|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोलीसाठी स्वतंत्र टुरिस्ट पोलीस ठाण्याचा प्रस्ताव

आंबोलीसाठी स्वतंत्र टुरिस्ट पोलीस ठाण्याचा प्रस्ताव 

जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम यांची माहिती

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

आंबोली परिसरात वाढत्या गुन्हय़ांच्या पार्श्वभूमीवर आंबोली येथे स्वतंत्रपणे टुरिस्ट पोलीस ठाणे मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.  सद्यस्थितीत अतिरिक्त पोलीस बळ वाढविण्यात येऊन एक पोलीस अधिकारी देण्यात आला आहे. पोलीस गस्तही सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या खूनप्रकरणी माहिती देण्याकरिता पोलीस अधीक्षकांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील धनावडे उपस्थित होते.

शिक्षकाच्या खुनाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आणि सावंतवाडी पोलिसांनी केला. रक्ताच्या डागावरून तपास केला व खुनाची उकल केल्याबद्दल पोलिसांचे त्यांनी कौतुक केले. याचवेळी त्यांनी आंबोली परिसरात घडत असलेल्या गुन्हय़ांच्या पार्श्वभूमीवर आंबोलीत लावण्यात आलेल्या बंदोबस्ताबाबतची माहिती दिली. महादेवगड पॉईंट व कावळेसाद पॉईंटवरील दरीत खून करून टाकण्यात आलेले मृतदेह सापडल्यानंतर आंबोली परिसर संवेदनशील बनला आहे. खून दडपण्यासाठी खोल दरीत मृतदेह टाकण्यात येत आहेत. असे प्रकार घडू नयेत, यासाठी आंबोली परिसरात अतिरिक्त पोलीस बळ वाढविण्यात आले आहे. महत्वाच्या पर्यटनस्थळावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस गस्तही सुरू करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा पोलीस अधिकारीही देण्यात आला आहे. परंतु हे पोलीस बळ पुरेसे पडणारे नाही.

आंबोलीतील पर्यटनस्थळांवर आनंद लुटण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. काहीवेळा शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार आंबोली परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. सर्वच महत्वाच्या पर्यटन स्थळांवर सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत पोलिसांच्या परवानगिशिवाय कुणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आंबोलीमध्ये या वर्षात वर्षा पर्यटन सुरू झाल्यापासून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे व अन्य विविध प्रकारचे कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे मुंबई पोलीस कायदा अधिनियम 110 व 117 अन्वये 90 खटले दाखल झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस बळ वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस ठाणे होणे गरजेचे आहे. यासाठी आंबोलीत स्वतंत्रपणे टुरिस्ट पोलीस ठाणे मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

चेन स्नॅचर इराणीकडून अनेक गुन्हे उघड

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि सावंतवाडी पोलिसांनी पकडलेला चेन स्नॅचर हैदर इराणी यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. त्याने सिंधुदुर्ग जिल्हय़ासह गोवा, मुंबई-उल्हासनगर, हैद्राबाद या ठिकाणीही 10 ते 15 जणांचे सोन्याचे दागिने लुटल्याची कबुली दिली आहे. याचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. 

Related posts: