|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » राणेंना ‘प्रसाद’

राणेंना ‘प्रसाद’ 

काँग्रेसला रामराम ठोकून महाराष्ट्र स्वाभिमान पार्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱया माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपानेही वेटिंगवरच ठेवल्याने राणेंची अवस्था सध्या अधांतरी त्रिशंकूसारखी झाली आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद भूषविलेले राणे हे राज्यातील शक्तिशाली नेते मानले जातात. मात्र, धरसोड वृत्ती, अतिघाई याचा त्यांना चांगलाच ‘प्रसाद’ मिळाल्याचे दिसत असून, पुनर्वसनासाठी आता त्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. राणे हे सेनेच्या मुशीत घडलेले. सेनेच्या संस्कृतीतच ते मोठे झाले. विविध खात्यांचा कार्यभार सांभाळणाऱया राणेंनी राज्याची धुराही समर्थपणे वाहिली. विरोधी पक्षनेता म्हणजे काय असतो, त्याचा किती दबदबा असू शकतो, हेदेखील त्यांनी दाखवून दिले. किंबहुना, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी बिनसल्यानंतर राणे यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला अन् त्यांचा आलेख काहीसा घसरत गेला, असेच म्हणता येईल. काँग्रेसमध्ये महसूलसारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी त्यांना मिळाली असली, तरी पुन्हा मुख्यमंत्रिपदावर विराजमान व्हायचे स्वप्न अपूर्णच राहिले. त्यात विधानसभा निवडणुकीत लागोपाठ दोनदा झालेल्या पराभवामुळे राणे आणि काँग्रेसमध्ये अधिकच अंतर पडत गेले. विधान परिषदेत राणे यांना संधी दिली गेली, तरी दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त करीत एकप्रकारे त्यांना शह देण्यात आला आणि त्याचीच परिणती त्यांच्या राजीनाम्यात झाली. आता तरी त्यांना अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा बळावलेली असतानाच भाजपानेही त्यांना धक्का दिला आहे. राणे यांच्या राजीनाम्यामुळेच विधान परिषदेची जागा रिक्त झालेली. त्यामुळे खरे तर त्यांना उमेदवारी मिळायला हरकत नव्हती. मात्र, सेनेचे ‘लाड’ पुरविण्याच्या नादात भाजपने राणे यांना प्रतीक्षेतच ठेवले आहे. तसे कालपरवापर्यंत राणे भाजपाच्या वाटेवर होते. तथापि, त्यांचे उपद्रवमूल्य इतके थोर की भाजपा त्यांच्या पक्षप्रवेशासही धजला नाही. त्यामुळे म्हणे या संघवाल्यांच्या सहकार्यानेच त्यांनी नव्या पक्षाची तुतारी फुंकत आपला स्वाभिमान दाखवून दिला. इतके सारे सोपस्कार पार पाडल्यानंतरही केवळ सेनेचे नाव पुढे करून राणे यांना डावलून राष्ट्रवादीतून पक्षात आलेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली जात असेल, तर याला कुठली नीती म्हणायची? हीच भूमिका घ्यायची होती, तर राणेंना असे तिष्ठत का ठेवायचे? निवडणुकीत भल्याभल्यांना पराभवाला सामोरे जावे लागते. राणे यांनाही या साऱया दिव्यातून जावे लागेल. पण, म्हणून राणे लगेच संपले, असे ठामपणे म्हणता येत नाही. कारण, राजकारणात कधी, कुणी व केव्हा उसळेल, याचा नेम नसतो. आजही कोकणचे नेते म्हणून राणे यांचा नामोल्लेख टाळता येत नाही. कोकणच्या आजवरच्या विकासात त्यांचा प्रमुख वाटा होता, हे कोण नाकारू शकेल? अशा कोकणच्या या धुरंधर नेत्याला भाजपाकडून अशा प्रकारची वागणूक मिळणे, हे नव्याने जन्माला आलेल्या पक्षाच्या स्वाभिमानालाच ठेच लावणारे ठरते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तर कुणालाही मंत्रिपदाची ऑफर दिली नाही, असे सांगत एकप्रकारे राणे यांच्या जखमेवरच मीठ चोळले आहे. एनडीएच्या विस्तारावेळी राणेंच्या मंत्रिपदाचा विचार करू, असे ते म्हणतात. म्हणजे राणेंचे भिजत घोंगडे होणार असे दिसते.  कोकणात त्यांचे मोठे नेटवर्क आहे. दुसरीकडे कोकणभूमीत कमळ काही केल्या फुलत नाही, अशा परिस्थितीत राणेंसारखा हुकमाचा एक्का गळाला लागलेला असतानाही तळय़ात-मळय़ात असेच धोरण अवलंबणे जाणे अनाकलनीय ठरते. अशाही स्थितीत मी आमदार, मंत्री होणारच, मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील, असा आशावाद राणे व्यक्त करतात. राणेंची ही आशा आज ना उद्या फलद्रुप होईलदेखील. परंतु, भाजपासोबतचा दोस्तानाच तडजोडीने सुरू झाला, तर भविष्यातही अशाच तडजोडी कराव्या लागतील. राणे हे मुरब्बी नेते आहेत, यात शंका नाही. तरी राजकारणात वारे कधी कोणत्या दिशेने वाहील, याची काही शाश्वती नसते. आजमितीला तरी राणेंचे टायमिंग चुकले, असे वाटते. आणखी शांतपणे व अचूक वेळ साधून त्यांनी काँग्रेसशी काडीमोड घेतला असता, तर परिणामकारकता नक्कीच अधिक असती. फडणवीस हे वाटतात तितके साधे राजकारणी नाहीत. एकनाथ खडसे कसे राजकारणाबाहेर फेकले गेले, ते आपण पाहतोच आहोत. राणे यांनाही फडणविसी राजकारण समजून घेऊन सावध पावले टाकावी लागतील. राणे यांचा धडाका, हुशारी याबद्दल कुणाचे दुमत असायचे कारण नाही. मात्र, अतिमहत्त्वाकांक्षा व पुत्रप्रेम या दोन गोष्टींचा त्यांना फटका बसला आहे. केवळ मुख्यमंत्रिपदाचा ध्यास, याला राजकारण म्हणत नाहीत. आपल्या मुलांबाबत सगळेच हळवे असतात. मात्र, केवळ आपण स्वत: उत्तम राजकारणी असून भागत नाही. मुलांमध्येही तसे पैलू पाडावे लागतात. त्यासाठी त्यांना समजुतीच्या चार गोष्टी सांगितल्या पाहिजेत. याबाबत राज्यातल्याच नव्हे; तर देशातल्या सर्वच राजकारण्यांनी सजग असायला हवे. तशी लाड यांची उमेदवारीही वादग्रस्त ठरावी. निष्ठावंतांना बाजूला करून अशा उमेदवारांवर मेहेरनजर करणे कितपत योग्य आहे, याचा विचार भाजपाने करायला हवा. सेनेचा कल लक्षात घेऊन तसा निर्णय झाला, अशी वदंता आहे. सेनाच जर भाजपाचा उमेदवार ठरवत असेल, तर एकूण सगळा आनंदच म्हणायचा. काँग्रेसने दिलीप माने यांना उमेदवारी दिली असून, अदृश्य बाण चमत्कार घडवेल, असे सूचक वक्तव्य केले आहे. प्रत्यक्षात काय होते, हे निकालाअंतीच कळेल. तिकडे संघाचे निष्ठावंत माधव भांडारी यांच्या कार्यकर्त्यांचाही हिरमोड झाला आहे. बहुदा संभाव्य यादीत त्यांचे नाव असू शकेल. विधानसभा निवडणुका दोन वर्षांवर येऊन ठेपल्या असून, पुढच्या काही दिवसांत वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता आहे. गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणुकीत भाजपा जिंकल्यास भविष्यात  तो अधिक आक्रमक होऊ शकतो. त्यामुळे हे ‘प्रसाद’अस्त्र अर्थात धक्कातंत्र असेच सुरूच राहणार की बुगरँगसारखे उलटणार, याबाबत औत्सुक्य आहे.

Related posts: