|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » दशावतारी कलाकारांना हवाय राजाश्रय!

दशावतारी कलाकारांना हवाय राजाश्रय! 

आज गोव्यातील कलाकारांना कला व संस्कृती खात्यातर्फे यथायोग्य मानधन मिळते परंतु या कोकणातील कलाकारांना महाराष्ट्र सरकारकडून तुटपुंजे मानधन लाभत असल्याने गोवा सरकारने या कलाकारांची दखल घेणे योग्य ठरते.

डिसेंबर महिन्यात थंडीचे आगमन होताच प्रत्येक गोमंतकीयांना वेध लागतात ते आपआपल्या गावातील देवस्थानातील जत्रोत्सवाचे. गोव्यात ज्याप्रमाणे उदंड देवस्थाने आहेत त्याप्रमाणे हजारोंच्या संख्येने जत्रा होत असतात. प्रत्येक देवस्थानच्या वार्षिक उत्सवाबरोबरच जत्रोत्सवही ठरलेला. माहेरवाशिणी वर्षातून एकदा आपल्या माहेरच्या ग्रामदेवतेची जत्रोत्सवाच्या निमित्ताने ओटी भरतात. जत्रोत्सवाच्यानिमित्ताने जणू गावकरी मेळाच भरला जातो. कोकण प्रांताबरोबरच गोव्यात जत्रोत्सव प्रकार होतो. जत्रोत्सवाला काही ठिकाणी कालोत्सवही संबोधला जातो.

सिंधुदुर्गचे मालवणी कवी दादा मडकईकर यांनी जत्रेवर तर सुंदर कविता रचलेली आहे. ‘आयज आमची जत्रा, बाबान मारलो बकरा, सगळेंजाण येतले वडे-सागोती खातले’… ही त्यांची कविता गाजलेली आहे. खरोखरच जत्रोत्सव हा प्रकार कोकणाबरोबरच गोव्यातही होतो. यानिमित्ताने प्रत्येकाच्या घरात सग्या-सोयऱयांची उपस्थिती असते. त्यांचे यथोचित स्वागत व उठ-बस होते. त्यांना प्रेमापोटी ‘खाजे’ हा गोड खाद्यपदार्थ दिला जातो. गोव्यात तर जत्रोत्सव व खाजे असे जणू समीकरण असते.

गोव्यातील जत्रोत्सव यशस्वी करण्यास कोकणातील दशावतारी कलाकारांचा सहभाग महत्त्वाचा असतो. कोकणात व गोव्यात दशावतारी नाटकाला खऱया अर्थाने दाद मिळते. दशावतारी नाटकाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे नाटकात काम करणाऱयांना फक्त कथानक सांगितले जाते. त्यांचे संवाद ही कलाकार मंडळी स्वत:च तयार करतात आणि तेही उत्स्फूर्त असतात. त्यामुळे ही कला खऱया अर्थाने ‘ग्रेट’च म्हणावी लागेल. हे कलाकार उच्च शिक्षित नसतात मात्र त्यांचे पौराणिक ग्रंथवाचन चांगले असते आणि या बळावरच ते आपली कला रसिकांसमोर न भीडता सादर करतात आणि तेही प्रॉम्टिंगविना. खरे सांगायचे म्हणजे त्यांच्याच कलेतून गोव्यातील जत्रोत्सव खऱया अर्थाने परिपूर्ण होत असतो. अल्पशा मानधनावर दशावतारी कला गोव्यात सादर करतात. त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठीं गोवा सरकारने त्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. आज गोव्यातील कलाकारांना कला व संस्कृती खात्यातर्फे यथायोग्य मानधन मिळते परंतु या कोकणातील कलाकारांना महाराष्ट्र सरकारकडून तुटपुंजे मानधन लाभत असल्याने गोवा सरकारने या कलाकारांची दखल घेणे योग्य ठरते.

काही दशावतारी कलाकार तर असाध्य आजाराने त्रस्त असून हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांनाही आधार देणे योग्य ठरते. कोकणातील एका दशावतारी कलाकाराने तर आपली खंत व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, आपण जर गोव्यात जन्म घेतला असता तर गोवा सरकारने आपल्या कलेची खऱया अर्थाने कदर घेतली असती व आम्हाला योग्य ते मानधन मिळाले असते परंतु महाराष्ट्र सरकारकडून आम्हाला योग्य मानधन मिळत नसून आमची उपेक्षाच होते. गोव्यात आपले योगदान देणाऱया या कोकणातील कलाकारांची दखल गोवा सरकारने घेणे उचितच ठरते. सत्तरी व पेडणे तालुक्यात दशावतारी कलेची निर्मिती होत आहे. त्यांनाही गोवा सरकारने प्रोत्साहन देणे योग्य ठरते. कला व संस्कृती खाते गोविंद गावडे यांच्याकडे आल्यानंतर कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने त्यांनी चांगली पावले उचलली आहेत. हौशी रंगभूमीवरील नाटकांनाही प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने त्यांनी योजना  आखली आहे. दशावतारी कलेचीही त्यांनी दखल घेऊन या कलाकारांना गोवा सरकारतर्फे योग्य तो न्याय द्यावा, अशी विनंती आहे.

गोवा हा खऱया अर्थाने उत्सवप्रिय आहे. शिमगो, कार्निव्हलसारख्या उत्सवाबरोबरच 365 दिवसही कार्यक्रमांनी परिपूर्ण म्हणून गोमंतकीय भूमीची ओळख आहे. नाटय़वेडा म्हणूनही गोवा ओळखला जातो. मंदिरांबरोबरच विविध चर्चेसमध्ये कार्यक्रम होत असतात.

प्रत्येक देवस्थानचा जत्रोत्सवही वैशिष्टय़पूर्ण असतो. गोव्यात सर्वांत मोठी जत्रा भरते ती शिरगावच्या देवी लईराईची. यावेळी होणारा उत्सव होमकुंड प्रसिद्ध आहे. गोव्यातील उत्तरेस असलेल्या शिरगावच्या देवी लईराईची जत्रा अग्निदिव्याची जत्रा म्हणून केवळ गोव्यातच नव्हे तर गोमंतकाबाहेरही प्रसिद्ध आहे. इतर कोणत्याही जत्रेपेक्षा या जत्रेचे स्वरुप काही वेगळेच. सर्वसाधारण जत्रांतील बहुतेक रितीरिवाज या जत्रेतही असतो. त्याशिवाय देवीच्या भक्तांनी (धोंडांनी) उघडय़ा पावलांनी धगधगत्या निखाऱयावरून अग्निकुंडातून चालत जाण्याचा रोमहर्षक कार्यक्रम हेच या जत्रेचे खास वैशिष्टय़ होय. श्रीस्थळ-काणकोण येथील मल्लिकार्जुन मंदिरात साजरा केला जाणारा ‘शिर्षारान्नी’, पैंगीण येथील ‘टका’ उत्सव व ‘गडय़ांची जत्रा’ही प्रसिद्ध आहे. ‘पुरुमेताचें फेस्त’ हा देखील गोमंतकीय लोकजीवनाचा भाग आहे. सर्व प्रकारच्या संसारोपयोगी वस्तू एकत्रित स्वरुपात मिळण्याचे ठिकाण म्हणून त्याकडे पाहिले जाते.

जत्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक गोमंतकीय व बिगर गोमंतकीय आपला व्यवसाय थाटतात. जत्रोत्सव हा त्यांच्यासाठी रोजी-रोटीचा मार्ग ठरतो. गोव्यातील काही जत्रोत्सवात फेरी तर अनेक दिवस चालते. मुख्य व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱया बार्देश तालुक्यातील म्हापसा येथील देव बोडगेश्वर देवस्थानचा महान जत्रोत्सव म्हणून गणला जातो व फेरीही अनेक दिवस चालते. जत्रोत्सवामुळे खऱया अर्थाने अनेकांना रोजगाराचे साधनही उपलब्ध झालेले आहे. यामुळे काही कुटुंबीय जत्रेच्या फेरीत व्यवसाय उभारून आपला उदरनिर्वाह
चालवतात. 

परशुराम भूमी म्हणून प्रसिद्ध असलेली गोमंतकीय संस्कृती खऱया अर्थाने जत्रोत्सवाच्यारुपाने उत्तरोत्तर बहरत आहे. ही परंपरा अखंडपणे पुढे चालू राहावी, यादृष्टीने गोमंतकीयांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते.

Related posts: