|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पद्मावती चित्रपटाचा वाद संसदेच्या दारात

पद्मावती चित्रपटाचा वाद संसदेच्या दारात 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

पद्मावती चित्रपटवर सुरू असलेला वाद सोडविण्याचे प्रयत्न गतिमान झाले आहेत. सेन्सॉर मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी वादाप्रकरणी संसदीय समितीच्या समोर स्वतःचे म्हणणे मांडले. चित्रपटाला अजून मंजुरी देण्यात आलेली नसल्याचे जोशी यांनी समितीसमोर स्पष्टीकरण दिले. चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे देखील संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान विषयक समितीसमोर हजर राहिले. पद्मावती चित्रपटाला राजपूत समुदायाकडून विरोध होत असल्याने अनेक राज्यांनी चित्रपटावर बंदी घातली आहे.

सेन्सॉर मंडळाने केवळ चित्रपटाचे प्रोमो आणि ट्रेलरला मंजुरी दिली. पद्मावती चित्रपटावरील निर्णय तज्ञाचे मत घेतल्यावर दिला जाईल असे प्रसून जोशी यांनी संसदीय समितीला सांगितले. समिती सदस्यांनी चित्रपट पाहिलाय का असे विचारला असता जोशी यांनी नाही असे उत्तर दिले.

संसदीय समितीकडे राजस्थानचे भाजप खासदार सी.पी. जोशी आणि ओम बिर्ला यांनी अर्ज दाखल केला होता. चित्रपटात आक्षेपार्ह दृश्य असल्याची तक्रार त्यांनी केली. या अर्जावर समितीने प्रसून जोशी आणि भन्साळी यांना हजर राहण्याचा निर्देश दिला.

30 सदस्यीय समिती

पद्मावती चित्रपटावरून भन्साळी यांनी 30 सदस्यीय संसदीय माहिती-तंत्रज्ञान विषयक स्थायी समितीसमोर हजेरी लावली. समितीने सेन्सॉर मंडळ आणि माहिती-प्रसारण विभागाच्या अधिकाऱयांना देखील हजर राहण्याचा निर्देश दिला. या समितीचे नेतृत्व अनुराग ठाकूर यांच्याकडे असून यात परेश रावत, राज बब्बर यांच्यासमवेत 30 जण सदस्य आहेत.

Related posts: