. प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हय़ात हे ‘रास्ता-रोको’ ठिकठिकाणी करण्यात आले.

अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनलेल्या या महामार्गाबाबत सरकार कोणतीच दखल घेत नसल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. जिल्हाभरात हे आंदोलन ठिकठिकाणी करण्यात आले. रत्नागिरीतील हातखंबा तिठा येथेही काँग्रेसच्या निवडक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व येथील काँग्रेसचे अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, प्रदेश महिला चिटणीस रुपाली सावंत, महिला जिल्हाध्यक्षा ऍड. अश्विनी आगाशे, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कपिल नागवेकर, दीपक राऊत, युवक काँग्रेसचे प्रितम पिलकणर, आतिफ साखरकर, महिला उपाध्यक्षा रुपाली मजगावकर, मच्छीमार नेते खलील वस्ता, निसार राजपूरकर, निसार बोरकर, बाळा करजारकर, आप्पा देसाई आदी उपस्थित होते.

रास्ता-रोको करणारे कार्यकर्ते ताब्यात

महामार्ग रोको होणार म्हणून पोलीस फौजफाटादेखील तैनात करण्यात आला होता. पण या रास्ता-रोको आंदोलनासाठी काही निवडक पदाधिकारीच सहभागी झाले होते. शासनाच्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘भाजप सरकार हाय हाय’…फडणवीस सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत शासनाच्या कारभारावर आक्षेप नोंदवण्यात आला. या निवडक कार्यकर्त्यांनी हातखंबा येथे रास्ता-रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या सर्वांना लागोलाग पोलिसांनी ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली.

राजापुरात आ. खलिफेंकडून नेतृत्व

आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या नेतृत्वाखाली राजापूर तालुका काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन छेडले. काँग्रेस पदाधिकाऱयांनी महामार्गावर ठिय्या मांडून महामार्ग रोखून धरत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. महंमदअली वाघु, महिला आघाडीच्या अनामिका जाधव, जितेंद्र खामकर, दिवाकर मयेकर, उपनगराध्यक्ष ऍड.जमीर खलिफे, नगरसेवक हनिफ युसूफ काझी, सुलतान ठाकूर, आसिफ मुजावर, मुमताज काझी, परवीन बारगीर, नेहा कुवेसकर, नाना कुवेसकर, मंदार सप्रे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

खेडमध्येही आंदोलन

खेडमध्ये झालेल्या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. विजय भोसले, गौस खतीब, सिराज रखांगी, आरिफ मुल्लाजी, संदीप धारिया, फारूख पोत्रिक, फैसल देसाई आदी उपस्थित होते.

काँग्रेसचा हल्लाबोल 10 मिनीटांचाच

‘अरे या सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय, जोर से बोल हल्लाबोल’ अशा एकापेक्षा एक घोषणा देत येथील काँग्रेसने सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावरील बहाद्दूरशेखनाका येथे रस्ता रोको केले. अवघ्या दहा मिनिटांतच पोलिसांनी हस्तक्षेप करताच हे आंदोलन आटोपते घेण्यात आले. यातील सुमारे 51जणांना ताब्यात घेत त्यांना सोडूनही देण्यात आले.

यानंतर दुपारी 12 वाजता पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी दलवाई यांचा हात पकडून पोलीस व्हॅनमध्ये बसण्यास सांगितले. त्यापाठोपाठ रमेश कदम यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनात इब्राहीम दलवाई, लियाकत शाह, भरत लब्धे, कैसर देसाई, संदीप लवेकर, श्रीकृष्ण खेडेकर, हिंदुराव पवार, संजय तांबडे, नंदू थरवळ, दादा बैकर, शौकत परकार, सुधीर दाभोळकर, रघुनाथ पवार, मेजर शिंदे, राकेश दाते आदी सहभागी झाले होते.

Related posts: