|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » साहित्य संमेलन आणि धर्मसंसद…

साहित्य संमेलन आणि धर्मसंसद… 

सांस्कृतिक नगरी म्हैसूर येथे 83 वे अ. भा. कन्नड साहित्य संमेलन झाले. नेमके याच काळात कृष्णनगरी उडुपी येथे अ. भा. धर्मसंसद भरली होती. कर्नाटकात एकाच वेळी वेगवेगळय़ा ठिकाणी झालेले साहित्य संमेलन आणि धर्म संसदेने वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांचेही उद्दिष्ट स्पष्ट आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीचीच ही धडपड आहे.

सांस्कृतिक नगरी म्हैसूर येथे 83 वे अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलन संपन्न झाले. बंडखोर विचारांचे कवी, साहित्यिक प्रा. चंद्रशेखर पाटील ऊर्फ ‘चंपा’ या संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘चंपा’ म्हटले की वाद हे समीकरण जुनेच आहे. साहित्य संमेलनातही नेमके तसेच घडले. डावे-उजवेवरून या संमेलनात फड रंगला. नेमके याच काळात कृष्णनगरी उडुपी येथे अखिल भारतीय धर्म संसद भरली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, फायरब्रँड नेते डॉ. प्रवीण तोगडिया आदींसह देशभरातील शेकडो साधू, संत व हिंदू संघटनांच्या प्रमुखांची या धर्मसंसदेला उपस्थिती लाभली. पेजावर मठाधीश व राष्ट्रसंत विश्वेश्वरतीर्थ महास्वामीजींचा यासाठी पुढाकार होता. 24 ते 26 नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस म्हैसूर व उडुपी येथे अ.भा.साहित्य संमेलन व धर्मसंसद झाली. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ म्हणजे साहित्याशी निगडित चर्चा हे असणारच. मात्र साहित्यापेक्षा राजकीय कारणांनीच हे संमेलन आजही गाजते आहे. संमेलनाच्या व्यासपीठावरून ‘चंपा’ यांनी राजकीय भाषणबाजी केली. पुढच्या निवडणुकीत जातीयवादी शक्तींना दूर ठेवण्यासाठी मतदारांनी सेक्मयुलर (निधर्मी) पक्षाला म्हणजेच काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. यावरून गेला आठवडाभर काँग्रेस-भाजपमध्ये कलगीतुरा सुरू आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर राजकीय कारणांसाठी करू नका असा सल्ला देत केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी याच व्यासपीठावरून साहित्य संमेलनाचे व्यासपीठ म्हणजे मते मागण्यासाठीचे व्यासपीठ नव्हे असे ठणकावून सांगितले आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मात्र ‘चंपा’ यांचे समर्थनच केले आहे. निधर्मी पक्षांना मतदान करा असे आवाहन करण्यात काय चूक आहे असा सवाल उपस्थित करून राजकारणासाठी साहित्यिकांचा वापर करण्याची आपल्याला गरज नाही, असे स्पष्ट केले आहे. साहित्य संमेलनाचे सूप वाजले तरी त्यावरील चर्चा अद्याप थांबता थांबेना. याबरोबरच असहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा, पत्रकार गौरी हत्या, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचे मारेकरी कोण आदी विषयांवरही चर्चा झाली. साहित्यिक भगवान तर गौरी लंकेश यांच्यासारखेच आपल्याला झटक्मयात मरण आलेले बरे असे सांगत असहिष्णुतेवर भरभरून बोलले. एकंदर संमेलनाचा रागरंग पाहता साहित्यापेक्षा राजकीय कारणांनीच हे संमेलन गाजले.

उडुपी येथे झालेल्या धर्मसंसदेत मात्र अपेक्षेप्रमाणेच राम मंदिर आणि राम राज्याचे मुद्दे चर्चेला आले. 2019 पर्यंत अयोध्येत रामलल्लाचे मंदिर उभारणारच अशी घोषणा धर्मसंसदेत करण्यात आली. रामराज्य आणि धर्मराज्याच्या संकल्पनेवर भर देत गोहत्या बंदी, मंदिर प्रवेशाबरोबरच प्रथमच जातीयता नष्ट करण्यावर चर्चा झाली. सामाजिक विषमता दूर करणे आणि घरवापसीवर भर देण्यात आला होता. आजवर सामाजिक असमानतेबद्दल साधू-संत आणि हिंदू संघटनांवर आरोप होत होते. आता धर्मसंसदेनेही आपल्या वाटचालीची दिशा बदलल्याचे या चर्चेवरून स्पष्ट होते. साहित्य संमेलन आणि धर्मसंसदेतील विचार आणि चर्चेची दिशा लक्षात घेता विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळय़ासमोर येतात. जे काही सुरू आहे ते आगामी निवडणुका डोळय़ासमोर ठेवूनच चालले आहे. हे सांगण्यासाठी राजकीय निरीक्षकांची गरज नाही.

कर्नाटकात गेल्या काही महिन्यांपासून वीरशैव-लिंगायत वाद सुरू आहे. याच मतांवर भाजपाची मदार आहे, हे हेरून मतविभागणी करण्यासाठीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मंत्रिमंडळातील एम. बी. पाटील, विनय कुलकर्णी, बसवराज रामरेड्डी आदी प्रभावी मंत्र्यांना पुढे करून एका गटाच्या मागे आपली शक्ती उभी केली आहे. ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. केवळ राजकीय नेतेच नव्हे तर या मुद्यांवरून मठाधीशांमध्येही गट-तट पडले आहेत. ‘हम भी कुछ कम नही’ या थाटात धार्मिक क्षेत्रात नावाजलेले मठाधीश जे मनात येईल ते बरळत सुटले आहेत. त्यांची वक्तव्ये ऐकली की, खरोखरच हे धर्माचार्य आहेत का असा संशय सहज मनात यावी अशी स्थिती आहे. वीरशैव-लिंगायत मतांवर भाजपची मक्तेदारी नाही ही गोष्ट खरी असली तरी मतांच्या राजकारणासाठी आजवर एकसंध राहिलेला समाज आता दुभंगला आहे. एकमेकांच्या मनात कटुता आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पर्यायाने काँग्रेस सरकारची भाटगिरी करण्याची एकही संधी न सोडण्याची जणू शपथच घेतलेले राजकीय, धार्मिक क्षेत्रातील प्रमुख समाजमनावर विषप्रयोग करीत आहेत. वीरशैव-लिंगायत समाजाचे आजवर प्रतिनिधित्व केलेल्या अ. भा. वीरशैव महासभेलाच बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महासभेचे अध्यक्ष शामनूर शिवशंकरप्पा हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांचे चिरंजीव शामनूर मल्लिकार्जुन हे सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री आहेत. तरीही समाज एकसंध ठेवण्याच्या महासभेच्या निर्णयावर ते ठाम राहिले आहेत. अ.भा. साहित्य संमेलनाध्यक्ष चंपा यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून ‘स्वतंत्र लिंगायत’ धर्माला मान्यता मिळविण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. केवळ पाठिंबाच नव्हे तर त्यांचा या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागही आहे.

उडुपी येथे झालेल्या धर्मसंसदेत राम मंदिराचा जप करतानाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. राम मंदिरासाठी गेली 30 वर्षे लढा द्यावा लागला. हा लढा आता अंतिम टप्प्यात आहे. अयोध्येतील त्याच जागेवर, त्याच दगडांनी मंदिर हे होणारच. अशा परिस्थितीत प्रत्येकाने संयम राखण्याचा सबुरीचा सल्ला त्यांनी दिला आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष ‘चंपा’ यांनी मात्र संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर राजकीय कारणांसाठी केला आहे असा उघड आरोप त्यांच्यावर केला जात आहे. कर्नाटकात एकाच वेळी वेगवेगळय़ा ठिकाणी झालेले साहित्य संमेलन आणि धर्मसंसदेने वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांचेही उद्दिष्ट स्पष्ट आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीचीच ही धडपड आहे. विधानसभा निवडणुकीत धर्मवाद, असहिष्णुता, पत्रकार आणि विचारवंतांची हत्या, स्वतंत्र लिंगायत धर्म हे विषय असणार आहेत तर आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत राममंदिराच्या मुद्यावर वातावरण तापणार आहे. हेच या दोन्ही व्यासपीठांवरून व्यक्त झालेल्या विचारावरून अधोरेखित झाले आहे.

Related posts: