|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पूर्ववैमनस्यातून पुजाऱयाचा निर्घृण खून

पूर्ववैमनस्यातून पुजाऱयाचा निर्घृण खून 

वार्ताहर/ विजापूर

 जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे व जादुटोणा करून बकऱयांना ठार मारल्याचा संशय घेऊन पुजाऱयाचा खून करण्यात आला. 2 नोव्हेंबर रोजी विजापूर तालुक्यातील खतीजापूर येथे शीर धडावेगळे करून पुजाऱयाचा मृतदेह खड्डय़ात टाकण्यात आला होता. द्यामण्णा सोमप्पा मादर असे मृत पुजाऱयाचे नाव आहे. अखेर या मारेकऱयांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

 यल्लप्पा उर्फ मल्लप्पा श्रीमंत मादर (रा. आळूर, ता. इंडी), सिद्राम उर्फ सिद्दप्पा लक्षुमण क्यातन्नवर (रा. मनगोळी, सध्या कस्तूर गल्ली, विजापूर), भिमण्णा उर्फ मुदकप्पा शरणप्पा मादर व शंक्रेप्पा भिमप्पा मादर (दोघेही रा. हुणश्याळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणाविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, द्यामण्णा हा खतीजापूर गावात देवळाचा पुजारी होता. ग्रामपंचायत निवडणुकीत संशयित भिमण्णा मादर हा उमेदवार म्हणून उभा होता. तर या विरोधात पुजार द्यामण्णा मादर याने आपल्या मोठय़ा भावाच्या मुलाला उभा केले होते. पण भिमण्णा हा ग्रा. पं. निवडणूक जिंकला. यामुळे राग मनात धरून निवडणुकीनंतर द्यामण्णाने भिमण्णाला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

 तसेच शंपेप्पा मादर हा भिमण्णाचा मित्र असल्याने त्याने निवडणुकीत मदत केली होती. याचा राग मनात धरून द्यामण्णने शंपेप्पाच्या 40 शेळय़ावर जादूटोणा करून ठार मारल्याचा संशय होता. यामुळे भिमण्णा व शंपेप्पा या दोघांच्याही मनात द्यामण्णाविषयी अनेक दिवसांपासून राग होता. यामुळे या दोघांनीही 1 लाख रुपयाची सुपारी देऊन द्यामण्णाचा काटा काढण्याचे ठरविले होते.

 यानुसार भिमण्णा याचे मित्र यल्लप्पा मादर आणि सिद्राम क्यातन्नवर यांना खुनाची सुपारी देण्यात आली. अखेर 2 नोव्हेंबर रोजी संधी साधून यल्लप्पा व सिद्राम यांनी द्यामण्णाचा काटा काढला. द्यामण्णाला निर्जन स्थळी नेऊन धारदार कुऱहाडीने त्याचे शीर धडावेगळे केले व धड एका खड्डय़ात टाकून देण्यात आले. यानंतर दोघाही संशयितांनी पोबारा केला.

तपास करणे झाले अवघड

शिर धडावेगळे करण्यात आल्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे विजापूर ग्रामीण पोलिसांना मोठे आव्हान ठरले होते. मात्र मृताच्या खिशातील मोबाईल व आधारकार्ड यामुळे शोध सुरू करून मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. यामुळे खऱयाअर्थाने तपासाला गती मिळाली. यानंतर पोलिसांनी द्यामण्णा मादरच्या कुटुंबीयांशी चर्चा करून संशय व्यक्त केलेल्या शंक्रेप्पा मादर व भिमण्णा मादर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

 प्राथमिक चौकशीत शंक्रेप्पा व भिमण्णा यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी आपण सुपारी देऊन द्यामण्णाचा खून केल्याचे कबूल केले. यानुसार पोलिसांनी यल्लप्पा मादर व सिद्राम क्यातन्नवर यांना अटक केली. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख गुणारी व डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला. सीपीआय आर. एस. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पीएसआय सी. बी. चिकोडी, पोलीस व्ही. एस. नागठाण, एल. एस. हिरेगौडा, एम. एम. मुजावर, एस. एल. पात्रोट यांना तपासात सहकार्य केले.

Related posts: