|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » धर्माच्या दलालांना फुलेंचा कडाडून विरोध

धर्माच्या दलालांना फुलेंचा कडाडून विरोध 

बेळगाव / प्रतिनिधी

धर्माधि÷ित समाज व्यवस्थेकडून कर्मकांडाला वाव देऊन स्वत:चा व्यवसाय चालावा यासाठी सर्वसामान्यांची पिळवणूक करण्यात येत होती. शोषित वंचितांचे दुःख समजून त्याकाळी धर्माच्या दलालांना कडाडून विरोध करण्याची हिंमत ही फक्त महात्मा ज्योतिराव फुल्यांनी दाखविली, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील प्राध्यापक अरुण शिंदे यांनी केले.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ व सहय़ाद्री को- ऑप. सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले व्याख्यानमालेचे भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या प्रांगणात पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म व आजचे स्वरुप या विषयी माहिती दिली. याप्रसंगी व्यासपीठावर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील व सहसचिव प्रा. विक्रम पाटील उपस्थित होते.

तत्कालीन उच्चभ्रू लोकांनी सर्वसामान्यांची दिशाभूल करून त्यांना कर्मकांडाची दिशा दाखविली. त्यामुळे सामान्यजन या कर्मकांडातच अडकून पडू लागला. हे महात्मा फुलेंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या मंडळींची दांभिकता उघडी पाडली. माणसांचा एकच धर्म आहे. तर मानवता हाच खरा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही धर्माने आपली धार्मिक चिकित्सा कोणालाही करू दिली नाही. परंतु महात्मा फुलेंनी आपण केलेल्या धार्मिक चिकित्सेमध्ये काही उणिवा असल्यास त्या दाखवून द्याव्यात, तसेच काळानुरूप त्यामध्ये बदल करावा, असे फुलेंनी सांगितले होते. त्यामुळे त्यांनी मांडलेली धर्माबद्दलची चिकित्सा आजही आपणाला उपयोगी पडते असे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

प्रारंभी ऍड. राजाभाऊ पाटील यांनी स्वागत केले. प्रा. मायाप्पा पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शिक्षण संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्राचार्य आर. के. पाटील यांनी आभार मानले. 

Related posts: