|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोलापूर बाजार समितीमध्ये सोमवारी नऊ कोटी 32 लाखाचा कांदा विकला

सोलापूर बाजार समितीमध्ये सोमवारी नऊ कोटी 32 लाखाचा कांदा विकला 

वार्ताहर / सोलापूर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थापनेपासून सोमवारी कांद्याची ऐतिहासिक आणि विक्रमी उलाढाल झाली. बाजारात सोमवारी 405 ट्रक कांद्याची अवाक झाली तर सुमारे 9 कोटी 32 लाख 19 हजारांचा कांदा विकला गेला आहे. संपूर्ण बाजापेठेत सुमारे 10 कोटी 72 लाख 61 हजारांची उलाढाल झाल्याची माहिती प्रभारी सचिव विनोद पाटील यांनी दिली.

  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज कांद्याची मोठी आवक होते. सोलापूर जिह्यासह परजिल्यातून मोठय़ा प्रमाणावर कांदा विक्रीसाठी सोलापूरच्या बाजारपेठेत येतो. चांगला भाव मिळतो आणि काटय़ांची मारामारी होत नाही म्हणून शेतकरी सोलापूरला आपला कांदा घेऊन येतात. बाजार समितीमार्फत सोयीसुविधा देण्यात येत असल्याने सोलापुरात शेतीमाल घेऊन येणं-यांची संख्या वाढली आहे.

   दरम्यान सोमवारी 405 गाडय़ा कांदा आला. किमान 200 आणि जास्तीत जास्त 4800 रुपये क्विंटलला भाव मिळाला. सरासरी बाजारभाव 2300 रुपये मिळाला. कांद्याची सुमारे 9 कोटी 32 लाख 19 हजाराची उलाढाल झाल्याने समितीच्या अधिका-यांचे मनोबल उंचावले आहे. याशिवाय संपूर्ण उलाढाल सुमारे 10 कोटींवर गेल्याने हा बाजार समिती स्थापनेपासूनच विक्रम असल्याचा दावा प्रभारी सचिव पाटील यांनी केला आहे. फळे,भाजीपाला तसेच डाळिंबालाही चांगला दर मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले.

   सोलापूर बाजार समितीमध्ये प्रशासक म्हणून कारभार हाती घेतल्यानंतर कुंदन भोळे आणि प्रभारी सचिव विनोद पाटील यांनी शेतक-यांना सोईसुद्धा देण्याला आणि त्याच्या मालाची सुरक्षा करण्याला प्राधान्य दिले आहे. शेतक-यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. कांद्याची चोरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी पुरता हैराण झाला होता . मात्र दोन ते तीन दिवसांपूर्वी टाकलेल्या धाडीत कांदा चोरांना आळा घालण्यात आल्याने बळीराजाची चिंता दूर झाली आहे. त्यातच सोमवारी कांद्याला चांगला दर मिळाला शिवाय उलाढालही 10 कोटींच्या घरात गेल्याने बाजार समिती अधिकारी आणि कर्माच्या-यांचा विश्वास दुणावला आहे. शेतक-यांनी आपला शेतीमाल सोलापूरच्या बाजारपेठेत आणावा त्याच्या मालाची सुरक्षा घेतली जाईलच शिवाय शेतीमालाला चांगला भाव मिळण्यास मदतही होईल असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे.

Related posts: