|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » फलटण शहरात बिबटय़ाचा वावर

फलटण शहरात बिबटय़ाचा वावर 

प्रतिनिधी/ फलटण

गेल्या दोन दिवसापासून फलटण शहरात विविध ठिकाणी बिबटय़ा किंवा वाघ आढळल्याचे अनेकांनी सांगितल्यानंतर त्याबाबत असलेली संभ्रमावस्था काल (मंगळवार) रात्री 1.30 वाजता सिटी प्राईड सिनेमाच्या आवारात बिबटय़ा वावरताना सीसीटिव्ही कॅमेर्यात जेरबंद झाल्याने फलटण शहरात बिबटय़ाचा वावर निश्चित झाला असून वनखाते, पोलीस, नगरपालिका यांनी त्याच्या शोध मोहिमेला सुरुवात करण्याबरोबर नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. 

मंगळवार दि. 28 रोजी सकाळी 5.30 वाजता नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ येथे शहराच्या मध्यवर्तीभागात तेथील एक व्यापारी परगावी निघाले असताना त्यांना बिबटय़ाचे दर्शन झाले त्यानंतर वनखात्याच्या अधिकारी, कर्मचार्यांनी संपूर्ण शहरासह परिसर अक्षरश: पिंजून काढला मात्र त्यांना कोठेही बिबटय़ा आढळला नाही तथापी विमानतळ परिसरात काहींनी बिबटय़ा पाहिल्याचे त्यांना सांगितले.

बुधवार दि. 29 रोजी सकाळी बारस्कर चौकातील एका मंदिरात बिबटय़ाने दर्शन दिल्याचे सांगण्यात आले मात्र त्याची खातरजमा होवू शकली नाही दरम्यान शहरातील गजानन चौक येथे असलेल्या सिटीप्राईड (जुने नामवैभव) थिएटरच्या सीसीटिव्ही कॅमेर्यात रात्री 1.30 वाजता बिबटय़ा थिएटरच्या आवारात फिरताना व त्यानंतर थिएटरच्या कुंपन भिंतीवरुन उडी मारुन बाहेर जाताना चित्रीत झाल्याचे आढळून आल्यानंतर गेल्या 2 दिवसापासून बिबटय़ा फलटण शहरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व नगरसेवक श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी स्वत: सिटी प्राईड सिनेमा येथे जावून सी.सी. टिव्हीमध्ये कैद झालेला बिबटय़ा पाहिल्यानंतर तेथील रखवालदार व अन्य अधिकारी कर्मचार्यांशी चर्चा करुन त्यांना बिबटय़ाची चाहुल लागली किंवा नाही याबाबत चर्चा केल्यानंतर त्यासुमारास बिबटय़ा घरावरुन गेला असावा त्यामुळे काही घरांचे पत्रे वाजल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. 

बिबटय़ा शहरात वावरत असल्याची खात्री झाल्यानंतर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी वनखात्याचे अधिकारी, पोलीस अधिकारी व नगराध्यक्षा सौ. निता मिलिंद नेवसे, मिलिंद नेवसे, नगर पालिका अधिकार्यांशी चर्चा करुन याबाबत नागरिकांना जागृत करण्याची आवश्यकता निदर्शनास आणून देत नगर परिषद व वनखात्याच्या वाहनातून शहरात ध्वनीवर्धकाद्वारे याची माहिती देवुन विशेषत: सकाळी पहाटे फिरावयास जाणारे नागरिक, शालेय विद्यार्थी, पालक यांच्यासह सर्वच नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता निदर्शनास आणून देत वन खाते व पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून बिबटय़ाचा शोध घेतला जात असून नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरुन जावू नये मात्र सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे. 

शहराप्रमाणेच शहरालगतच्या कोळकी, जाधववाडी, ठाकुरकी, फरांदवाडी, अलगुडेवाडी वगैरे ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातही ध्वनीवर्धकाद्वारे ग्रामस्थांना माहिती देवून सावधानता बाळगण्याबाबत आवाहन करण्याच्या सूचना संबंधीत ग्रामपंचायतींना श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केल्या आहेत. 

Related posts: