|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून पटेल चेहरा?

मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून पटेल चेहरा? 

गुजरातमध्ये भाजप हिमाचलच्या धर्तीवर मतदानाच्या तोंडावर जातीय समीकरणे पाहता एखाद्या पटेल नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करू शकतो. उपमुख्यमंत्री नितिन पटेल या पदासाठी आघाडीवर असल्याचे मानले जाते. पक्षाने पटेल मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नांतर्गत या दिशेने विचार चालविला आहे.

गुजरातमध्ये विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान 9 डिसेंबर रोजी होईल. 7 डिसेंबर रोजी निवडणूक प्रचार संपेल. आतापर्यंतच्या निवडणूक प्रचारात पटेल भागांमध्ये भाजपचा प्रचार सामान्य राहिला. पंतप्रधानांच्या सभेला गर्दी जमली असली तरीही जमावात उत्साहाचा अभाव भाजपला स्पष्टपणे दिसून येतोय. 2012 च्या मोदींच्या सभांमध्ये लोकांचा उत्साह अपूर्व असा होता. दुसरीकडे काँग्रेस देखील पटेल भागांमध्ये खूपच प्रभावी दिसून येते.

भाजपने पटेल मतदार आणि नेत्यांना नेहमीच दुर्लक्षित केल्याचा दावा काँग्रेसकडून होतोय. केशूभाई पटेल, आनंदीबेन पटेल किंवा नितिन पटेल यांना पद दिले तरीही अधिकार दिले नसल्याचा प्रचार पटेल समुदायांमध्ये केला जातोय. आनंदीबेन यांचे मुख्यमंत्रिपद काढून घेतले, नितिन पटेल यांना अखेरच्या क्षणी मुख्यमंत्रिपद नाकारले, अशा प्रकारच्या आरोपांनी भाजपसमोरील अडचणी वाढत आहेत.

या स्थितीची समीक्षा केल्यानंतर पटेल मतदारांना पक्षासोबत राखण्यासाठी निवडणुकीनंतर पटेलाच्या हातात सत्ता सोपविली जाण्याचे संकेत भाजप देऊ शकतो. याकरता पहिल्या टप्प्याच्या मतदानाअगोदर एखाद्या पटेल नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा दावेदार घोषित केले जाईल.