|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्रतापगडावरील अतिक्रमणावर हातोडा फिरवण्यासाठी अधिवेशनात आवाज उठविणार

प्रतापगडावरील अतिक्रमणावर हातोडा फिरवण्यासाठी अधिवेशनात आवाज उठविणार 

प्रतिनिधी/ वाई

छ. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध हा हिंदवी स्वराज्यावर आलेले सुलतानीसंकट संपविण्यासाठी केला होता. अफजल खानाने त्यावेळी हिंदूंच्या महिलांवर अत्याचार केले, गाईंची कत्तल केली, हिंदूंची मंदिरे पाडली, त्यांच्या अत्याचाराच्या जोखडातून रयतेला मुक्त करण्यासाठी छ. शिवाजी महाराजांनी हे पाऊल उचलेले होते. याला शेकडो वर्षांचा कालावधी होवून गेला तरीही अफजलखान प्रवृत्ती आजही समाजात स्पष्टपणे वावरताना दिसत आहे. त्यामुळेच न्यायालयाने आदेश देवूनही प्रतापगडावरील अतिक्रमण काढण्यास प्रशासन धजावत नाही, प्रतापगडावरील झालेले अतिक्रमण काढण्यासाठी होवू घातलेल्या हिवाळी अधिवेशनात या अतिक्रमणावर हातोडा फिरविण्यासाठी आवाज उठविणार असल्याचे परखड मत महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी काढले.

येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने देण्यात आलेल्या वीर जीवा महाले पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावर्षीचा वीर जीव महाले पुरस्कार आ. भरतशेठ गोगावले यांना देण्यात आला तर पंताजी काका बोकील अभिवक्ता पुरस्कार हा प्रखर हिंदुत्ववादी, मांढरदेव व सज्जनगड देवस्थानचे विश्वस्त ऍड. महेश कुलकर्णी यांना देण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभात प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले, नगराध्यक्ष सौ. प्रतिभा शिंदे, ऍड. उमेश सणस, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख प्रदीप माने, ऍड. शिरीष दिवाकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा समन्वयक यशवंत लेले, विनायक दादा सणस, पंडितराव मोडक, नगरसेविका सौ. वासंती ढेकाणे, महेंद्र धनवे, जीव महालेंचे तेरावे वंशज श्रीमती सुमनताई सपकाळ, वेदमूर्ती शंकरराव अभ्यंकर, प्रतापगड उत्सव समितीचे खजिनदार सुहास पानसे, विवेक भोसले, शिवसेना वाई शहर प्रमुख गणेश जाधव, योगेश चंद्रस, पंकज शिंदे, किशोर प्रभाळे, किशोर गांधी, शाहीर प्रा. शरद यादव गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. गोगावले पुढे म्हणाले, आम्ही समाजात छ. शिवाजी महाराजांचे पाईक म्हणून समाजसेवा करीत आहे. समाजातील अफजल खान प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी समाजातील वैचारिक दहशतवाद संपवावा लागेल. 

विनायक पावसकर म्हणाले, शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या तरुण पिढीला नितांत गरज आहे. आधुनिक बदलामुळे तरुण पिढीला छ. शिवाजी महाराजांच्या विचाराचा विसर पडला आहे. 

ऍड. उमेश सणस म्हणाले, चोहो बाजूनी हिंदुत्वावर घाला होत आहे. छ. शिवाजी महाराजांना आपल्या स्वकीयांच्या कारस्थानामुळे एक क्षणही उसंत मिळाली नाही. आपल्या देशात धर्मासाठी झगडणार्या माणसांची संख्या अल्प असून हिंदूच अल्पसंख्यांक झाले आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास हा बदलला जावू शकतो. अफजलखान वधाचे उल्लेख अनेकांनी सोयिस्कररित्या इतिहासात मांडले आहेत. 

कार्यक्रमाची सुरुवात छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन, व वीर जीवा महाले, पंताजी काका बोकील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर चित्तथरारक शस्त्रांची प्रात्यक्षिके व शाहीर हेमंत मावळे पुणे यांच्या पोवाडय़ाने कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यासपीठावर महाडचे आ. भरतशेठ गोगावले यांना वीर जीवा महाले पुरस्कार, मानाचे कडे, मानचिन्ह, सन्मान पत्र तसेच यावेळी पंताजी काका बोकील अभिवक्ता पुरस्कार सातारचे ऍड. महेश कुलकर्णी यांना फटाक्याच्या आतशबाजीत व जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी गणपती घाट दणाणून सोडत विनायक पावसकर यांच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

गणेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. आनंद पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्नील भिलारे यांनी आभार मानले. यावेळी वाईकर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related posts: