|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तांत्रिक क्षेत्राने येणारे आव्हाने पेलावी

तांत्रिक क्षेत्राने येणारे आव्हाने पेलावी 

बेळगाव / प्रतिनिधी

देशातील तांत्रिक शिक्षणाचा स्तर एकच रहावा व या देशात नव्या आव्हानांना सामोरे जाता यावे याकरीता मागील 30 वर्षांपासून ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्यूकेशन (एआयसीटीई) ही संस्था काम करीत आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणे, शिक्षकांच्या गुणवत्तेचा स्तर उंचावणे व व्यवस्थापनाच्या समस्या सोडविणे अशा भूमिका ही संस्था बजावत आहे. सध्या तांत्रिक क्षेत्रासमोर मोठी आव्हाने समोर असून ती आपण सर्वांनी एकत्रित येवून सामना केला पाहिजे, असे प्रतिपादन एआयसीटीईचे मार्गदर्शक प्रा. हरीहरण यांनी केले.

 एआयसीटीईची राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा बुधवारी जीआयटी कॉलेजमध्ये पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर व्हीटीयूचे कुलगुरू प्रा. करिसिद्दप्पा, युपीएससीचे संचालक डॉ. के. के. जाधव, डॉ. आर. एस. राठोड, संघटनेचे दक्षिण विभाग प्रमुख आर. उन्नीकृष्णण, केएलएस सोयायटीचे चेअरमन एम. आर. कुलकर्णी, कॉलेजचे गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन यु. एन. कालकुंद्रीकर, प्राचार्य ए. एस. देशपांडे उपस्थित होते.

युपीएससीचे संचालक डॉ. के. के. जाधव म्हणाले, आमच्या क्षेत्राचा तसा थेट संबंध तांत्रिक क्षेत्राशी येत नसला तरी या क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत सामावून घेण्याचे काम युपीएससी करत असल्यचे त्यांनी सांगितले. डॉ. उन्नीकृष्णण यांनी राज्यात उत्तम तांत्रिक शिक्षण दिले जात असल्याचे सांगून व्हीटीयू विद्यापिठाचे कौतूक केले.

कुलगुरू करिसिद्दप्पा म्हणाले, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. आज तांत्रिक क्षेत्रात दिवसागणिक बदल होत आहेत. त्यामुळे कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तयार केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. प्राचार्य ए. एस. देशपांडे यांनी आभार मानले. यावेळी 4 सत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.