|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या 

तालुक्यातील उंब्रज येथे गुरूवार दि. 22 रोजीच्या मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये जैबुन करीम मुल्ला या वृध्द महिलेचा खून करून 30 तोळे सोन्याचे दागिने व रोकड लंपास करून दरोडेखोरांनी अक्षरशः थैमान घातले होते. या टोळीतील चार जणांना पकडण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. तर दोन फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. पकडण्यात आलेले आरोपी हे नगर जिल्हय़ातील असून सराईत गुन्हेगार आहेत. यापुर्वीही या आरोपींनी 12 दरोडे टाकून काहीजणांचे 10 खून केल्याचे पोलीस तपासात समोर येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  उंब्रज येथे बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर असणाऱया बंगल्यावर या दरोडेखोरांनी बुधवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकून जैबुन मुल्ला (वय 86) या वृध्देच्या तोंडावर उशी दाबून खून केला होता. व त्यांच्या अंगावरील 4 लाख 93 हजार 500 रुपये किंमतीचे 30 तोळे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली होती. तसेच संजय छगन कुंभार यांच्या भाग्यलक्ष्मी या बंद घरात चोरटय़ांनी घरफोडी करुन 70 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली होती. तसेच अन्य तीन घरे फोडण्याचा प्रयत्न केला होता. या धाडसी दरोडय़ामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. या दरोडेखोरांना पकडणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. घटनास्थळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी भेट दिली होती. व तपासाची दिशा ठरवून दिली होती.

  सदर घटना घडल्यानंतर सातारा गुन्हे अन्वेषण विभाग, उंब्रज पोलीस व नगर पोलीस या तिघांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. यामध्ये सर्वात महत्वाची भुमिका निभावली ती सीसीटीव्ही फुटेजने. सीसीटीव्हीमध्ये हे आरोपी बऱयापैकी कैद झाले होते. त्यामुळे पोलासांनी त्यांचे विविध बातमीदार व खबऱयांना या आरोपींचे वर्णन सांगितले त्यानुसार हे आरोपी नगर जिल्हय़ातील असल्याचे निष्पन्न झाले.

  सातारा गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरिक्षक प्रसन्न जऱहाड व सहकारी तसेच उंब्रज पोलीस यांनी संयुक्तपणे टीम करून या आरोपींचा माग काढण्यास सुरूवात केली. व नगर पोलिसांच्या मदतीने त्यांना नगर येथे पकडण्यात आले. हे आरोपी श्रीगोंदा, नगर, नेवासे येथील आहेत. या आरोपींनी हा दरोडा टाकण्यासाठी टोयाटो कंपनीची इनोव्हा कार वापरली होती.

या गाडीद्वारे महामार्गावरुन वेगाने 100-150 किलोमीटर अंतर 2 तासात पूर्ण करुन महामार्गालगत दरोडा टाकणे अशी या टोळक्याची दरोडा टाकण्याची पद्धत होती. परंतु अवघ्या 72 तासात पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. या दरोडय़ाच्या टोळीत एकुण सहा दरोडेखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी चार जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अन्य दोन आरोपी फरारी आहेत. या फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच या गुन्हय़ात वापरलेली इनोव्हा कार पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 72 तासात आरोपींना पकडल्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी सातारा गुन्हे अन्वेषण विभाग व उंब्रज पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या सुचनेनुसार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे दिलीप पवार, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे बाजीराव पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरिक्षक प्रसन्न जऱहाड, सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, तानाजी माने, उत्तम डबडे, विजय कांबळे, शरद बेबले, रुपेश कारंडे, नीलेश काटकर, विक्रम पिसाळ, विजय सावंत, उंब्रज पोलीस ठाण्याचे लक्ष्मण जगधने, अमोल देशमुख, प्रवीण फडतरे, यशोमती साळुंखे, ज्योती कोंडावळे, तसेच अ.नगर पोलीस दलातील हवालदार अरुण ढवळे, सुनील चव्हाण, विठ्ठल गायकवाड यांनी सहभाग घेतला.

Related posts: