|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » योगमाया निसटली

योगमाया निसटली 

आकाशवाणी ऐकल्यापासून कंसाला झोप कुठे येत होती. वसुदेव देवकीला मुल झाले आहे ही बातमी ऐकताच तो ताडकन उठला. तो धावतच बंदीगृहात वसुदेव देवकीच्या कोठडीपाशी येऊन पोहोचला. देवकी त्याला म्हणाली-अरे हा मुलगा नाही, मुलगी आहे. तू मुलीची हत्या करू नकोस. बालहत्या आणि तीही स्त्रीहत्या करणे हे महापातक तू करू नकोस! त्यावर कंस तिला म्हणाला-मुलगा की मुलगी ते काही मी जाणत नाही. तुझा देव मोठा कपटी आहे. केव्हा, कुणाला, कसे फसवील सांगता येत नाही. त्या तुझ्या देवाचा काय भरवसा!
पुरत्या घाबरलेल्या कंसाने ती कन्या खसकन देवकीकडून हिसकावून घेतली. त्याला तिला कारागृहाच्या दगडी भिंतीवर आपटून ठार मारावयाचे होते. त्याने त्या मुलीचे पाय पकडून तिला गरगर गोल फिरवले. पण भगवंताची योगमाया कंसाच्या हातात थोडीच येणार होती! ती त्याच्या हातातून सटकली आणि अष्टभुजा देवीच्या रूपात आकाशात प्रकट झाली. ती कंसाला म्हणाली-तू मला काय मारतोस? तुझा काळ तर आधीच जन्मला आहे. निर्दोष बालकांची व्यर्थ हत्या करणे सोडून दे. इतके बोलून देवी अंतर्धान पावली.
आता येथेसुद्धा देवीला बोलण्याची काय आवश्यकता होती? ती चुपचाप राहू शकली असती ना. परंतु कंसाच्या मनात अधिक भय निर्माण करावयाचे होते म्हणून तिने त्याला हे सांगितले. तो कंसाचा काळ कुठे आहे हे मात्र सांगितले नाही. त्यामुळे कंसाची चिंता अधिकच वाढली.
देवीचे म्हणणे ऐकून कंसाला अत्यंत आश्चर्य वाटले. त्याला आपण हे सर्व कशासाठी करतो आहोत हेच कळेना. त्याने त्याचवेळी वसुदेव व देवकी यांना कैदेतून मुक्त केले आणि नम्रतेने तो त्यांना म्हणाला-
अग ताई! अहो भावोजी! अरेरे! मी अत्यंत पापी आहे. ज्याप्रमाणे राक्षस आपल्याच मुलांना मारून टाकतो, त्याप्रमाणे मी तुमची बरीच मुले मारून टाकली. मी इतका दुष्ट आहे की, माझ्यामध्ये करुणेचा लवलेशही नाही. मी माझ्या बांधवांचा आणि मित्रांचाही त्याग केला आहे. आता मला कोणत्या नरकात जावे लागेल, बरे! मी तर ब्रह्मघातकी माणसाप्रमाणे जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे.
फक्त माणसेच खोटे बोलतात असे नाही, तर विधाताही खोटे बोलतो. त्याच्यावर विश्वास ठेवूनच मी पाप्याने बहिणीची मुले मारली. तुम्ही दोघेही महात्मे आहात. आपल्या पुत्रांसाठी शोक करू नका. त्यांना त्यांच्या कर्माचेच फळ मिळाले. सर्व प्राणी प्रारब्धाच्या अधीन आहेत. म्हणूनच ते सर्वकाळ एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत. जशा मातीच्या वस्तू तयार होतात आणि मातीत मिसळतात, परंतु मातीमध्ये काही बदल होत नाही. त्याचप्रमाणे शरीरांचे उत्पन्न होणे, नाहीसे होणे, हे चालूच असते. परंतु आत्म्यावर याचा काही प्रभाव पडत नाही. जे लोक हे तत्त्व जाणत नाहीत, ते या शरीरालाच आत्मा समजतात. त्यामुळे त्यांची संसारातून सुटका होत
नाही.

Related posts: