|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कोपर्डी’ने हेलावलेल्या तरुणाने साकारले निर्भया उद्यान

कोपर्डी’ने हेलावलेल्या तरुणाने साकारले निर्भया उद्यान 

सतीश चव्हाण/ कराड

समाजात घडणाऱया प्रत्येक घटनेची स्पंदने समाजमनावर उमटतात. कोपर्डी येथील युवतीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनेही राज्यासह देशातील समाजमन सुन्न झाले. या घटनेने अस्वस्थ झालेल्या, हेलावलेल्या एका युवकाने अशा दुर्दैवी घटना समाजात घडू नयेत, याचा संदेश देण्यासाठी कराड तालुक्यातील विरवडे गावात कोपर्डी घटनेच्या तिसऱया दिवशी ‘निर्भया उद्यान’ उभारण्याचा निर्णय घेतला. घटनेनंतर सलग 16 महिने एकटय़ाने श्रमदान करून त्याने पडीक जागेवर  निर्भया उद्यान उभारले. हे उद्यान आता ‘कोपर्डी’ प्रकरण पुन्हा होऊ देऊ नका, असा संदेश देत आहे. बुधवारी न्यायालयाने कोपर्डी घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आणि विरवडेत हे उद्यान साकारणाऱया भीमराव धोकटे या युवकाचे डोळेही पाणावले.

13 जुलै 2016 रोजी कोपर्डी येथील दुदैवी घटना घडली. या घटनेने तीव्र प्रतिक्रिया उमटली. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून राज्यभर मूक मोर्चे निघाले. सर्वांप्रमाणेच या घटनेचा विरवडेच्या भीमराव धोकटे या युवकाच्या मनावरही खोलवर परिणाम झाला. कोपर्डीच्या घटनेने सुन्न झालेल्या भीमरावने समाजात पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी कोपर्डी घटनेच्या स्मरणार्थ घटनेच्या तिसऱया दिवशी 16 जुलै 2016 रोजी विरवडे गावात निर्भया उद्यान साकारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या पाठीमागील पडीक जागेत त्यांनी उद्यानाचे काम सुरू केले. जवळपास 16 महिने केवळ एकटय़ानेच काम करून हे उद्यान साकारले आहे. उद्यानात फळाफुलांची जवळपास शंभर झाडे लावण्यात आली आहेत.

 सुरूवातील भीमरावच्या या कृतीला लोकांनी गांभीर्याने घेतले नाही. मात्र
ग्रामपंचायतीने त्यांच्या कार्याला बळ दिले. एक वर्षांनंतर उद्यानातील फळा-फुलांची झाडे वाढली आहेत. ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामदैवताच्या मंदिराच्या जवळच हे उद्यान असल्याने दररोज गावातील लोकांच्या कोपर्डीच्या घटनेच्या आठवणी ताज्या होतात.

भीमराव धोकटे म्हणाले, ज्या, ज्यावेळी लोक हे उद्यान पाहतील, त्या त्यावेळी लोकांना कोपर्डीच्या दुदैवी घटनेची आठवण होईल. आपल्या गावात व परिसरातही अशी दुदैवी घटना घडू नये, यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल, या हेतुने उद्यान साकारल्याचे भीमराव यांनी सांगितले.

      विरवडेकर दीड वर्ष घटना विसरलेच नाहीत

कोपर्डीची घटना घडल्यापासून जवळपास 16 महिने भीमराव एकटाच गावात उद्यान साकारण्याचे काम करत असल्याचे विरवडेचे ग्रामस्थ रोज पहात होते. त्यामुळे विरवडेकरांना रोजच कोपर्डीच्या घटनेचे स्मरण होत होते. सुरूवातीला धोकटे यांची वेडेपणाची वाटणारी कृती आता मात्र गावासाठी प्रेरणादायी ठरली आहे.

 

 

Related posts: