|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीमाप्रश्न सुटावा हीच आमची इच्छा!

सीमाप्रश्न सुटावा हीच आमची इच्छा! 

वार्ताहर / किणये

सीमाप्रश्नासाठी सत्याग्रह आणि कारावास भोगून योगदान दिलेल्यांपैकी मोजकेच सत्याग्रही आज हयात आहेत. भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेच्या या लढय़ात आपले योगदान देत आलेल्या या सत्याग्रहींची दखल किणयेसारख्या छोटय़ा गावातील समिती कार्यकर्त्यांनी घेतली. ‘तरुण भारत’च्या ‘धगधगत्या सीमाप्रश्नाचे महामंथन’ या लेखमालेतून आम्हाला सत्याग्रहींबद्दल माहिती समजली. त्यांच्याकडून प्रेरणा घेवून सीमाप्रश्नाची ज्योत तेवत ठेवणे गरजेचे आहे. यासाठीच त्यांचा हा गौरव समारंभ, अशी भावना या कार्यक्रमात व्यक्त झाली.

सत्याग्रहींच्या गौरवासाठी सर्वप्रथम पुढाकार घेवून किणये विभागीय तालुका म. ए. समितीचे कार्यकर्ते एकत्रित आले. ज्ञानेश्वर को-ऑप. सोसायटीच्या ज्ञानेश्वर सभागृहात मंगळवारी सकाळी हा हृद्य सोहळा झाला. पंचक्रोशीतील दहा सीमासत्याग्रहींना शाल, श्रीफळ व फेटा बांधून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. पं. चे माजी सदस्य सुरेश डुकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष वाय. बी. चौगुले, सरचिटणीस मनोज पावशे तसेच किणये विभाग समितीच्यावतीने ज्ये÷ समिती नेते तानाजी डुकरे आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

प्रारंभी तानाजी डुकरे यांनी प्रास्ताविक केले. 1956, 1958 आणि त्यानंतर झालेल्या साराबंदीच्या लढय़ात ज्यांनी-ज्यांनी योगदान दिले आहे, ते सारे जण लढय़ामध्ये कार्यरत प्रत्येकासाठी प्रेरणास्त्राsत आहेत. त्या लढय़ाची आणि त्यामध्ये सहभाग घेतलेल्या मंडळींची माहिती ‘तरुण भारत’च्या ‘धगधगत्या सीमाप्रश्नाचे महामंथन’ या लेखमालेमुळे सीमावासियांसमोर आली आहे. ही माहिती वाचून शांत बसणे, हे या चळवळीतील कार्यकर्ते म्हणून आम्हाला शोभणारे नाही. यासाठी हा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या सीमासत्याग्रहींचा आशीर्वाद घेवूनच सीमालढय़ाची ज्योत अधिक बळकट केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

उपस्थित सीमासत्याग्रहींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मनोज पावशे यांच्या हस्ते शिवपूजन आणि वाय. बी. चौगुले यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. 1956 च्या सत्याग्रहात किणये गावातून सत्याग्रह केलेल्या 16 जणांच्या तुकडीमधील सीमासत्याग्रही पुन्नाप्पा तातोबा दळवी व कल्लाप्पा ईश्वर गुरव तसेच सीमासत्याग्रही बाळू निंगाप्पा पाटील (बहाद्दरवाडी), शट्टूप्पा हिरामणी कदम (बाळगमट्टी), विठ्ठल नागनगौडा पाटील (रणकुंडये), लक्ष्मण भैरू किणयेकर, माणिक बाबुराव कुंदप, प्रल्हाद विठोबा सांबरेकर (कर्ले), तम्मान्ना व्हन्नाप्पा पाटील (कंग्राळी बुद्रुक) आणि नारायण महादेव राऊत (पिरनवाडी) यांचा यावेळी हृद्य गौरव करण्यात आला.

यानंतर बोलताना मनोज पावशे यांनी, या सीमासत्याग्रहींचे पाय धुवून पाणी पिले तरी कमी होईल, असे उद्गार काढले. तरुण भारतने ही मालिका प्रसिद्ध करून या सत्याग्रहींना पुन्हा एकदा त्यांचे स्थान मिळवून दिले आहे. आजवर कोठेही त्यांचा गौरव झाला नव्हता. किणये भागातील समिती नेते व कार्यकर्त्यांनी तशी इच्छा व्यक्त करून कमी वेळेत हा गौरव समारोह आयोजित केला. याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. या सीमासत्याग्रहींनी सोसलेल्या हालअपेष्टा, कारागृहात सोसलेल्या यातना आजही ऐकल्या की डोळय़ांतून पटकण पाणी येते. आम्ही त्यानंतरच्या पिढय़ांनी कोणताच त्याग केलेला नाही. यासाठी सीमाप्रश्नी सतत प्रामाणिक राहून रस्त्यावरील लढाई सुरू ठेवणे हेच कर्तव्य जोपासावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

कार्याध्यक्ष वाय. बी. चौगुले यांनी बोलताना आपला संसार, पोटपाणी, कामधंदा सारे काही सोडून देऊन सीमाप्रश्नी कारावास भोगलेल्या सत्याग्रहींचे तसेच साराबंदी चळवळीत आघाडी घेतलेल्या मंडळींचे योगदान गौरवास्पद आहे. त्यांचा त्याग व समर्पण याची जाण ठेवून युवापिढीने राष्ट्रीय पक्षांच्या मोहजालात अडकून पडू नये, असे आवाहन केले.

सुरेश डुकरे यांनी अध्यक्षीय भाषणात, ही वडीलधारी मंडळी आम्हा सर्व सीमावासियांसाठी स्फूर्ती देणारी आहेत. त्यांचे योगदान मोलाचे आहे. आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंडय़ाखाली प्रत्येकाने एकत्र येवून सीमालढय़ाला बळकटी देण्याची गरज आहे. सीमाप्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात असताना आपण एकत्रित राहून लढा द्यायला हवा, असे उद्गार काढले.

प्रारंभी सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे ईशस्तवन व स्वागतगीत झाले. सूत्रसंचालन समरसेन पाटील यांनी केले. कार्यक्रमात सातेरी पाटील, नामदेव सांबरेकर, राजेंद्र पाटील, यशवंत गुरव, पिराजी मुचंडीकर, पुंडलिक पावशे, व्यंकट शहापूरकर, रामलिंग गुरव, शंकर पाटील, अणवरबेग जमादार, बाबू हरिजन, मेघो बिर्जे, नंदराज कर्लेकर, विवेक कदम, प्रदीप कदम, संजय पाटील, नवनाथ खामकर, प्रभाकर पाटील, शशिकांत सडेकर, निंगाप्पा पाटील, दत्तात्रेय शिंदे, बाळगौडा पाटील, लक्ष्मण मंडलिक, गुंडू बिर्जे, अनंत पाटील, सीताराम पाटील, जय जितेंद्र कुंदप, सचिन मंडोळकर, सागर बिर्जे आदींसह किणये, बहाद्दरवाडी, शिवनगर, कर्ले, जानेवाडी, रणकुंडये, नावगे, बामणवाडी, संतिबस्तवाड, बाळगमट्टी, हुंचेनट्टी, पिरनवाडी आदी भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

बॉक्स करणे

तरुण भारतचा विशेष गौरव

सीमाप्रश्नाची ज्योत सतत तेवत ठेवण्यासाठी तरुण भारतने मोठे योगदान दिले आहे. आजही नव्या पिढीमध्ये जागृती करण्यासाठी ‘धगधगत्या सीमाप्रश्नाचे महामंथन’ ही मालिका सुरू केली आहे. असा उल्लेख करून कार्यक्रमात तरुण भारतचा गौरव करण्यात आला. हा लढा आजवर जिवंत राहण्यासाठी तरुण भारतचे योगदान महत्त्वाचे असल्याचे ज्ये÷ नेते तानाजी डुकरे व सुरेश डुकरे यांनी सांगितले.

चौकट करणे

घोषणांनी गाव दुमदुमले

या कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्ते व नेते मंडळींनी सीमाप्रश्नाच्या घोषणांनी किणये गाव दुमदुमून टाकले. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मैं नही तो जेलमे, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात येत होत्या. सीमासत्याग्रहींचा गौरव करताना तरुण कार्यकर्त्यांनी त्यांना घोषणांचीच सलामी दिली.

चौकट करणे

सीमाप्रश्न सुटावा हीच आमची इच्छा

या हृद्य गौरवाने सीमासत्याग्रही भावूक झाले होते. वयाची 80 वर्षे ओलांडलेल्या या मंडळींच्या शरीरात कार्यक्रमाच्या वातावरणाने पुन्हा चैतन्य संचारले होते. कार्यक्रमानंतर आपले मनोगत मांडताना हा सीमाप्रश्न सुटावा हीच आमची इच्छा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

 

Related posts: