|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत वाळू तस्करांचा तलाठय़ावर हल्ला

मिरजेत वाळू तस्करांचा तलाठय़ावर हल्ला 

प्रतिनिधी/ मिरज

बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडून तो मिरज तहसील कार्यालयाकडे आणत असताना तलाठी पोपट ओमासे यांच्यावर चौघा अज्ञातांनी हल्ला केला. त्यांना जबर मारहाण करुन त्यांचा मोबाईल घेउढन ट्रकसह पोबारा केला. कळंबी ते सिध्देवाडी दरम्यान घटना घडली. या घटनेचा महसूल कर्मचाऱयांनी निषेध केला असून, बेमुदत कामबंद आंदोलन केले आहे.

मिरज महसूल विभागामार्फत बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱयांविरोधात मोहिम सुरू आहे. तहसीलदार शरद पाटील, नायब तहसीलदार शेखर परब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसात बेकायदेशीर वाहतूक करणाऱया वाळू ट्रक पकडण्यात आल्या आहेत. बुधवारी सकाळी मिरज-पंढरपूर रोडवर महसूल कर्मचाऱयांनी पाळत ठेवली होती. कळंबी येथे विनानंबर प्लेट असणारा एक वाळू ट्रक भरधाव वेगाने जात असलेला महसूल विभागाच्या पथकाला आढळून आला. त्यांनी हा ट्रक अडविला आणि ताब्यात घेतला.

ट्रकचा पंचनामा करुन तो मिरज तहसील कार्यालयात घेऊन येण्यासाठी पथकामधील तलाठी पोपट ओमासे ट्रकमध्ये बसले आणि चालकाला ट्रक मिरजेकडे घेऊन जाण्यास सांगितले. ट्रक कळंबीपासून थोडय़ा अंतरावर आला असता चार अज्ञात व्यक्तींनी ट्रक अडवून पोपट ओमासेंना ट्रकमधून खाली उतरवले. त्यांना जबर मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचा मोबाईल काढून घेतला आणि ट्रकसह पलायन केले.

बेडगेचे तलाठी प्रविण जाधव, म्हैसाळचे तलाठी बाबासा बनसोडे, बेळंकीचे तलाठी शिवाजी नरुटे, महसूल विभागाचे अव्वल कारकून संजय संकपाळ यांनी सदर ट्रकचा पाठलाग केला. सिध्देवाडी जवळील डोंगराच्या खिंडीत सदरचा ट्रक अडवून तो पुन्हा मिरजेत आणला. मात्र, आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.

महसूल कर्मचारी संघटना आणि तलाठी संघटनेने या मारहाणीचा निषेध केला आहे. सदर प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी करीत त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. भररस्त्यात तलाठी पोपट ओमासे यांना वाळू तस्करांनी मारहाण केल्याने महसूल कर्मचाऱयांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा जिह्यातील महसूल कर्मचाऱयांनीही निषेध केला आहे.

Related posts: