|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अंधत्व निवारणमध्ये सिंधुदुर्ग राज्यात ‘नंबरवन’

अंधत्व निवारणमध्ये सिंधुदुर्ग राज्यात ‘नंबरवन’ 

डॉ. कुलकर्णी दांपत्यांच्या कामाचे चिज

आठवडय़ात चार ते पाच दिवस चालते शस्त्रक्रियांचे काम

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात शासकीय रुग्णालयांना वैद्यकीय अधिकाऱयांची कमतरता हा एक नेहमीचाच विषय झालेला आहे. मात्र, अशातही उपलब्ध डॉक्टरांनी मन लावून सेवा केल्यानंतर त्या सेवेचे कसे चिज होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभागाच्या कामाचा उल्लेख करावा लागेल. मोतीबिंदू वा तत्सम उपचारांसाठी शासकीय दवाखान्यांत येणाऱया रुग्णांना कॅम्पसाठी अन्यत्र नेणे वा बाहेरून डॉक्टर येऊन कॅम्प घेऊन उपचार करणे, शस्त्रक्रिया करणे असा एक पायंडाच पडला होता. मात्र, डॉ. अमर कुलकर्णी व त्यांच्या पत्नी डॉ. उमा बालकृष्णन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आठ महिन्यांतच सिंधुदुर्गने राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमात राज्यात नंबर 1 वर झेप घेतली आहे.

सिंधुदुर्गच्या शासकीय वैद्यकीय क्षेत्रात तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यावर शासनाकडून धोरणात्मक निर्णय होऊन कार्यवाहीची अपेक्षा आहे. मात्र, हे जरी खरे असले तरीही डॉ. कुलकर्णी दांपत्यांसारखे डॉक्टर ज्यावेळी उपलब्ध होऊन काम करतात, त्यावेळी या कामाची दखलही घेतली गेली पाहिजे, हे तेवढेच खरे आहे.

जिल्हा रुग्णालयात नेत्र शल्य विशारद म्हणून डॉ. अमर कुलकर्णी व त्यांच्या पत्नी डॉ. उमा बालकृष्णन यांनी मार्च 2017 मध्ये पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र शल्य चिकीत्सा विभागात केवळ मोतीबिंदूच नव्हे तर काचबिंदू, मायनर सर्जरी आदी उपचार करण्यास सुरुवात केली. याठिकाणी आठवडय़ातून चार ते पाच दिवस आपण ‘ओटी’ चालवितो, असे डॉ. कुलकर्णी अभिमानाने सांगतात.

सिंधुदुर्गमध्ये यापूर्वीचा सरासरी विचार केल्यास मोतिबिंदू अथवा तत्सम उपचारासाठी जिल्हय़ात ठराविक कालावधीनंतर कॅम्प आयोजित करण्यात येत असत. यासाठी जिल्हाबाहेरून अथवा अन्य उपलब्ध डॉक्टरांच्या माध्यमातून ही कार्यवाही होत असे. त्यानंतर काही कालावधी येथील रुग्णांना एकत्रित करून या उपचारांसाठी मिरज, कोल्हापूर आदी ठिकाणी नेण्याबाबतची कार्यवाहीही करण्यात येत असे.

मात्र, एप्रिलनंतर ही कार्यवाही बंद झाली आहे. डॉ. कुलकर्णी दांपत्यांकडून आठवडय़ातून चार किंवा गरज भासल्यास पाच दिवसही या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. एप्रिल 2017 ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत जिल्हा रुग्णालयाच्या मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे प्रमाण 936 पर्यंत झाले होते. नोव्हेंबरअखेर ते 950 च्याही पुढे गेले आहे. तर हे दांपत्य जिल्हय़ात कार्यरत झाल्यानंतर मार्च 2017 पासून आतापर्यंतचा विचार केल्यास एक हजारच्यावर हा आकडा जातो. 2017-18 साठी सिंधुदुर्ग जिल्हय़ाला 1173 मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे टार्गेट देण्यात आलेले होते. त्याचा विचार करता या जिल्हा एक पाऊल पुढेच आहे. डॉ. कुलकर्णी दांपत्याने एमबीबीस जीएमसी येथे केले असून पीजी म्हैसूर मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण केले. दोन वर्षे हुबळी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर ते जिल्हा रुग्णालयात रुजू झाले आहेत.

ऑक्टोबर 2017 अखेर राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमात आपला जिल्हा राज्यात नंबर 1 वर पोहोचला असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. तर याकामी आम्हाला जिल्हा शल्य चिकीत्सकांचे चांगले मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचे डॉ. अमर कुलकर्णी यांनी सांगितले. यापूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये जिल्हा अनेकदा पहिल्या तीनमध्ये असायचा. मात्र, आता नेत्र शस्त्रक्रियांमध्ये या जिल्हय़ाने टाकलेले पाऊल हे कौतुकास्पद असेच आहे.

Related posts: