|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पार्किंग नियोजनाअभावी वाहतुकीची कोंडी

पार्किंग नियोजनाअभावी वाहतुकीची कोंडी 

वार्ताहर/ निपाणी

निपाणी शहराला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. कार्यवाहीसाठी काही मोजकेच दिवस बाकी राहिले आहेत. शहरातील वाहनांची गर्दी वाढल्याने पार्किंग नियोजन गरजेचे आहे. पण पालिकेसह पोलीस प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने शहरात विविध भागात, रहदारीच्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे.

निपाणी शहरात बसस्थानक परिसरातील जुना पुणे-बेंगळूर मार्ग, चिकोडी-मुरगूड रोड, अशोकनगर, नेहरु चौक, दलाल पेठ, गुरुवार पैठ अशा रहदारी असणाऱया विभागात वाहतूक कोंडी वाढत आहे. या वाहतूक कोंडीसाठी वाहतूक नियोजन मागे पडले आहेच. पण त्याचबरोबर पार्किंग नियोजनाविनाही ही समस्या गंभीर बनली आहे. शहरात व्यावसायिक व रहदारी क्षेत्रात पार्किंग सुविधाच उपलब्ध नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

पार्किंग सुविधा उपलब्ध नसल्याने बहुसंख्य वाहनधारक अधिकतर ठिकाणी रस्त्यावरच आपली वाहने पार्किंग करतात. कामाच्या निमित्ताने होणारे हे पार्किंग दिवसेंदिवस वाढत आहे. काहीवेळा तर मुख्य मार्ग व बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. यामुळे येत्या दिवसात ही समस्या अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

शहराची व्याप्ती वाढत असल्याने नगरपालिका प्रशासनाने मूलभूत सुविधा पुरवत शहरात मुख्य ठिकाणी वाहने पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पण पालिकेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नगरपालिकेशेजारी उभारण्यात आलेल्या पार्किंग शेड व्यतिरिक्त शहरात कुठेही पार्किंग सुविधा नाही. यामुळे पालिकेसह पोलीस प्रशासन रस्त्याकडेला होणाऱया पार्किंगवर कारवाई करण्यात मागे पडत आहे.

पार्किंग नियोजनात आर्थिक हितसंबंध

शहरात यापूर्वी अनेक व्यावसायिक इमारती उभारण्यात आल्या आहेत. सध्याही उभारण्यात येत आहेत. अशा व्यावसायिक इमारती उभारत पार्किंगसाठी आरक्षित जागाही ठेवली आहे. पण ही पार्किंग आरक्षित जागा व्यापारी गाळ्य़ांनी व्यापली गेली आहे. यामुळे खासगी पार्किंग नियोजनही कारवाईविना आर्थिक हितसंबंधात गुरफटल्याचे दिसत आहे. यासाठी वाहतूक कोंडीचे नियोजन करताना पालिका व पोलीस प्रशासनाने धडक मोहीम राबविताना अतिक्रमण हटावो कारवाई हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Related posts: