|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » डिजिटल जगाचा लाभ घेऊन महाविद्यालयाचा स्तर उंचवावा

डिजिटल जगाचा लाभ घेऊन महाविद्यालयाचा स्तर उंचवावा 

प्रतिनिधी/ पणजी

विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधल्यानंतर त्यांच्या प्रतिसादातून प्रतिक्रिया उमटणे यात शिक्षकांचे नेतृत्व कौशल्य दडलेले असते. शिक्षकांच्या सहवासात विद्यार्थ्यांना सामर्थ्यशील वाटले पाहिजे. तंत्रज्ञानामुळे आज माहिती सहज उपलब्ध आहे. उथळ काम करून आज आपला टीकाव लागणार नाही, तेव्हा डिजिटल जगाचा लाभ घेऊन महाविद्यालयाचा स्तर व विद्यार्थ्यांचे सामर्थ्य अधिक वाढवून प्राचार्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सतीश शेटये यांनी येथे केले.

गोवा शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (रुसा) सहयोगाने पाटो-पणजी येथे संस्कृती भवनमधील परिषदगृहात ‘ऍकॅडेमिक लिडरशीप इन डिजिटल वर्ल्ड’ या विषयावर प्राचार्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचे सोमवारी 27 रोजी उद्घाटन केल्यानंतर डॉ. सतीश शेटये प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर, कार्यशाळेला मार्गदर्शन करणारे संसाधक (रिसोर्स परसन) राजू माधवन व सुंदर अनंता व रुसाचे ज्येष्ठ सल्लागार डॉ. रमेश गावकर उपस्थित होते.

डिजिटल जगाची शैक्षणिक नेतृत्वासाठी कशाप्रकारे मदत होईल यासंदर्भात उहापोह करून डॉ. शेटये यांनी सांगितले, आपल्या नेतृत्वाखाली राबविल्या जाणाऱया गोष्टी योग्य दिशेने जाताहेत की नाही यावर प्राचार्यांनी देखरेख ठेवायला हवी. कला, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना ‘प्रॅक्टीकल’ नसल्याने त्यांच्याकडे वैयक्तिकरित्या लक्ष पुरविले जात नाही याकडे लक्ष वेधून त्यांनी चांगले शिक्षण आत्मसात करण्याची क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना चांगली कमाई करण्याच्या संधी उपलब्ध आहेत हेही निदर्शनास आणून दिले.

राजू माधव यांनी कार्यशाळेचे स्वरूप कसे राहिल याची माहिती दिली. ते म्हणाले, प्रथम स्वत: आत्मपरीक्षण करायला हवे. डिजिटल जगाशी तुम्ही जुळवून घ्यायला हवे. त्यासाठी स्वत: प्रेरणा घ्यायला हवी. स्वत: शिकायचे बंद करतो तेव्हा  मर्यादा पडतात.

प्रसाद लोलयेकर यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, कार्यशाळा घेऊन नेतृत्व अंगी बाणवले जाईल असे नसले तरी नेतृत्वगुण हे आपल्या प्रत्येकात आहेत केवळ त्याला पैलू पाडायचे काम कार्यशाळेतून होईल. आपण शोधकवृत्ती सोडता कामा नये. डिजिटल जगतात आज काय चालले आहे हे जाणून घेण्याची गरज आहे म्हणूनच या कार्यशाळेचे प्रयोजन आहे. उच्चशिक्षण वाढीस लागण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करून ध्येय गाठायचे आहे.

सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रमेश गावकर यांनी आभार मानले. ही कार्यशाळा 29 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

Related posts: