|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पिंगुळीला भीषण अपघातात दोघे गंभीर

पिंगुळीला भीषण अपघातात दोघे गंभीर 

डंपरची रिक्षा धडक : धडकेनंतर डंपर उलटला, रिक्षाचा चक्काचूर

वार्ताहर / कुडाळ :

मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी-मोडकावड पुलानजीक डंपरने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात तीन आसनी रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक व रिक्षातील प्रवासी महिला गंभीर जखमी झाली. यात डंपर रस्त्यावर उलटला, तर रिक्षाचा पूर्ण चक्काचूर झाला. ही घटना बुधवारी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास घडली. डंपर चालकाने मद्यपान केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्याची वैद्यकीय तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

रिक्षाचालक गुरुनाथ मधुकर पिंगुळकर (62) व प्रवासी महिला सुरेखा सुरेश मोडक (40, दोन्ही रा. पिंगुळी-धुरीटेंबनगर) अशी जखमींची नावे आहेत. पिंगुळकर यांना म्हापसा-गोवा येथील व्हिजन रुग्णालयात, तर मोडक यांना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गुरुनाथ पिंगुळकर आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन पिंगुळीहून कुडाळच्या दिशेने येत होते. त्यांच्या रिक्षातून फुले-केळी विक्रीचा फिरता व्यवसाय करणाऱया मोडक कुडाळला येत होत्या. ओसरगाव येथील डांबर प्लॅन्टवरून हॉटमिक्स खडी घेऊन डंपर बांद्याच्या दिशेने जात होता. डंपर मिरेश गंगाराम खरात (38, रा. सावडाव-धनगरवाडी, कणकवली) चालवित होता. महामार्गावर पिंगुळी-मोडकावड येथे भरधाव वेगात असणाऱया डंपरची धडक त्या रिक्षाला समोरून बसली.

जखमी पिंगुळकर व श्रीमती मोडक यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. सौ. एस. पी. पंडित यांनी प्राथमिक उपचार केले. पिंगुळकर यांच्या डाव्या हाताला व डोक्याला, तर मोडक यांच्या खांद्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली.

                सुदैवाने मोठा अनर्थ टळला

डंपर चालकाचे डंपरवर नियंत्रण नव्हते. या घटनेपूर्वी डंपरची एका रिक्षाला व मोटारसायकलला धडक बसणार होती, तर शालेय विद्यार्थ्यांना कुडाळला घेऊन येणारी व्हॅन अन्य काही विद्यार्थ्यांना घ्यायला आतील रस्त्याला वळली आणि क्षणातच हा अपघात घडला. सुदैवानेच मोठा अनर्थ टळला.

अपघातानंतर पिंगुळी ग्रामस्थ व रिक्षा व्यावसायिकांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपर चालक तेथेच होता. काहींनी त्याला प्रसाद देत आपला संताप व्यक्त केला. तो चालक दारूच्या नशेत असून त्याची वैद्यकीय तपासणी करावी, अशी मागणी जि. प. माजी अध्यक्ष विकास कुडाळकर व ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांच्याकडे केली.

               मद्यप्राशन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार अनिल कदम व अजितकुमार पाटील यांनी पंचनामा केला. डंपर चालक खरात याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर पोलिसांनी त्याच्यावर मद्यप्राशन करून रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने वाहन चालविल्याप्रकरणी भादंवि कलम 279, 337, 338 तसेच मोटर वाहन ऍक्ट 184, 185 अन्वये गुन्हा दाखल केला.

Related posts: