|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उंब्रजमध्ये दरोडेखोरांची पोलिसांनी काढली धिंड

उंब्रजमध्ये दरोडेखोरांची पोलिसांनी काढली धिंड 

प्रतिनिधी/ उंब्रज

गेल्या मंगळवारी 21 नोव्हेंबरला मध्यरात्री दरोडेखोरांनी लागोपाठ टाकलेल्या पाच ठिकाणच्या दरोडा व एका खुनाच्या घटनेने उंब्रज हादरले. या घटनेच्या आठव्या मंगळवारीच (28 नोव्हेंबर) या दरोडेखोरांना 72 तासात जेरबंद करून उंब्रज पोलिसांनी उंब्रज येथे व्यावसायिक अल्ताफ मुल्ला यांच्या बंगल्यात आणले. दरोडय़ाने भयभीत झालेल्या उंब्रजमध्ये या दरोडेखोरांची धिंड काढून पोलिसांनी त्यांची दहशत मोडून काढली. नागरिकांतून पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे कौतुक होत आहे. सकाळी उंब्रज बाजारपेठेतून पोलीस बंदोबस्तात संशयित आरोपींना बेडय़ा घालून धिंड काढत घटनास्थळी मुल्ला यांच्या घराकडे नेण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती.

  जिह्यात खळबळ उडवून देणाऱया उंब्रज (ता. कराड) येथील घटनेतील दरोडेखोरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. जेरबंद आरोपी हे सराईत असून त्यांनी अनेक ठिकाणी दरोडे टाकून खून केल्याचे पोलीस तपासात पुढे येत असल्याने  पोलिसांकडून संशयितांच्या बाबतीत दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी पोलीस निरिक्षक जोतिराम गुंजवटे यांनी पोलीस कर्मचारी, बंदुकधारी कमांडोंचा वापर करून बंदोबस्तात दरोडेखोरांना उंब्रज बाजारपेठेत आणले. तेथून चालवत त्यांना अल्ताफ मुल्ला यांच्या बंगल्याबाहेर चौकशीसाठी नेण्यात आले. त्यावेळी आरोपींनी घटनास्थळ हेच असल्याची कबुली दिली. यावेळी मोठय़ा प्रमाणावर बाजारपेठेत गर्दी झाली होती. पोलिसांच्या गराडय़ात दरोडेखोर व पाठीमागून ग्रामस्थांचा जमाव जात असल्याने तणावाची परिस्थिती होती.

  मंगळवारी मध्यरात्री दरोडेखोर इनोव्हा कारमधून उंब्रज येथे आले होते. कारच्या  चालकाने चौघांना उंब्रज येथील तारळी पुलाजवळ सोडले. तेथून संशयित हे माणिक चौकामार्गे गावात शिरले. मंदिर परिसरातील दोन बंद घरांची कुलपे तोडून त्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र तेथे काहीही न सापडल्याने दरोडखोर बाजारपेठेत घुसले. त्यांनी कन्याशाळेलगत असणाऱया अल्ताफ मुल्ला यांच्या बंगल्याला लक्ष्य केले. एकाने मुल्ला बंगल्याला असलेल्या काचेतून घरात प्रवेश केला. आतील कडी काढून उर्वरित आरोपींना आत घेतले. त्यांनी बंगल्यात इतरत्र शोधाशोध केली मात्र काहीच न मिळाल्याने ते जैबुन करीम मुल्ला (वय 86) या झोपलेल्या खोलीत गेले. त्यांच्या अंगावरील दागिने काढण्यास सुरुवात केली. हातातील बांगडय़ा काढत असताना जैबून मुल्ला यांना जाग आली. त्यामुळे एका दरोडेखोरांने मुल्ला यांच्या तोंडावर हात ठेवला तरीही मुल्ला यांची धडपड सुरू होती. त्यानंतर दरोडेखोरांनी मुल्ला यांच्या तोंडावर उशी दाबून धरून त्यांचा खून केला. या घटनेनंतर लगतच्या बंगल्याचेही दार उघडण्याचा प्रयत्न मात्र ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर दरोडेखोरांनी चाफळरोड येथील संजय मोरकळ यांच्या बंगल्याला लक्ष केले. तेथेही मोरकळ दाम्पत्याने आरडाओरडा केल्याने त्यांनी तारेचे कुंपण तोडून पलायन केले. त्यानंतर दरोडेखोरांनी  शारदा क्लिनीकच्या पाठीमागील कुंभार यांचा बंद असलेल्या बंगल्याचे कुलूप तोडून रोकड व दागिन्यांची लूट केली. जाताजाता त्यांनी महामार्गावरील शिवडे येथील हॉटेल इडली कामतवरही डाका टाकला व तेथील सहा हजाराची रोकड गल्ला फोडून लंपास केली. या चोऱया केल्यानंतर दरोडेखोरांनी कार बोलावून कोल्हापूरला पलायन केले. तेथेही त्यांनी दरोडा टाकला आहे.

बाळू मामाच्या दर्शनाचा बहाणा

बाळूमामाच्या दर्शनासाठी निघालो आहे, असे सांगून दरोडेखोर घरातून बाहेर निघाले होते. त्यांनी श्रीगोंदा, अहमदनगर येथून इनोव्हा कार घेऊन ते नागठाणे येथे आले.  कारचा चालक कोणास संशय येऊ नये म्हणून सोबत कागदपत्रे घेऊन आला होता. तसेच त्याने पत्नीलाही बरोबर आणले होते. या आधारे दरोडखोरांनी नागठाणे येथील एका लॉजवर रुम घेतली. तेथून ते उंब्रजला आले. चालकाने दरोडय़ातील आरोपींना उंब्रजच्या बाहेर सोडले. काम फत्ते झाल्यानंतर तो पुन्हा शिवडे येथे महामार्गावर तो कार घेऊन आला व तेथून कोल्हापूरकडे पोबारा केला. पोलीसांनी सांगितले की दरोडेखोरांपैकी एकाचा मुलगा इंग्रजी शाळेत शिकत आहे. ज्यावेळी त्यांना ताब्यात घेतले, तेव्हा ते कामात व्यस्त होते. यातील संशयित काळ्या या आरोपीने एका गुन्हात तीन वर्षे शिक्षा भोगलेली असून सर्वच सराईत गुन्हेगार आहेत. पाचव्या फरारी आरोपीकडे लूट केलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने असल्याचा संशय आहे. पोलिसांनी अद्याप चोरीस गेलेला मुद्देमाल ताब्यात घेतलेला नाही, मात्र त्या दृष्टीने तपास सुरू आहे. आरोपींनी वापरलेली कार ताब्यात घेतली आहे. 

Related posts: