|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीचे ‘पॅप्टन..पॅप्टन’, कुडाळचे ‘निखारे’ अंतिम फेरीत

रत्नागिरीचे ‘पॅप्टन..पॅप्टन’, कुडाळचे ‘निखारे’ अंतिम फेरीत 

 रत्नागिरी / प्रतिनिधी :

सांस्कृतिक संचालनालय आयोजित 57 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धा रत्नागिरी केंद्राचा निकाल बुधवारी जाहीर झाला. बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाचे ‘पॅप्टन…पॅप्टन’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले. तर वेंगुर्लामधील कलावलय संस्थेच्या ‘निखारे’ नाटकाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कार्य संचालनालयाने यावर्षीपासून प्राथमिक फेरीत 15 नाटके सादर झालेल्या केंद्रावरून 2 नाटके अंतिम फेरीत निवडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यानुसार ‘पॅप्टन..पॅप्टन’ आणि ‘निखारे’ या दोन नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

‘पॅप्टन..पॅप्टन’ नाटकाला दिग्दर्शनासाठी मनोहर सुर्वे, प्रकाश योजनेसाठी संजय तोडणकर, नेपथ्यासाठी प्रवीण धुमक यांना प्रथम पारितोषिके मिळाली आहेत. तसेच अभिनयासाठी ओंकार पाटील यांना उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक प्राप्त केले आहे. अशाप्रकारे प्रथम क्रमांकासह ‘पॅप्टन..पॅप्टन’ नाटकाने एकूण पाच पारितोषिके प्राप्त केली आहेत.

पॅप्टन..पॅप्टन हे नाटक समलिंगी संबंधावर आधारीत होते. समलिंगी संबंध ठेवलेल्या महिलांनी लग्न केले आणि त्यामुळे त्यांना बिरादरीतल्या लोकांनी जीवंत जाळले. त्या महिलांना न्याय मिळण्यासाठी त्या घटनेची बातमी एका महिला पत्रकार करते. मात्र शिपवर असलेला आपला नवराही समलिंगी असल्याचे काळते तेव्हा होणारी तिची द्विधा मनस्थितीवर नाटकावर प्रकाश टाकला आहे. तर द्वितीय क्रमांक प्राप्त ‘निखारे’ हे नाटक वडिलांच्या खुनाचा आरोप असलेला मुलगा निर्दोष असतो. त्याचे वडील तुरूगांचा वारी केलेलाच कुप्रसिद्ध माणूस होता. मात्र त्याचा मुलगा निर्दोष असताना त्याच्यावर खुनाच्या आरोपाचा खटला चालतो. उलट तपासण्या झाल्यानंतर ज्युरी विचारणा करायला गेले. एकूण 9 ज्युरी होते, त्यातील एक ज्युरी मात्र तो मुलगा निर्दोष असल्याचे मांडत होता. तेव्हा यावर चर्चा विमर्श करून शेवटी सर्व ज्युरी तो निर्दोष असल्याच्या निर्णयावर येतात. हा प्रवास उलगडणारे हे नाटक होते.

स्पर्धेचा सविस्तर निकालः- तृतीयः- नाटक-‘अशुद्ध बीजापोटी’ (नाटय़संस्था-साईकला क्रीडा मंच, सिंधुदुर्ग). दिग्दर्शन (प्रथम)- मनोहर सुर्वे (नाटक-पॅप्टन पॅप्टन), द्वितीय- संजय पुनाळेकर (नाटक-निखारे). प्रकाश योजना (प्रथम)- संजय तोडणकर (पॅप्टन..पॅप्टन), द्वितीय- स्वानंद सामंत (नाटक-निखारे). नेपथ्य (प्रथम)- प्रवीण धुमक (नाटक-पॅप्टन..पॅप्टन), द्वितीय- सचिन गोताड (नाटक-ती रात्र). रंगभूषा (प्रथम)- रजनिकांत कदम (अशुद्ध बीजापोटी), द्वितीय- किशोर कदम (भावीण). उत्कृष्ट अभिनय (रौप्य पदक) ओंकार पाटील (पॅप्टन पॅप्टन) व सानिका कुंटे (अशुद्ध बीजापोटी).

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र-अंकिता नाईक (भावीण), रूपाली परब (बिकट वाट वहिवाट), पल्लवी माळवदे (भावीण), सुलेखा डुबळे (अशुद्ध बीजापोटी), प्रसाद खानोलकर (निखारे), केदार देसाई (अशुद्ध बीजापोटी), रविंद्र रेपाळ (कोर्ट मार्शल), महेश पाखरे (कुणीतरी आहे तिथं).

यंदाची 57 वी राज्य नाटय़संस्था 6 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात पार पडली. एकूण 15 नाटकांचा सहभाग नोंद झाला होता. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून श्याम अधटराव, संदिप देशपांडे, डॉ. नयना कासखेडीकर यांनी काम पाहीले. तसेच रत्नागिरी केंद्राचे समन्वयक म्हणून नंदू जुवेकर व त्यांच्या सहकाऱयांनी काम पाहीले. सर्व विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

‘तरूण भारत’ने दिले सर्वप्रथम वृत्त

सांस्कृतिक संचालनालयाने यंदा ऐतिहासिक निर्णय घेतला. प्राथमिक केंद्रावरून यावर्षीपासून अंतिम फेरीत दोन नाटके निवडली जाणार आहेत. हे वृत्त ‘तरूण भारत’ने सर्वप्रथम दिले. या निर्णयाचे नाटय़क्षेत्रातून स्वागत केले जात आहे. छोटय़ा फरकाने द्वितीय स्थानावर गेलेल्या नाटकावरील अन्याय यामुळे दूर झाला आहे आणि अंतिम फेरीत या नाटकालाही उत्तम सादरीकरणाद्वारे क्रमांक प्राप्त करण्याची संधी प्राप्त झाली आहे.