|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आमोणे, न्हावेलीवासियांचा अखेर विजय

आमोणे, न्हावेलीवासियांचा अखेर विजय 

सेसाची उद्याची सार्वजनिक सुनावणी रद्द

प्रतिनिधी/ पणजी

आमोणे आणि न्हावेली येथील सेसा गोवाच्या प्रकल्प विस्तारासंबंधी आयोजित करण्यात आलेली सार्वजनिक सुनावणी रद्द करण्यात आल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला प्रशासनातर्फे कळवल्याने आमोणे येथील प्रविर फडते आणि न्हावेली येथील विराज नाईक यांनी सादर केलेली याचिका निकालात काढली आहे. सुनावणी रद्द झाल्याने आमोणे, न्हावेली व कुडणेवासियांचा विजय झाल्याचे याचिकादाराने सांगितले.

नियोजित प्रकल्पासंबंधी जनतेची बाजू ऐकून घेण्यासाठी न्हावेली येथे सार्वजनिक सुनावणी आयोजित करण्यात आली होती.

सुनावणी आमोणेत, सुट्टीच्या दिवशी घ्यावी

दि. 29 व 30 नोव्हेंबर रोजी सदर सुनावणी एकाच ठिकाणी होणार होती. आमोणे येथील प्रकल्पाची सुनावणी आमोणे येथेच हवी तसेच सदर सुनावणी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हवी अशी मागणी याचिकादाराने केली होती. प्रविर फडते व इतर 75 जणांनी सादर केलेल्या या याचिकेत आपल्यालाही प्रतिवादी बनवून घ्यावे व न्हावेली प्रकल्पासंबंधी बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी मागणी करून न्हावेली येथील विराज नाईक व इतरांनी हस्तक्षेपाची याचिका सादर केली होती.

सरकारचा वाईट हेतू

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सार्वजनिक सुनावणी हवी हे माहीत असुनही गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुद्दामहून सुनावणी बुधवार दि. 29 व गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी ठेवली असून विरोध करणाऱयांनी या सभेला येऊ नये, असा सरकारचा हेतू आहे. जास्तीत जास्त लोकांचा सहभाग होण्याची शक्यता असल्याने सदर सुनावणी सार्वजनिक सुट्टी अथवा रविवारी ठेवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.

प्रकल्पाची माहिती दडवण्याचा प्रयत्न

प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या नोटीसवर प्रकल्पासंबंधी पूर्ण तपशील देण्यात आलेला नाही, त्यामुळे कोणता प्रकल्प येणार यावर माहिती दडवून ठेऊन परस्पर प्रकल्पाला ना हरकत देण्याचा सरकाराचा डाव असल्याचा दावा याचिकादाराने केला होता.

सुनावणीविरुद्ध जिल्हाधिकाऱयांकडे आले अनेक अर्ज

सदर याचिकेवर सुनावणी झाली तेव्हा याचिकादाराच्या वतीने ऍड. विवेक रॉड्रीग्स यांनी बाजू मांडली तर हस्तक्षेप याचिकादाराच्या वतीने ऍड. निखील पै यांनी बाजू मांडली. सरकारी वकिलांनी बाजू मांडताना उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी सदर सुनावणी रद्द करण्याचा आदेश दिल्याचे स्पष्ट केले. या सुनावणीला विरोध करणारे अनेक अर्ज जिल्हाधिकाऱयांकडे पोहोचले आहेत. सुनावणी झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यासाठी सदर सुनावणी रद्द करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुनावणी व्हायला हवी व ज्या ठिकाणी प्रकल्प येणार आहे, त्याच गावात सुनावणी हवी, अशी मागणी याचिकादाराच्या वकिलांनी केली. सध्याची सुनावणी रद्द झालीच आहे, आता नव्याने सुनावणी सुरु करण्याची प्रक्रिया परत एकदा करावी लागणार आहे. त्यावेळी सरकारने परत तीच चूक केल्यास याचिकादारांना दाद मागण्याची नव्याने संधी असल्याने खंडपीठाने याचिका निकालात काढली.

आंदोलन उभे करण्यास मनोबल दिल्याने

दै. तरुण भारतचे अभिनंदन व आभार

आमोणे, न्हावेली आणि कुडणे तसेच आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाने ग्रासलेल्या नागरिकांच्या समस्यांना दै. तरुण भारतने वाचा फोडली व वाढत्या प्रदूषणा विरोधात आंदोलन उभे करण्यास जनतेला मनोबल दिल्याने स्थानिकांनी सार्वजनिकरित्या दै. तरुण भारत, संपादक आणि व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. अनेकांनी कार्यालयात फोन करून दै. तरुण भारतच्या भूमिकेची प्रशंसाही केली. म्हादई सारखा प्रश्न तसेच आमोणे न्हावेली प्रदूषणासारखे जनहिताचे विषय लावून धरल्याबद्दल अनेकांनी तरुण भारतचे अभिनंदन केले.

Related posts: