|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कॉलेज रोडवर इनोव्हा कारला अपघात

कॉलेज रोडवर इनोव्हा कारला अपघात 

भरधाव कार संरक्षक भिंतीला आदळल्याने चालक गंभीर जखमी

प्रतिनिधी/ बेळगाव

भरधाव वेगातील इनोव्हा कार  कॉलेज रोडवरील संरक्षक भिंतीला धडकल्याने कारचे नुकसान झाले. सोमवारी रात्री 11.15 च्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने यात जिवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबतची माहिती अशी की धर्मवीर संभाजी चौकाकडून कॉलेज रोडच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार क्रमांक केए 22 एनए 3310 ही केएलई सोसायटीच्या कार्यालयानजीक आल्यानंतर तेथील संरक्षक भिंतीला जोराने धडकली. कारची ही धडक इतकी जोराची होती की तिच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. तसेच चालक गंभीर जखमी झाला. जोरदार धडकेनंतर कारची दिशा बदलली. त्यामुळे अपघात नेमका कसा झाला हे समजणे अवघड झाले होते. अपघातानंतर त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती.

शनिवारी मध्यरात्री कॉलेज रोडवर सन्मान हॉटेलनजीक भरधाव कारच्या धडकेने एका महिलेचा बळी गेला होता. त्यानंतर पुन्हा सोमवारी रात्री याच मार्गावर भरधाव वेगातील कारला अपघात घडला आहे. या प्रकारांमुळे कॉलेज रोडवरील रात्रीच्या वेळेस होणारी वाहतूक धोकादायक बनल्याचे स्पष्ट होत आहे. यासाठी रहदारी पोलिसांनी विशेष उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.