|Saturday, March 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राहुलचा जीएसटी म्हणजे ग्रँड स्टुपिड थॉट

राहुलचा जीएसटी म्हणजे ग्रँड स्टुपिड थॉट 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर घणाघात  प्रचार पोहचला शिगेला

सुरत

जीएसटीला गब्बर सिंग टॅक्स ठरविणाऱया राहुल गांधी यांच्यावर मोदींनी मोठा प्रतिहल्ला चढविला आहे.  ज्यांनी केवळ देशाला लुटण्याचेच काम केले, त्यांना दरोडेखोरांचेच विचारच सुचणार. नव्याने उदयास आलेला एक अर्थतज्ञ सर्व वस्तूंवर एकाच दराने जीएसटी लागू करण्याचा प्रचार करीत आहे. हा जीएसटी म्हणजे ‘ग्रँड स्टुपिड थॉट’ आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी मोरबीच्या जाहीर सभेत केली. सर्व वस्तू आणि सेवांवर 18 टक्के कर ठेवण्याची सूचना बालीशपणाची आहे. चैनीच्या आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंना एकच कर लावणे अन्यायकारक ठरेल हे या अर्थतज्ञाला  कळतच नाही, असा टोला मोदींनी राहुल गांधी यांचे नाव न घेता लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अन्य मुद्दय़ांवरूनही काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढविला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या सोमनाथ मंदिर भेटीवरून त्यांनी निशाणा साधला. गुजरातच्या प्राची येथील जाहीर सभेत बोलताना मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सोमनाथ मंदिराचे विरोधक ठरविले. काही लोक आज सोमनाथचे स्मरण करत आहेत, परंतु ते इतिहास विसरले असावेत, सोमनाथमध्ये मंदिर उभारण्यास देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचा विरोध होता. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद सोमनाथ मंदिराचे अनावरण करण्यासाठी गेल्याने नेहरू त्यांच्यावर चिडले होते अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढविला.

पटेलांमुळेच मंदिर

सरदार वल्लभभाई पटेल नसते तर सोमनाथ मंदिर कधीच उभे राहू शकले नसते. राहुल यांच्या कुटुंबातील सदस्य आणि देशाचे पहिले पंतप्रधानच मंदिराच्या विरोधात होते. तरीही पटेलांनी मंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण केले. सरदार पटेल यांनी नर्मदा नदीचे पाणी सौराष्ट्रात आणण्याचे स्वप्न पाहिले, परंतु गांधी कुटुंबानेच त्यात खो घातल्याची टीका मोदींनी केली.

काँग्रेस सैन्यविरोधी

मोदींनी सैनिकांच्या वन रँक वन पेन्शनवरून देखील काँग्रेसला प्रश्न विचारले. काँग्रेसने या मुद्यावर काहीच केले नाही. काँग्रेस पक्ष देशाच्या सैन्याच्या विरोधात आहे का असे मी विचारू इच्छितो? ओआरओपीची अंमलबजावणी 40 वर्षापर्यंत प्रलंबित का ठेवण्यात आली? एका मागोमाग काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले, परंतु या मुद्यावर त्यांच्याकडून काहीच केले गेले नाही. निवडणूक जवळ येताच काँग्रेस सरकारने हजारो कोटींच्या जागी केवळ 500 कोटी रुपये देण्याची घोषणा केली, अशी टीका त्यांनी केली.  

ओबीसी आयोग

काँग्रेस गुजरातमध्ये ओबीसी समुदायाची मते मिळवू इच्छिते. परंतु ओबीसी आयोगाला आतापर्यंत घटनात्मक दर्जा का दिला नाही याचे उत्तर काँग्रेस देणे टाळते, असा आरोप त्यांनी केला.

Related posts: