|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आमच्याकडे सहानुभूतीने पहा

आमच्याकडे सहानुभूतीने पहा 

बेळगाव/ प्रतिनिधी

आम्ही दिव्यांग आहोत, आम्हाला आधाराशिवाय पुढे पाऊल टाकता येत नाही. पण आम्हाला आधार देण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. आम्ही दिव्यांग असल्यामुळे आम्हाला सरकार काहीप्रकारे मदत करते. पण ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे केवळ घोषणाबाजी करून आमच्या भावनांशी खेळू नका, अशी आर्त हाक दिव्यांगांनी दिली आहे. आपल्या मागण्यांसाठी दिव्यांगांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.

दिव्यांगांना सध्या देण्यात येणारे वेतन तुटपुंजे आहे. 40 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीला फक्त 500 रुपये दिले जात आहेत. तर 75 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीला 1200 रुपये दिले जातात. पण सध्याची महागाई पाहता यामध्ये गुजराण करणे अवघड आहे. तेव्हा किमान 3 हजार ते 5 हजारपर्यंत वेतन द्यावे. महत्त्वाचे म्हणजे जे खरोखरच दिव्यांग आहेत त्यांना सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. इतरांनाच त्या लागू केल्या जात आहेत, ही बाब गंभीर आहे. तेव्हा खरोखर दिव्यांगांनाच सरकारने सुविधा द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

दिव्यांगांना स्वतंत्र रेशनकार्ड द्यावे. त्यामधून मोफत धान्य व इतर वस्तू द्याव्यात. सरकारी कार्यालयांमध्ये दिव्यांगांसाठी ‘रॅम्प’ची सोय करावी. सध्या बसपास देण्यात आला आहे. पण नवीन सुरू करण्यात आलेल्या बसेसमध्ये दिव्यांगांकडूनही तिकीट घेतले जात आहे. तेव्हा त्या बसमधूनही मोफत प्रवास करण्यास परवानगी द्यावी. केवळ 100 कि. मी. प्रवास मोफत आहे. पण त्यापुढील प्रवास दिव्यांगांना स्वत: खर्च करून करावा लागतो. तेक्हा या सर्व समस्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. सरकारी नोकरीसाठी प्राधान्य द्यावे, कारण दिव्यांग आहे म्हणून त्यांच्याकडून काम होणार नाही, असे समजून त्यांना कामावर घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक सरकारी कार्यालयात किमान एका दिव्यांगाला कामावर घ्यावे. अधिकाधिक दिव्यांगांना सायकल देण्यास सरकारने प्राधान्य द्यावे, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातच जिल्हा दिक्यांग कल्याण अधिकारी नामदेव बिलकर उपस्थित होते. त्यांनी दिव्यांगांसमोर जाऊन निवेदन स्वीकारले. यावेळी सर्व  समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बेळगाव दिव्यांग असोसिएशनचे अध्यक्ष वामन कट्टी, सेपेटरी गिरीष सव्वाशेरी, दयानंद दड्डीकर, मनीषा पाटील, ललिता गवस, अथणी तालुका दिव्यांग आधार संघटनेचे अध्यक्ष बाबुराव माणगावे, रावसाहेब देवरमणी, चंद्रकांत सूर्यवंशी, रवी कल्लोळी, लक्ष्मण रामनकट्टी, दीपा पठाणी यांच्यासह दिव्यांग उपस्थित होते.

दुसऱयाच्या आधारावरच सर्व काही

माळी गल्ली, बेळगाव येथील तरुण अभिषेक प्रकाश पाटील (वय 17) हा निवेदन देण्यासाठी आला होता. तो दोन्ही पायांनी अधू असल्यामुळे दुसऱयाचा आधार घेतच चालत होता. हे पाहून त्याला काहींनी कुटुंबीयांची माहिती विचारली असता माझे वडील भाजी मार्केटमध्ये काम करतात. आई घरकाम करते. यामुळे आम्हाला उदरनिर्वाह करताना कसरत करावी लागत आहे. आई-वडिलांनाच माझी सेवा करावी लागते. हे खरोखरच दुर्दैवी आहे. सरकारकडून देण्यात येणारे वेतनही तुटपुंजे आहे. त्यामुळे माझ्या आई-वडिलांवर ताण पडत असल्याचे तो सांगत होता.

…हे पाहून सारेच जण भावूक झाले!

जगण्यासाठी दिव्यांगांना काय कसरत करावी लागते, ते अपंगत्वाचा कसा सामना करतात, हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात साऱयांनाच पाहायला मिळाले. त्यांची अवस्था पाहून सारेच जण भावूक झाले होते. डोळय़ांनी जग न पाहणारे दोघे तसेच पायांनी अपंग असणारा एक तरुण एकमेकांचा आधार घेत पुढे जात होते. अपंग असणारी व्यक्ती त्या दोघांना हात धरून दिशा दाखवत होती. अपंगाला आधार देऊन ते दोघे अंध त्याला पुढे नेत होते, हे पाहून सारेच जण भावूक झाले.

Related posts: