|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अनमोल पर्वतरांगा सहय़ाद्रीच्या

अनमोल पर्वतरांगा सहय़ाद्रीच्या 

भारताच्या अस्तित्वाच्या दृष्टीने पूर्वेकडच्या हिमालयाच्या गगनचुंबी पर्वतरांगा आणि पश्चिम घाटाचा विस्तीर्ण जंगल समृद्ध प्रदेश महत्त्वाचा आहे. गुजरातच्या डांगमधील तापी नदीचे खोरे ते कन्याकुमारीपर्यंत 1,490 कि.मी. लांबीचा 1,29,037 चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेला प्रदेश पश्चिम घाट म्हणून ओळखला जातो. गोव्याचा प्रदेश आणि गुजरातमधील तापी नदीचे खोरे वगळता संपूर्ण पश्चिम घाटाचा समावेश ‘युनॅस्को’ने जागतिक वारसा स्थळामध्ये केल्याने या परिसराचे पर्यावरणीय, ऐतिहासिक, नैसर्गिक, सांस्कृतिक महत्त्व प्रकाशात आलेले आहे. पश्चिम घाटाला गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही प्रांतात ‘सहय़ादी’ ही संज्ञा आहे. तापीपासून सुमारे 800 मैल लांबीची सलग पर्वतराजी असून त्यानंतर सुमारे 16 मैल रुंदीचे खिंडार लागते. त्याला पालघाट म्हणतात. महाराष्ट्रातील अत्युच्च कळसूबाई हे शिखर 5,427 फूट उंच असून नीलगिरीमधील दोड्डाबेट्टा हे शिखर 8,125 फूट उंच आहे. गोव्यातील सर्वोच्च पर्वत शिखर असणारा सोसोगड 3,827 फूट उंच आहे. सहय़ाद्री पर्वतराजी आणि पश्चिम समुद्र यांच्यामध्ये जी कोकणपट्टी आहे तेथून पूर्वेकडील पठारावर जाण्यासाठी कोंडाई-बारी, बाभुळणा, कसारा (थळ), बोर, कुंभार्ली, नाणे, भोर, आंबे, फोंडा, आंबोली, सुब्रम्हण्यम, चारमाडी, शिराडी व अगुंबे घाट आहेत. गोव्यातून कर्नाटकात जाण्यासाठी रामघाट आहे. सहय़ाद्रीचा मालवणपर्यंतचा प्रदेश कृष्ण प्रस्तरांचा व दक्षिणेकडील स्फटिक प्रस्तरांचा आहे. ज्वालामुखीतून उफाळलेल्या तप्त रसापासून बनलेल्या कृष्ण प्रस्तरांपासूनच सहय़ाद्रीतल्या बऱयाच मोठय़ा प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. हिमालय पर्वत विस्ताराने व उंचीने सहय़ाद्रीपेक्षा मोठा असला तरी त्याचे वयोमान सहय़ाद्रीच्या तुलनेने कमी आहे. त्याची एकंदर जडणघडण अत्यंत प्राचीन काळी झालेली आहे. पवित्र मानल्या जाणाऱया बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठ सहय़ाद्रीच्या शिखरावर किंवा परिसरात आहेत. सहय़ाद्रीच्या कडय़ात त्याचा गाभा निर्भेळ, एकसंध असल्याने बौद्धाची प्राचीन व भव्य लेणी खोदलेली आहेत. सहय़ाद्रीचा घाटमाथा, त्याच्या लगतचा पठारी प्रदेश व कोकणातील डोंगरफाटे एवढय़ा भागात सुमारे साडेतीनशे किल्ले आहेत.

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला लकाकी प्राप्त झाली ती सहय़ाद्रीच्या पर्वतरांगा आणि डोंगर कडय़ांमुळेच. दोडामार्गातील तिळारी परिसरातील रामघाट संपल्यावर शिवरायांनी उभारलेला पारगडचा किल्ला असो किंवा गोव्यातील एका टोकाला काणकोणात साळ नदीच्या मुखावर बांधलेला काब द राम किंवा खोलगडाचा किल्ला असो, सहय़ाद्रीच्या अंगाखांद्यावर मिरवणारे हे किल्ले शिवरायांच्या स्वराज्य विस्तारासाठी सतत साहाय्यभूत ठरलेले आहेत. वैनगंगा, तापी, गोदावरी, माजरा, भीमा, प्रवरा, नीरा, कृष्णा, वेणा, कोयना, तुंगभद्रा, पन्नार, कावेरी, वरदा, घटप्रभा, मलप्रभा, काळी, गंगावती, शरावती, पेरियर, पंपा, वैगाई, ताम्रपर्णी, नेत्रावती, वैतरणा, दमणगंगा आदी महत्त्वाच्या दक्षिणेकडच्या नद्या सहय़ाद्री पर्वतराजीतून उगम पावतात. दक्षिण भारताचे भरण पोषण करणाऱया या प्रदेशाला सुजलाम्, सुफलाम् करणाऱया नद्यांचा जन्मदाता सहय़ाद्री. दक्षिण भारताचे हवामान, पाऊसपाणी, धन-धान्य सहय़ाद्रीवरतीच अवलंबून आहे. कृष्णा आणि तुंगभद्रेच्या सुपिक प्रदेशावरती ताबा मिळविण्यासाठी दक्षिणेकडील बऱयाच साम्राज्यांनी युद्धे छेडली. विजयनगर आणि बहामनी ही दोन्ही साम्राज्ये असो अथवा कावेरीच्या काठावर ती तमिळ भाषेत एकापेक्षा एक सरस अशा काव्यांची निर्मिती करणारे कवी असो या साऱया प्रेरणेमागचा मूलाधार सहय़ाद्रीच आहे.

भारतातील हिमालयाहून सहय़ाद्री वयोमानाने ज्येष्ठ आणि जाणता आहे. भारतातील सगळय़ात प्राचीन असा शिलाखंड गोव्यासारख्या राज्यात सहय़ाद्रीच्या पर्वतराजीत वसलेला मोले राष्ट्रीय उद्यानातील अनमोड घाटातील ‘ट्रोन्जान्माईटनीस’ आहे. काणकोणातील अरबी सागर ज्याचे नित्य चरणकमल धूत असतो त्या पाळोळेच्या सागर किनाऱयावर देखील भारतातील अगदी प्राचीन गणले गेलेले ट्रोन्जान्माईटनीस हे शिलाखंड आहे. अद्भूत आणि अगम्य असणारे धारबांदोडय़ातील मोले-अनमोड आणि काणकोणातील पाळोळेचे शिलाखंड सहय़ाद्रीच्या प्राचीन भूगर्भशास्त्रीय वारशाचे दर्शन घडवतात. उत्तर गोव्यातील सत्तरीत खोतोडे येथे कित्येक दशलक्ष वर्षांचे जीवाश्म म्हादई नदीच्या किनाऱयावरती पुरातत्व अभ्यासकांना आढळलेले आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हय़ातील दापोलीजवळील कांगवाई येथे वृक्षांचे महत्त्वपूर्ण जीवाश्म आढळलेले आहेत. भारताच्या संपूर्ण 7,500 कि.मी. लांबीच्या किनारपट्टीवर इतिहासपूर्व काळातील जीवसृष्टीच्या स्वरुपाची आणि हवामान बदलाची चुणूक देणारे हे जीवाश्म खारफुटीच्या जंगलांची स्मृती जागवितात.

पश्चिम घाट ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी डोंगरांची रांग असून पश्चिमेला अरबी सागराने, पूर्वेला रुक्ष दख्खनच्या पठाराने तर उत्तरेला विंध्य सातपुडा पर्वतराजीने वेगळी केली आहे. या प्रदेशात झुडपांची जंगले, कमी उंचीवरची कुरणे आणि डोंगर भागातील घळीमधील जंगल आणि मौल्यवान अशी उष्णकटिबंधीय सदाहरित किंवा पानगळती जंगले दिसून येतात. गुंतागुंतीचा स्थानीय भूगोल, जास्त पर्जन्यवृष्टी आणि दुर्गमता यामुळेच येथील जैविक समृद्ध अशी विविधता टिकून राहण्यास मदत झाली आहे. या प्रदेशात अनेक स्थानिक, दुर्मीळ आणि धोक्यात असणाऱया त्याचप्रमाणे आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाच्या प्रजातींचे आणि सुधारित वनस्पतीच्या जंगली भाईबंदाचे माहेरघर आहे. झाडे व झुडपांच्या 80 स्थानिक प्रजाती केवळ इथल्या सदाहरित जंगलापुरत्या मर्यादित असून त्या इतर कोणत्याही प्रकारच्या जंगलांमध्ये सापडत नाहीत. मिरची, कांदा, लवंग, जायफळ, चहा, कॉफी, सीताफळ, अननस, पपई, पेरु, चिक्कूसारख्या अन्य प्रांतातून आलेल्या वनस्पतींनी येथील जैविक संपत्ती आणखीन समृद्ध केलेली आहे.

शेकडो वर्षांपासून परंपरा आणि श्रद्धेच्या माध्यमातून इथल्या लोकमानसाने देवाधर्माद्वारे देवराया, पवित्र तळय़ा, विहिरी आणि अन्य जल, जंगल स्रोतांचे रक्षण केले होते परंतु आज विकासाचे नाव धारण करून येणारे शेकडो प्रकल्प सहय़ाद्रीच्या अस्तित्वावरती घाला घालण्यास सिद्ध झालेले आहेत. प्रदूषणकारी कारखाने, मोठी धरणे, जलविद्युत निर्मिती प्रकल्प आणि अन्य विकासकामांसाठी मोठय़ा प्रमाणात जंगलतोड केली जात आहे. शेती, बागायती आणि अन्य व्यावसायिक तत्वावरती केल्या जाणाऱया लागवडीचा विस्तार जंगल, डोंगर प्रदेशात होत आहे. लोह, मँगनिज, बॉक्साईट आदी खनिजांचे विस्तारत जाणारे उत्खनन, लोकवस्तीचा अराजक विस्तार आदी असंख्य धोके सहय़ाद्रीच्या अस्तित्वावरती घाला घालत आहेत. त्यांना नियंत्रित करण्यात मानवी समाजाला शाश्वत लाभ आहे.

Related posts: