|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » हर्णैतील मच्छिमारांचा सहाय्यक मत्स्य आयुक्तांना घेराव

हर्णैतील मच्छिमारांचा सहाय्यक मत्स्य आयुक्तांना घेराव 

प्रतिनिधी /रत्नागिरी :

अवैध मासेमारी केल्याचा ठपका ठेवून नौकांवर केलेल्या कारवाईविरोधात हर्णै येथील संतप्त मच्छिमारांनी गुरूवारी रत्नागिरीतील सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडक देत अधिकाऱयांना घेराव घातला. मिरकरवाडा बंदरात दुरूस्तीसाठी आणलेल्या नौकेवर कारवाई केल्याचा जाब विचारताच अधिकाऱयांनीही एकमेकांकडे बोटे दाखवली. त्यामुळे संतापलेल्या मच्छिमारांनी नौकांवरील कारवाई तत्काळ मागे न घेतल्यास अधिकाऱयांवर कारवाईसाठी आक्रमक आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

अवैध मासेमारी केल्याचा आरोपाखाली मंगळवारी मत्स्य आयुक्त कार्यालयाकडून 7 नौकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये दापोलीती तालुक्यातील हर्णै येथील नंदकुमार गोपीचंद चोगले व नागेश चंद्रकांत रघुवीर यांच्या दोन नौकांचा समावेश होता. या नौका रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात मंगळवारी आल्या असता तपासणीदरम्यान महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गंत बुल ट्रॉलिंगने मासेमारी तसेच विनापरवाना पर्ससीन मासेमारीनुसार कारवाई करण्यात आली. त्यावेळी नौकांवरील मासळीही परवाना अधिकाऱयांच्या पथकाने जप्त केली.

या कारवाईने दापोलीतील मच्छिमार कमालीच संतप्त झाले आहेत. येथील सर्व मच्छिमार संस्थांच्या पदाधिकाऱयांनी गुरूवारी रत्नागिरी सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडक दिली. या कारवाईबाबत समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत केबीनमधून न हटण्याची भूमिका मच्छिमारांनी घेतली. सहाय्यक मत्स्य आयुक्त आ .बा. साळुंखे कार्यालयात येताच त्यांना उपस्थितांनी घेराव घातला. नौकांवर चुकीच्या पध्दतीने कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. नौका दुरुस्तीसाठी बंदरात आल्या असताना झालेली ही कारवाई कोणत्या नियमाखाली करण्यात आली असा जाब मच्छिमारांनी विचारला.

नौकांचे इंजिनात बिघाड झाल्याने टोईंग करून त्या बंदरात आणण्यात आल्या. या नौकांवरही दंड आकारणी कोणत्या नियमाने करण्यात आली असा सवाल यावेळी करण्यात आला. मिरकरवाडा हे राष्ट्रीय बंदर असून याठिकाणी जिल्हय़ातील नौकांना मासळी उतरविण्याचा अधिकार आहे. आपत्कालीन परिस्थितीतही नौका याठिकाणी येतात. अशावेळी हर्णैतील नौकांवर कारवाई का झाली? नजरेसमोर दिसणाऱया नियम धाब्यावर स्थानिक मच्छिमार नौकांना वेगळय़ा न्याय का? मच्छिमार आपल्या व्यवसायासाठी कर्ज घेतात. अशा कारवाईने ऐन मच्छिमार हंगामात काम रिपोर्ट कमी आल्यास कर्जाचे हप्ते कसे फेडणार असे सवालही करण्यात आला.

यावेळी झालेल्या कारवाईबाबतचे परिपत्रक दाखवा अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी सहाय्यक मत्स्य आयुक्त साळुंखे व बंदर अधिकारी कांबळे यांनी एकमेकांकडे बोटे दाखवली. त्यामुळे मच्छिमारांनी तीव्र संताप व्यक्त केला. जर परिपत्रकच नसेल तर कारवाई तत्काळ मागे घ्यावी. जिल्हय़ातील मच्छिमारांना येथील बंदरात मासळी उतरवण्याचा अधिकार असताना अधिकारी त्याला हरताळ फासत असल्याचा आरोपही करण्यात आला. यापुढे अशा कारवाई करून मच्छिमारांना अडवलात तर अधिकाऱयांविरोधात आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावरच कारवाईसाठी आंदोलनाचा इशारा मच्छिमारांनी दिला आहे.

Related posts: