|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कलंदर कलाकार आणि तुम्हीआम्ही

कलंदर कलाकार आणि तुम्हीआम्ही 

अव्वल कलाकार कलंदर असतात, मनस्वी असतात. त्यांच्या उत्तम निर्मितीला दाद देताना आपण कलाकाराचे लाड करतो. त्याचे वागणे सहन करतो. पण या सहन करण्याची मर्यादा किती असावी? की अजिबात नसावी? कलंदर कलावंतांची सहज आठवणारी काही उदाहरणे

आपल्याकडे एक जगप्रसिद्ध वाद्यवादक होऊन गेले. अभिजात कार्यक्रमात आमंत्रण आले म्हणजे ते प्रवासखर्च आणि भरपूर मानधन घेत, बरोबर शिष्यांचा गोतावळा घेऊन येत. एका प्रसंगी शिष्यासाठी शंभर प्लेट बिर्याणी मागवल्याची आख्यायिका वाचनात आली होती. दुसरे एक गायक-नट रंगभूमीवर वास्तववाद आणण्यासाठी अवाच्या सव्वा खर्च करीत. त्यापायी नाटक कंपनी कर्जात बुडाली. बेहिशेबी वागण्यावरून आचार्य अत्र्यांनी या गायक-नट कलाकाराची जाहीर कानउघडणी केली होती. पण व्यर्थ, वृद्धपण हलाखीतच गेले या नटवर्यांचे. तीनेक दशकांपूर्वी एक रहस्यकथाकार लोकप्रियतेच्या शिखरावर होते. दरमहा सात कादंबऱया लिहीत आणि त्याचे भरपूर मानधन घेत. मानधन इतके मिळत असे की त्यातून चैनीने संसार चालवून शिवाय त्यांनी सात महिला लेखनिक ठेवल्या होत्या. त्या लेखनिकांना कादंबऱयांचे डिक्टेशन देत. सातऐवजी पाच लेखनिक ठेवल्या असत्या आणि दोन कादंबऱया हाताने लिहिल्या असत्या तर थोडी बचत झाली असती. पण ते होणे नव्हते. वृद्धपणी त्यांनी देखील सरकारकडे तोंड वेंगाडून फुकट घर मिळवले आणि फेसबुकवर तसेच मदतीचे आवाहन करून वाचकांकडून काही लक्ष रुपये मदत मिळवली.

वरील तीन उदाहरणे खिन्न करणारी आहेत, पण विल्यम सॉमरसेट मॉमच्या ‘द मून ऍन्ड सिक्सपेन्स’ या कादंबरीतले उदाहरण अधिक भयानक आहे. प्रत्यक्ष होऊन गेलेल्या एका चित्रकाराच्या आयुष्यावरील या कथेत चार्ली हा कलंदर चित्रकार भुकेकंगाल अवस्थेत असताना डर्क स्ट्रोव्ह नावाचा मित्र त्याच्यावर दया करतो आणि त्याला घरी आणतो. एक दिवस चार्ली डर्कच्या बायकोला फूस लावून नेतो आणि काही दिवसांनी वाऱयावर सोडून देतो. त्याच्या या वागण्यामुळे त्याच्या कलेवर प्रेम करणाऱया एका कुटुंबाची बदनामी आणि वाताहत होते. हे इंग्रजी कथेतले आहे म्हणून काल्पनिक नाही म्हणता येणार. आपल्याकडे देखील कलंदर कलावंतांच्या अशा वागण्याचे जवळच्या लोकांना चटके बसत असतीलच. फक्त उजेडात येत नसतील.

यावर आपल्यापुरता उपाय एकच. चांगल्या कलावंताशी प्रेमाने वागावे, शक्मय तेवढी मदत करावी. पण आधी प्रपंच सांभाळावा नेटका.

Related posts: