|Monday, July 16, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » देवाघरची फुले

देवाघरची फुले 

मुलं देवाघरची फुलं असली तरी फुलांना काटे असतातच. त्यांच्या खोडय़ा पालकांना रडकुंडीला आणतात. पहिली खोडी-हातात पेन्सिल नावाची लेखणी येते आणि रेघोटय़ा मारणे, अक्षरे गिरवणे आणि चित्रे काढणे त्यांना जमू लागले की विचारता सोय नाही. घरातल्या मोठय़ा माणसांची पेन्स घेऊन मिळेल त्या कागदावर लिहायचा प्रयत्न केला जातो. पूर्वी फौंटन पेन्स प्रचलित होती तेव्हा अशी पेन्स खेळायला घेऊन त्यात पाणी भरणे, त्यांची निबे मोडून ठेवणे हा बच्चे कंपनीचा आवडता छंद होता. आता ती पेन्स गायब झाली आहेत. मोठी माणसे बॉलपेन्स वापरतात. खरं म्हणजे संगणक किंवा मोबाईल जास्त वापरला जातो. आता माझ्या नातवंडांची पिढी (वयोगट 2 वर्षे ते 5 वर्षे) पालकांवर रुसली की आई-बाबांचा मोबाईल लपवणे, त्यातली बॅटरी काढून टाकणे, मोबाईल किंवा लॅपटॉप चार्जिंगला लावले असतील तर त्यांची वायर ओढणे किंवा बटन बंद करून ठेवणे असले निरागस उद्योग करते आणि पालकांची फजिती पाहून इतकी गोड हसते की पालक चिडूच शकत नाहीत.

पूर्वी भिंतींना तैलरंग देणे मध्यमवर्गीयांना परवडत नव्हते. लोक भिंतींना डिस्टेंपर देत. मुलं भिंतीवर रेघोटय़ा मारणे, चित्रे काढणे वगैरे उद्योग करून ठेवीत. यावर मी एक उपाय केलेला होता. घराला रंग देताना जमिनीपासून चार फूट उंचीपर्यंत एक रंग आणि वरच्या बाजूला वेगळा रंग दिला. खालच्या भागाला रंग देताना रंगात ब्लॅक बोर्ड रंग थोडा मिसळला.

रंग देऊन झाल्यावर त्या भागात मुलं पेन्सिलीने किंवा खडूने काही लिहू शकत. रंगीत चित्रं काढू शकत. नंतर ओल्या फडक्मयाने ते पुसून टाकता येई. 

पण पालकांवर मात केली नाही तर ती देवाघरची फुलं कसली? काही दिवस मुलांनी त्या भिंतीवर चित्रे काढली. पाठांतरासाठी पाढे, श्लोक, कविता लिहून ठेवले. केव्हातरी त्यांची आपापसात भांडणे झाली तेव्हा त्यांनी भिंती वाटून घेतल्या. ब्लॅक बोर्ड रंग दिलेल्या भागाच्या वरच्या बाजूला बॉलपेनच्या सहाय्याने स्वतःची नावे लिहिली आणि येथे इतरांनी लिहू नये वगैरे सूचना देखील प्रसारित केल्या.

आता तो रंग बदलून घराला सर्वत्र तैलरंग दिला आहे. मुलं मोठी होऊन नोकऱयांसाठी दूर गेली आहेत. त्यांनी रंगवलेल्या त्या भिंती आता फक्त माझ्या मनात आहेत.

Related posts: