|Monday, January 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव

नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव 

साधूने गळय़ात बांधलेल्या चिंतामणीकडे कुतुहलाने पाहत तो दरिद्री माणूस समुद्रकिनाऱयावरील वाळूतून चालला होता. त्या वाळूत त्याला एक सुंदर चकाकणारा शिंपला दिसला. त्याला तो शिंपला फारच आवडला. त्याने गळय़ातील परिस तोडून टाकला आणि तो शिंपला मोठय़ा अभिमानाने गळय़ात बांधला. चकाकणारा ह्या शिंपल्यापुढे दगडासारख्या ओबडधोबड दिसणाऱया परिसाची काय किंमत!

परिसाची योग्यता न समजल्यामुळे त्या माणसाच्याकडून हा वेडेपणा झाला. परिसाबद्दल अज्ञान हेच त्याच्या दुर्दैवाचं कारण होते. आपणही असेच अज्ञानात वावरत असतो आणि आपल्या खऱया सुखाला आपण अंतरतो. माउलींनी दिलेल्या या दोन्ही उदाहरणांत एक गोष्ट नक्की लक्षात येते ती म्हणजे माणूस जेव्हा अज्ञान व भ्रम यांच्या भोवऱयात सापडतो तेव्हा त्याचे मन, मी आणि माझे यात गडबडून जाते. देहालाच मी असे तो समजतो. देहावरच त्याचं प्रेम जडते. देहसुखासाठी आणि देहरक्षणासाठी त्याची अहोरात्र धडपड चालू असते. ही धडपड देहांतापर्यंत चालूच राहाते. इंद्रियांच्यामार्फत मिळाले असे वाटणारे सुख अतिशय अल्पजीवी, त्यामुळेच अपुरे असते. उपभोगाने इंद्रिये कधीही तृप्त होत नाहीत. त्यामुळे मन सर्वकाळ असमाधानी राहते. या सर्वांचा परिणाम असा होतो, की स्वविकास साधण्यासाठी त्याला फुरसतच मिळत नाही. तैसी अहंममतेचिये लवडसवडी । मातें न पवतीचि बापुडी ।। म्हणौनि जन्ममरणाची दुथडी।। डहुळितें ठेलीं। एर्?हवीं मी तरी कैसा । । मुखाप्रति भानु कां जैसा । कहीं दिसे न दिसे ऐसा । वाणीचा नोहे।।  अहंममता म्हणजे द्वैतभ्रम. मी आणि माझे हेच पाहणारी दृष्टी, भावना. अहंममतेच्या पोटी मनातील सर्व वासना व विकार यांची उत्पत्ती होते. तसेच या वासनांच्या तृप्तीसाठी आपण जन्मभर प्रयत्?न करतो. पशु, पक्षी, जलचर इत्यादी इतर सर्व जीव याहून विशेष काय करतात? मग माणसातील मानवता गेली कुठे? एखाद्या बैलाचे किंवा गाढवाचे जीवन आणि माणसाचे जीवन ही सारखीच आहेत का? जन्माला यावे, भोग भोगावे, मरावे व पुन्हा जन्माला यावे हे चक्र संपणार तरी कधी? हा विचार फक्त मानवयोनीतच संभवतो. पण भ्रांत मन झालेल्या मानवाला, मी आणि माझे या वृत्तीच्या जोपासनेपुढे हा विचार करायला वेळच मिळत नाही. अशा रितीने भगवंताची प्राप्ती करून न घेता तो जन्म व मरण या दोन तीरांमधील मायानदीत गटांगळय़ा खात राहतो.  भगवान तर म्हणतात-तसे पाहिलं तर मी कसा सुलभ आहे! सर्वांना सदा सूर्याप्रमाणे समोर आहे. भगवान या इंद्रियग्रामरूपी गोकुळात सदैव आहेत पण ते अवतरीत झाले, प्रकट झाले तरच तुमच्या आमच्या सारख्या सामान्यांना ते सुलभ होतात. एऱहवी ते-या उपाधीमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत। जें तत्त्वज्ञ संत। स्विकारती ।। असे केवळ ज्ञानी महात्म्यानांच आकळू शकतात. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात – नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव । मी भक्त तूं देव ऐसें करिं ।। दावी रूप मज गोपिकारमणा । ठेवीन चरणांवरी माथा ।।

 

Related posts: