|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नॅकमध्ये शिवाजी कॉलेजचा देशात अव्वल

नॅकमध्ये शिवाजी कॉलेजचा देशात अव्वल 

विजय जाधव/ गोडोली

अनेकदा पर्वत सर करत असताना पायदळी तुडवल्या गेलेल्या किडय़ामुंगीचीच जास्त चर्चा होत असते. साताऱया कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभारलेल्या ‘शिवाजी कॉलेज’बाबतही तसचं काहीसं घडलं. कॉलेजच्या पोरांनी डीजे वाजवला म्हणून चर्चेत आलेल्या ‘शिवाजी कॉलेज’ने नॅक मानांकनात ‘ए प्लस’ नामांकन पटकावलं. देशभरातील कोणत्याही कला शाखेच्या महाविद्यालयाला इतके उच्च नामांकन मिळण्याची ही पहिलीच वेळ. तांत्रिक, इंजिनिअरींग अथवा सायन्सच्या महाविद्यालयानाही जे अशक्यप्राय आहे, ते उद्दिष्ट ‘शिवाजी’ने पूर्ण करून दाखविल्याने राष्ट्रीयस्तरावर ‘कला शाखे’ची कॉलर ताठ झाली आहे.

  दरम्यान, न्ाŸक समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आर. एस. शर्मा यांच्या हस्ते नॅक अहवाल रयतचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी मोठय़ा अभिमानाने स्वीकारला. कला शाखा विभागात देशातील ‘ए प्लस’ मानांकन मिळवणारे सातारचे छत्रपती शिवाजी कॉलेज हे पहिले असल्याचा आनंद काही वेगळा आहे. तसेच यासाठी अथक परिश्रम या महाविद्यालयाशी संलग्न असलेल्यांनी घेतले आहे, त्यांचे मनापासून आभार, असे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनील पाटील यांनी सांगितले.  

  ‘शिवाजी महाविद्यालय’ हे समस्त सातारकरांसाठी, तसेच संपूर्ण रयत शिक्षण संस्थेसाठी मानबिंदु आहे. ‘ए प्लस’ मानांकन मिळवण्याची देशातील एकमेव किमया साकार केल्याबद्दल ‘तरुण भारत’ने सचिव-प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी प्राचार्य म्हणून कॉलेजचा विद्यार्थी, स्टाफ, कर्मचारी या साऱयांचे प्रतिनिधित्व करतो आणि ते माझे कर्तव्य आहे, असे मी समजतो. आपण कर्मवीरांच्या विचारांचे वारस आहोत, त्यांनी दिलेल्या मार्गानेच कॉलेजचचा वारसा पुढे चालवत आहे. आमच्या सगळ्यांच्या कष्टाला फलित मिळाले आहे असंच वाटत आहे. ‘ए प्लस’ नामांकन म्हणजे या लढाईतल्या विजयाचे बिगुल वाजल्यासारखेच होते. आनंदाचे उन्माळे वाहत होते, इथल्या प्रत्येकाला प्रयत्नांचे चिज झाले असेच वाटत होते. मात्र, ‘तरुण भारत’ला डीजे वाजवल्याची बातमी येणे म्हणजे साऱया आनंदाला तिट लावल्यासारखं होतं. याने मन खूपच हेलावून गेलं. असो, ‘तरुण भारत’ला आमच्या उणिवा दाखवण्याचा निश्चितच अधिकार आहे, आणि त्यांनी तो दाखविला. आता त्यावर अधिक भाष्य करण्यापेक्षा आमच्या निस्सीम कामाचे कौतुक करायलाही पहिल्यांदा ‘तरुण भारत’च सरसावला असल्याचे मी आवर्जुन नमूद करतो, असेही डॉ. कराळे म्हणाले.

  इंग्रजांच्या जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो सत्याग्रह सुरू होता, त्याचवेळी अज्ञानाच्या जोखडातून बहूजन मुक्त व्हावा म्हणून एक असामान्य व्यक्तिमत्व कार्यरत होतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी याच दरम्यान, त्यांचे पहिले महाविद्यालय साताऱयात सुरू केले. ‘प्रसंगी बापाचं नाव बदलीन; पण कॉलेजचं नाव बदलणार नाही’ अशा पहाडी गर्जनांच्या मुशितून तावून सुलाखून तयार झालेलं हे महाविद्यालय याचवर्षी नॅक नामांकनाच्या निमित्ताने यशस्वीतेच्या उंच शिखरावर स्थानापन्न झाले आहे. 18-19 सप्टेंबर 2017 रोजी प्रा. डॉ.आर.एस.शर्मा (हरियाणा), प्रा. सुसमीत प्रसाद पानी (ओडीसा), प्राचार्य स्नेह लता रैना (हिमाचल प्रदेश) यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, भौतिक सुविधा यांची पाहणी करून संस्थेचे व्यवस्थापन, महाविद्यालयाचे आजी व माजी विद्यार्थी, पालक यांच्या विस्ताराने संवाद साधून महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट ‘ए प्लस’ मानांकन प्राप्त झाले आहे.

 छत्रपती शिवाजी कॉलेजने महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात गेली 70 वर्षे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे महाविद्यालय म्हणून आपला लौकिक प्राप्त केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी महाविद्यालयास ‘सीपीई’ हा दर्जा दिला असून शिवाजी विद्यापीठाचे अग्रणी महाविद्यालय म्हणून गेली अनेक वर्षे छत्रपती शिवाजी कॉलेज नेतृत्व करीत आहे.

  महाविद्यालयाचे मूल्यांकनावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र राज्यातील सर्वोत्कृष्ठ मार्गदर्शन केंद्र म्हणून ओळखले जाते असून या केंद्रातून 563 विद्यार्थी महाराष्ट्राच्या प्रशासकीय क्षेत्रात सहभागी झाले आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली ‘कमवा आणि शिका’ योजना हे या महाविद्यालयचे बलस्थान असून यातून हजारो विद्यार्थींनी शिक्षण पुण्& केले आहे. याच महाविद्यालयातील युवक कल्याण कक्ष हे कौशल्य विकासाचे शिक्षण देणाऱया केंद्रातून 2000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्राचे कौशल्य दिल्याने अनेक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत.अनेक प्राध्यापकांनी संशोधनाच्या क्षेत्रात मायनर व मेजर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण करत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून आपले शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.  अनेक प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर तसेच इतर विविध अधिकार मंडळावर महत्वाची जबाबदारी पूर्ण केली आहे.  प्राचार्य डॉ.भाऊसाहेब कराळे हे उच्च दर्जाचे संशोधक म्हणून लौकिक प्राप्त झालेले व्यक्तिमत्व आहे. आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम.फिल आणि पीएच.डी पदवी अनेक विद्यार्थ्यांनी संपादन केली असून त्यांचे अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून 122 शोधनिबंध प्रशिध्द  झाले आहेत. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ ही महाविद्यालयाचा शक्तीस्थळ असून या माध्यमातून आजच्या प्रगतशील भारताच्या जडण-घडणीला उपयुक्त ठरणारा विद्यार्थी घडविण्याचे काम या महाविद्यालयातून सातत्याने केले जात आहे. ही गोष्ट मध्यवर्ती ठेऊन बेंगलोर येथील नॅक समितीने हे मानांकन दिले आहे.

 

चौकट

हो दिलगिर आहे…..

मनगटातली ताकद वापरून झालेली असते, कपाळावरचा घाम गालापर्यंत ओघळत आलेला असतो. धमण्यातल्या रक्तात कमालीचा वेग असतो त्याचवेळी विजयाचा बिगुल वाजतो तेंव्हा जी कर्तत्चाची बेभान अवस्था असते ना तशीच आम्हा मंडळींची अवस्था झालेली होती. आपण म्हणता तसा डिजे वाजला नाही पण जे काही झाले त्याबद्दल दिलगिर आहेच पण आपणही मान्य केले कि या महान यशापुढे ही बाब किरकोळ आहे त्यामुळे मनाला पुन्हा उभारी आली.

Related posts: