|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शहीद कुणालची प्रेरणा युवकांनी घ्यावी-ब्रिगेडीयर सुनिल बोधे

शहीद कुणालची प्रेरणा युवकांनी घ्यावी-ब्रिगेडीयर सुनिल बोधे 

पंढरपूर / वार्ताहर

साधुसंतांची नगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरीला ‘वीरभूमी’ अशी ओळख शौर्यचक्रवीर शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या बलिदानामुळे मिळाली आहे. आज याठिकाणी शहीद स्मारक उभा करुन युवकांना देशसेवेसाठी प्रेरीत करण्याचे महान कार्य केले असल्याचे प्रतिपादन ब्रिगेडीयर सुनिल बी. बोधे यांनी केले आहे.

गोसावी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त वाखरी येथील गोसावी मळयात शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर अंत्यसंस्कार झाले होते त्याठिकाणी गोसावी कुटुंबीयांनी शहीद स्मारक उभे केले त्याचे लोकार्पण सोहळा व शहीद जवान कुटुंबियांचा सन्मानाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कर्नल सुहास जतकर (निवृत्त), संचालक, सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र, पॅप्टन सुनिल गोडबोले (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर, कर्नल अलोक ञिपाठी, कर्नल विकास कोल्हे, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, आमदार भारत भालके, वा. ना. उत्पात, मथुराताई मदने, वाखरी सरपंच, कुणाल गोसावी यांचे माता, पिता, पत्नी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ब्रिगेडीयर सुनील बोधे, निवृत्त कर्नल सुहास जतकर, निवृत्त पॅप्टन सुनील गोडबोले, कर्नल अलोक त्रिपाठी, कर्नल विकास कोल्हे यांच्याहस्ते शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या शहीद स्मारकाला पुष्पचक्र वाहुन मानवंदना दिली. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील महाविदयालयाच्या छात्रसेनेकडुन सलामी व मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी अंधशाळेतील विदयार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. तर सूत्रसंचालन प्रा. विक्रम बिस्कीटे यांनी केले. प्रास्ताविकात मुन्नागीर गोसावी यांनी शहीद कुणाल गोसावी यांच्या नावे एखादी संस्था उभी करुन समाजासाठी चांगले कार्य करण्याची संकल्पना मांडली.

यावेळी कर्नल अलोक ञिपाठी यांनी देशासाठी शहीद झालेल्या कुणाल यांच्या कुटुंबीयांबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढले. निवृत्त कर्नल जतकर यांनी शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबीयांना पुढील काळात नवी उभारी देण्यासाठी साथ दिली पाहिजे. तसेच यावेळी वा. ना. उत्पात यांनी कुणाल गोसावी हा माझा विदयार्थी असल्याचा मला अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढले.

आमदार भारत भालके यांनी शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या स्मरणार्थ काढणाऱया प्रत्येक कार्यास आपण सर्वोतोपरी मदत करू, असे आश्वासन दिले. सुधाकरपंत परिचारक म्हणाले, शहीद कुणाल गोसावी यांचे स्मारक सर्वांना प्रेरणा देत राहिल.

शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करुन गोसावी कुटुंबाचा एक समाजापुढे एक वेगळा आदर्श

2016-2017 मध्ये राज्यातील शहीद झालेल्या कुटुंबीयांचा सन्मान गोसावी परिवाराने केला. यामध्ये 15 वीर मातापिता व कुटुंबीयांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व आर्थिक धनादेश अशा स्वरुपाचा सत्कार करण्यात आला. गोसावी कुटुंबीयांनी केवळ आपल्या मुलाचेच कौतुक न करताच देशासाठी शहीद झालेल्या शहीद जवानाच्या कुटुंबीयांचाही सन्मान करुन समाजापुढे एक आगळा आदर्श निर्माण केला आहे.

Related posts: