|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ऐतहासिक ‘थिबापॅलेस’ची दुरूस्ती अंतिम टप्प्यात

ऐतहासिक ‘थिबापॅलेस’ची दुरूस्ती अंतिम टप्प्यात 

जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या भूमिकेनंतर कामाला गती

राजवाडय़ाला मिळणार नवी झळाली

लवकरच पर्यटकांना मूळ व नव्या रुपात खुला होणार

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरीतील पर्यटनाच्या जागतिक नकाशावर असलेल्या ऐतहासिक थिबा राजवाडय़ाच्या दुरूस्तीसाठी शासनस्तरावरून कोटय़ावधीचा निधी खर्च केला जात असताना दुरूस्तीच्या कामाने वेग घेतला आहे. जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी जानेवारीमध्ये याठिकाणी आकस्मिक भेट देऊन निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत अधिकाऱयांची कानउघडणी केली होती. काम करणारे ठेकेदार व इंजिनीयरांवर त्यावेळी दिलेल्या कारवाईच्या इशाऱयानंतर आता राजवाडय़ाच्या अंतर्गंत फर्निचर आदी कामे अंतिम टप्प्यात नेण्यासाठी जोरदार वेग आलेला आहे.

थिबापॅलेस हे पर्यटनाच्या दृष्टीने खास आकर्षणाचे ऐतहासिक स्थळ आहे. ब्रिटीशांनी 1885 मध्ये ब्रम्हदेशच्या राजाला स्थानबध्द करुन रत्नागिरीत आणले. त्याला नजरकैदेत ठेवण्यासाठी सन 1910 मध्ये 3 मजली राजवाडय़ाची उभारणी ब्रिटीशांनी केली. त्यामध्ये 1911 मध्ये थिबा राजा राहण्यासाठी गेल्याची इतिहासात नोंद आहे. या राजवाडय़ात थिबा व त्याच्या कुटुंबियांचे अनेक वर्षे वास्तव्य राहिले. त्यामुळे या ऐतहासिक वास्तुला पर्यटनाच्या नकाशावर अन्यन्यसाधारण महत्व आहे. ही ऐतहासिक वास्तू पाहण्यासाठी देश व विदेशातील पर्यटक वारंवार भेटी देतात. रत्नागिरीच्या पर्यटन स्थळांपैकी हे एक खास आकर्षण ठरते.

आज या राजवाडय़ाचे जतन व संरक्षण करण्याची जबाबदारी येथील पुरातत्व विभागाकडे आहे. या वास्तुच्या देभभाल व दुरूस्तीसाठी शासनस्तरावरूनही वेळोवेळी भरीव निधी मंजूर पेला जात आहे. पर्यटन निधीतूनही या स्थळाचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. पण मागील काळात त्याला मूर्त स्वरूप येत नव्हते. या वास्तू व परिसराच्या देखभाल व दुरूस्तीच्या नावाखाली लाखों ते कोटींचा निधी खर्च होत आहे. गेल्या 2005 साला पूर्वीपासूनही त्यासाठी निधी खर्च होत असल्याचे सुत्रांकडून सांगितले जात आहे. त्यासाठी पूवीं 65 लाखाचा दुरुस्तीवर खर्च झालेला होता.

त्यानंतर अलिकडे राज्य संरक्षित स्मारक जतन-दुरूस्ती योजनेतून राजवाडय़ाच्या छताच्या कामासाठी 1 कोटीचा निधी मंजुर झाला. तसेच आतील लाकडी सामान त्यामध्ये खिडक्या, दरवाजे, बडोद बदलणे, लादय़ा आदी कामांसाठी 1 कोटी 35 लाखाचा निधी मंजूर झाला. या मंजूर निधीतील छतदुरूस्तीचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. उर्वरित लाकडी सामान बदलणे व दुरूस्ती आदी कामे देखील आता प्रगतीपथाकडे जाण्याच्या मार्गावर आहेत. या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी काही महिन्यांपूर्वी राजवाडय़ाला भेट दिली होती. त्यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी व संबधित ठेकेदार यांचीही तारांबळ उडाली होती. अपेक्षेप्रमाणे काम होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करून दुरूस्तीच्या कामात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयांनी वैयक्तिकरित्या गांभीर्याने लक्ष घालण्याच्या सक्त सुचनाही त्यांनी केल्या होत्या. त्यानंतर आता राजवाडा अंतर्गत दुरूस्तीची कामे वेगाने सुरू झालेली दिसून येत आहेत. त्यामुळे हे काम मार्गी लागल्यानंतर राजवाडय़ाला नवी झळाली येऊन तो पर्यटकांना पाहण्यास खुला होणार आहे.

Related posts: