|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » वनडे, टी-20 साठी लंकेचे नेतृत्व थिसाराकडे

वनडे, टी-20 साठी लंकेचे नेतृत्व थिसाराकडे 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Qभारताविरुद्ध लवकरच खेळवल्या जाणाऱया वनडे व टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकन संघाचे नेतृत्व अष्टपैलू थिसारा पेरेराकडे सोपवले गेले आहे. 3 सामन्यांची वनडे व 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत तो लंकन संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळेल. सलामीवीर फलंदाज उपूल थरंगाऐवजी यावेळी लंकन निवडकर्त्यांनी थिसाराला पसंती दिली. यापूर्वी, जुलै-ऑगस्टमध्ये घरच्या भूमीत झालेल्या मालिकेत यजमान लंकन संघाचा भारताविरुद्ध 5-0 असा धुव्वा उडवला, त्यावेळी थरंगाकडेच नेतृत्वाची धुरा होती. उभय संघात सध्या कसोटी मालिका सुरु असून दिल्लीतील तिसऱया व शेवटच्या कसोटीनंतर मर्यादित षटकांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे.

यापूर्वी, आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत लंकेचे प्रदर्शन अतिशय खराब झाले. त्यानंतर निवडकर्त्यांनी नेतृत्वाची धुरा थरंगा व दिनेश चंडिमल यांच्याकडे विभागून दिली. थरंगाकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटची तर चंडिमलकडे कसोटी नेतृत्वाची धुरा सोपवली गेली. वास्तविक, थरंगा फलंदाजीत लक्षवेधी प्रदर्शन साकारु शकला. पण, नेतृत्वाच्या आघाडीवर त्याच्या बाबत अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले. 2017 मध्ये फलंदाजीत त्याने 22 वनडेत 47 च्या सरासरीने 800 पेक्षा अधिक धावा जमवल्या. शिवाय, यात 2 शतके व 5 अर्धशतकांचा समावेश राहिला. पण, दक्षिण आफ्रिका, भारत व पाकिस्तानविरुद्ध लंकेचा व्हॉईटवॉश झाल्याने थरंगाचे कर्णधार या नात्याने अपयश अधोरेखित झाले.

या व्हॉईटवॉशमुळे 2019 विश्वचषकासाठी थेट पात्र होण्याच्या लंकेच्या आशाअपेक्षांना देखील मोठा सुरुंग लागला. त्यातच षटकांच्या संथ गतीचा त्याला काही वेळा फटका बसला. मागील महिन्यात लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात न खेळण्याचा निर्णयही त्याने घेतला होता.