|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मनतुर्गा येथील मतिमंद महिलेवर बलात्कार

मनतुर्गा येथील मतिमंद महिलेवर बलात्कार 

खानापूर :

मनतुर्गा (ता. खानापूर) येथे एका मतिमंद महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला बुधवारी पोलिसांनी अटक केली. सदर नराधमाचे नाव नंदू शिवाजी देवलतकर (वय 45 रा. मनतुर्गा) असे आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.

पिडीत महिला गरोदर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बलात्कार प्रकरण उघडकीस आले. गेल्या 23 ऑक्टोबर रोजी सदर महिला प्रसूत देखील झाली व तीला मुलगा झाला. प्रसुतीनंतर उपचारासाठी त्या मुलाला बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व पीडित महिलेला मनतुर्गा या तिच्या गावी पाठविण्यात आले. पण उपचार घेणाऱया मुलाला घेण्यासाठी कोणीच फिरकले नाही. यामुळे सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने या संदर्भात जिल्हाधिकारी बेळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱयांनी बालकल्याण विभागाच्या प्रभारी अधिकारी सुमन नाईक यांना आदेश देऊन या प्रकरणी खानापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यास सांगितले.

या तक्रारीनंतर खानापूर पोलिसांनी तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी नंदू देवलतकर याला ताब्यात घेवून रितसर चौकशी केल्यानंतर बलात्कार प्रकरणाचा संपूर्ण उलघडा झाला. यापूर्वीही सदर महिलेवर बलात्कार केल्याने या अगोदर दोन वेळा गरोदर राहिली आहे. एकावेळी गर्भपात करण्यात आला तर दुसऱयावेळी मूल गायब करण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

तिचे आई-वडील गरीब असल्याने केवळ भीतीपोटी या प्रकरणाची तक्रार करण्यास पुढे येऊ शकले नाहीत व तिसऱयावेळी मात्र, प्रकरण उघडकीस येऊन पोलिसांच्या जाळ्यात अडकला.