|Saturday, February 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काश्मीरमध्ये चकमकीत पाच दहशतवादी ठार

काश्मीरमध्ये चकमकीत पाच दहशतवादी ठार 

वृत्तसंस्था /श्रीनगर :

जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी झालेल्या चकमकींमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलास यश आले. बडगाम आणि सोपोर सेक्टरमध्ये ही कारवाई झाल्याचे सूत्रांनी सांगितले.               

बडगाम सेक्टरमधील फुत्तलीपोरा गावात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी लपून बसल्याचा माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. भारतीय सैन्यदलाच्या जवानांसह केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि बडगाम पोलिसांनी गावात संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. यावेळी पाखेरपोरा येथील चौकात जमावाने सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकही केली. जमावाला पांगविल्यानंतर झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याचे सूत्रांनी सांगितले. बारामुल्ला जिल्हय़ातील सोपोर सेक्टरमधील सागिपोरा गावात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. दरम्यान, बुदगाम आणि पुलवामा जिल्हय़ातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

काश्मीरमध्ये मागील अकरा महिन्यात 200 दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने धडक मोहीम राबवली आहे. मागील 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस  भारतीय सैन्यदल, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त मोहिमांमध्ये तब्बल 200 दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी ट्विटरच्या माध्यमातून गुरुवारी दिली. या कारवाईमुळे राज्यात शांतता आणि स्थैर्य येण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, 2010 या वर्षात चकमकींमध्ये 270 दहशतवादी ठार झाले होते. तर 2015-16 मध्ये अनुक्रमे 100 आणि 165 दहशतवादी ठार झाले होते. दहशतवादी हल्ल्यांमध्ये यावर्षी 77 जवान हुतात्मा झाले. तर 54 नागरिकही मृत्युमुखी पडले आहेत. दहशतवादी हल्ल्यात नागरिक ठार होण्याचे प्रमाण हे मागील 14 वर्षांमधील सर्वाधिक आहे.

Related posts: