|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सत्तरी तालुका मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॉ. सुनिलकुमार लवटे

सत्तरी तालुका मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॉ. सुनिलकुमार लवटे 

प्रतिनिधी/ वाळपई

बिल्वदल सांखळी संस्थेतर्फे गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयाच्या सहकार्याने दि. 4 डिसें. रोजी बिंबल – सत्तरी येथील श्री महागणपती मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. संमेलनाचे उद्घाटन कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनिलकुमार लवटे यांच्याहस्ते होणार आहे.

एकूण जाहीर करण्यात आलेल्या संमेलनाच्या कार्यक्रमानुसार सकाळी 8.45 वा. ग्रंथ दिंडी आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या सत्रात उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 9.30 वा. सदर कार्यक्रमाला संमेलनाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र केरकर उपस्थित असतील. यावेळी संस्थेच्यावतीने जाहीर करण्यात आलेला प्रतिष्ठेचा पं. महादेवशास्त्री जोशी पुरस्कार नाटककार विठ्ठल पारवाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. तद्नंतर पुस्तक प्रकाशन करण्यात येईल. यात ‘गोमंत क्षेत्रिय वृक्षायण’ म.कृ. पाटील, समता काव्यसंग्रह विठ्ठल कांबळे यांचा समावेश आहे.

दुसऱया सत्रात सकाळी 11 वा. ‘माझा गोवा माझे पर्यावरण’ याविषयावर परिसंवाद होणार आहे. याचे अध्यक्षपद प्रा. कृष्णाजी कुलकर्णी भूषवतील. यात राजेंद्र केरकर (वनसंपदा), ऍड. शशिकांत जोशी (सामाजिक क्षेत्र), म.कृ. पाटील (साहित्य), वनिता वरक (युवा क्षेत्र), विनय बापट (शिक्षण क्षेत्र) यांचा सहभाग लाभणार आहे.

तिसऱया सत्रात दुपारी 2.15 वा. ‘सत्तरीतील तारे’ हा आगळा-वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात वेगवेगळय़ा क्षेत्रातील चांगली कामगिरी करणाऱया व्यक्तिमत्त्वांचा मुलाखतीचा कार्यक्रम होईल. यात सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सचिव उपेंद्र जोशी, सी. ए. मिलिंद राणे, कायदा सल्लागार ऍड. यशवंत गावस, प्राध्यापिका आदिती बर्वे, नाटय़कलाकार सूर्यकांत राणे आदी भाग घेणार आहेत. याचे अध्यक्षपद स्नेहा म्हांबरे सांभाळतील.

समारोप सत्रात दु. 3.30 वा. राजेंद्र केरकर, डॉ. सुनिलकुमार लवटे यांचे मार्गदर्शन होणार आहे. यावेळी वेदमूर्ती विनायकराव भावे यांचा खास सत्कार करण्यात येईल. शेवटच्या सत्रात प्रा. पौर्णिमा केरकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल. यास अनुराधा म्हाळशेकर यांचे सहकार्य लाभणार असून सत्तरीतील अनेक नवोदित तसेच ज्येष्ठ कवी भाग घेणार आहेत. सदर संमेलनाला मराठी साहित्य प्रेमी, नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बिल्वदल सांखळीचे अध्यक्ष सागर जावडेकर, सचिव ऍड. करुणा बाक्रे व कार्याध्यक्ष प्रेमनाथ गावडे यांनी केले आहे.

Related posts: