|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सभागृहात धिंगाणा घालणाऱया नगरसेवकांना नोटीस

सभागृहात धिंगाणा घालणाऱया नगरसेवकांना नोटीस 

प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिका सभागृहात प्रत्येक बैठकीवेळी गदारोळ, गोंधळ आणि वादावादीचे प्रकार कायम होत आहेत. महापौरांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून अर्वाच्य भाषेत बोलण्याचे प्रकार आता घडू लागले आहेत. यामुळे सभागृहाचे पावित्र्य भंग पावत आहे. यावर निर्बंध घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची अत्यंत गरज आहे. सभागृहाच्या आचारसंहितेचे पालन न करणाऱया नगरसेवकांवर कायद्याच्या चौकटीत कारवाई करणे गरजेचे बनले आहे. सभागृहात धिंगाणा घालणाऱया नगरसेवकांना लवकरच नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे समजते.

शहराच्या विकासाच्या दृष्टीने महापालिका सभागृहात आवश्यक निर्णय घेणे गरजेचे आहे. जनतेच्या समस्या सोडवून उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची जबाबदारी नगरसेवकांची आहे. विकासाच्या दृष्टीने आराखडे, रुपरेषा आखून निर्णय घेण्याची जबाबदारी सभागृहाची आहे. पण याला फाटा देऊन नगरसेवक वेगळय़ाच दिशेने भरकटत आहेत. विकासाच्या दृष्टीने चर्चा न करता अनावश्यक चर्चेवर भर दिला जात आहे. जनतेला काय हवे, हे बाजूला ठेवून स्वहिताच्या दृष्टीने चर्चा करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे सभागृहाचे नीती-नियम भंग पावत आहेत. महापौरांकडे बोट करून अथवा पाठ करून बोलू नये. पण या आचारसंहितेचे पालन होताना दिसत नाही. सभागृहात वादावादी गोंधळ आणि अर्वाच्य भाषेत बोलण्याचे प्रसंग घडत आहेत. प्रत्येक सभेत, प्रत्येक बैठकीवेळी गोंधळ घालून सभागृहाची शांतता भंग करण्याचा प्रकार वारंवार होत आहे. यामुळे याबाबत आवश्यक कारवाई करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

काही नगरसेवक-नगरसेविका बैठकीवेळी अनावश्यक चर्चा करून सभागृहाची  दिशाभूल करत असतात. याचा परिणाम कामकाजावर होत असल्याने सभागृहाच्या नियमांचे पालन करणे काळाची गरज आहे. पण चार वर्षे होत आली तरी नगरसेवकांना सभागृहाचा मान कसा राखावा, याचेच भान राहत नाही. यामुळे सभागृहात अनावश्यक गोंधळ घालणाऱया नगरसेवकांवर कायद्याच्या चौकटीत कारवाईची तरतूद करण्याची गरज आहे. वारंवार सूचना देऊनही गोंधळ घालणाऱया नगरसेवकांमध्ये कोणताच बदल होत नाही. यामुळे कठोर क्रम राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

सभागृहाच्या आचारसंहितेचे पालन न करणाऱया नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने नोटीस बजाविण्याची गरज आहे. पण त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई हाती घेतली नाही. यापुढे कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Related posts: