|Saturday, October 20, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रीपद सीआयए प्रमुखाकडे

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रीपद सीआयए प्रमुखाकडे 

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव ही तशी जागतिक राजकारणातली महत्त्वाची व्यक्ती असतेच. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणूक झाली की आठ-पंधरा दिवसांत त्या पदावरील व्यक्तीचे नाव जाहीर केले जाते आणि ते ऐकून जगभरातील सर्व राज्यकर्ते संबंधित व्यक्तीची धोरणे, त्यांचा आपापल्या राष्ट्रांवर होणारा परिणाम वगैरे विषयांची चर्चा करतात.

विद्यमान परराष्ट्र सचिव रेक्स टिलरसन यांचे नाव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा जाहीर केले तेव्हा अशीच चर्चा झाली होती. टिलरसन ही खरे म्हणजे ट्रम्प यांच्यासारखेच तेल उद्योगातली बडी असामी. ‘एक्झॉम मोबिल’ या उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असणारे टिलरसन पेशाने सिव्हिल इंजिनिअर. ते अमेरिकेचे 69 वे परराष्ट्र सचिव फेब्रुवारी 2017 च्या पहिल्या तारखेला त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आणि कालच, 30 नोव्हेंबर रोजी त्याला दहा महिने पूर्ण झाले.

टिलरसन यांनी ती खुर्ची भूषविली तेवढी पुरे झाली, आता त्यांना घरी पाठवावे असा विचार गेल्या काही आठवडय़ात ट्रम्प यांच्या मनात बळावला. त्यानुसार टिलरसन महाशयांची परराष्ट्र सचिव पदावरून उचलबांगडी होणार आणि त्या जागी माईक पोम्पेओ यांची नियुक्ती होणार असे वृत्त अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या नामांकित वर्तमानपत्राने नुकतेच दिले. अर्थात ट्रम्प यांच्या कार्यालयाने ते घाईघाईने खोडून काढले.

‘रेक्स आहेत,’ अशा शब्दात ‘व्हाईट हाऊस’च्या प्रेस सेक्रेटरी सारा सँडर्स यांनी वरील वृत्ताचा इन्कार केला असला तरी टिलरसन यांच्या हकालपट्टीची योजना ‘चीफ ऑफ स्टाफ’ जॉन केली यांच्यासारख्या ‘व्हाईट हाऊस’मधील उच्च पदस्थाने बनविल्याचे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने छापले आहे. टिलरसनच्या गच्छन्तीने वादळी कारभाराचा शेवट होईल असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने नमूद केले आहे.

टिलरसनच्या जागी नियुक्ती केली जाणारी व्यक्ती सध्या ‘सीआयए’ या अमेरिकेच्या नावाजलेल्या गुप्तहेर खात्याच्या संचालकपदी कार्यरत आहे. माईक मोम्पेओ हे या व्यक्तीचे नाव. पोम्पेओ यांची नियुक्ती त्या पदावर झाल्यापासून थोडय़ाच काळात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी जवळीक प्रस्थापित करण्यात ते यशस्वी झाले. देशांतर्गत नव्हे तर जगभरात घडणाऱया महत्त्वाच्या घटनांची तपशीलवार माहिती पोम्पेओ दररोज राष्ट्राध्यक्षांना देतात. अर्थात जगातल्या अन्य लहान मोठय़ा देशांमधील पोलीस व गुप्तहेर खात्यांचे उच्च पदस्थ आपापल्या राज्यकर्त्यांना अशीच माहिती देत असतात. परंतु अमेरिकेची ‘सीआरए’ ही गुप्तहेर यंत्रणा जगातल्या अति प्रभावशाली गुप्तहेर यंत्रणांमध्ये मोजली जाते, आणि केवळ घडामोडींची माहिती देऊन ती थांबत नाही, तर अमेरिकेच्या वर्चस्ववादी राजवटीला आव्हान देणाऱया, अथवा आव्हानही न देता स्वतःचा वेगळा मार्ग चोखाळणाऱया राजकीय व्यक्तींचे काटे दूर करणारी कारस्थानेही ती पार पाडते. अशा संस्थेचा प्रमुख आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित खात्याचा प्रमुख होणे याचा अर्थ खूप व्यापक आहे.

सीआयए’, ‘पेण्टॅगॉन’ हे लष्करी मुख्यालय या संस्था अमेरिकेच्या प्रशासनात आणि राजकारणात फार महत्त्वाच्या मानल्या जातात. राष्ट्राध्यक्षांच्या मनात असलेल्या गोष्टी घडवून आणण्याचे कामही त्या करतात. जगातील बारीक सारीक राजकीय घडामोडींची माहिती त्यांच्याकडे असते. अशा संस्थेचा कारभार सांभाळलेली व्यक्ती परराष्ट्र सचिवपदी बसल्यावर आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचे निर्णय होणे आणि जागतिक सारीपाटाच्या पटावर आपल्याला हव्या तशा सोंगटय़ा टाकणे हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सोपे जाईल असे मानता येईल.

परंतु गेल्या वर्षभरात महत्त्व प्राप्त झालेल्या माईक पोम्पेओ यांची पार्श्वभूमी पाहता हे तितके साध्य होईल का याचीही शंका वाटते. यांचे कारण असे की ट्रम्प यांच्या मनातले विचार आणि पोम्पेओ यांचे मनसुबे परस्परांशी जुळतात. ‘इराण’ आणि ‘जागतिक इस्लामी दहशतवाद’ या दोन गोष्टी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला सर्वाधिक धोका निर्माण करतात यावर ट्रम्प आणि पोम्पेओ यांचे विचार समान आहेत. रशियाकडेही शत्रुत्वाच्या नजरेने पाहण्यात दोघेही सारखेच आहेत. विशेष म्हणजे भूतकाळात ‘सीआयए’ने अनेकांचा छळ केला हे या दोघांनाही मान्य नाही. उलट ‘सीआयए’ची माणसे देशभक्त होतील यावर त्यांचे एकमत आहे. (चे गव्हेरासारख्या क्युबन नेत्याला संपविण्यात ‘सीआयए’चा हात होता यासारखे विचार त्यांना मान्य नाहीत.)

असे असले तरी पोम्पेओ हे ‘सीआयए’शी एकनिष्ठ होते की ‘ट्रम्प या व्यक्तीशी, हा प्रश्न अमेरिकन माध्यमांमध्ये चघळला जात आहे. याचे कारण असे की ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या काळात रशियाचा हस्तक्षेप होता की नव्हता याबाबत पोम्पेओ यांनी व्यक्त केलेले विचार परस्पर विसंगत आहेत. या हस्तक्षेपाबद्दल बोलताना जानेवारी महिन्यात ‘सीआयए’प्रमुख पोम्पेओ यांनी स्पष्ट केले होते, ‘2016 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीवरील रशियन हालचालींच्या प्रभावाची चिकित्सा आम्ही केली नाही.’

आता मात्र हेच महाशय सांगत आहेत, ‘2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीवर रशियन प्रभाव दिसला नाही असे गुप्तहेर यंत्रणांचा निष्कर्ष आहे.’ यावरून ट्रम्प यांची री ओढणे हेच पोम्पेओ यांना मिळत असलेल्या बढतीचे रहस्य असावे असे अमेरिकेतील जाणकारांना वाटते.

अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवाला रशियाची तपशीलवार माहिती असणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. पोम्पेओंना ती असेलही, परंतु रशियाद्वेष्टी नजर कायम ठेवणे अमेरिकेला परवडणारे नाही. इराण आणि इस्लामी दहशतवाद या दोघांनाही ‘धोकादायक’ मानणारे आणि इराणच्या अणुशक्ती कार्यक्रमाला मनापासून विरोध करणारे परराष्ट्र सचिव कार्यरत झाले तर भारताची आणि इराणची सध्याची
 दृढ मैत्री हा त्यांना भारत-अमेरिका संबंधाबाबत अडसर वाटू शकतो. इस्लामी राष्ट्रांकडे पाहण्याच्या विशिष्ट दृष्टिकोनामुळे भारतातून अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱया भारतीय मुसलमानांना †िव्हसा प्रदान करण्याबाबतच्या धोरणावरही परिणाम होऊ शकतो.

टिलरसन यांचा परराष्ट्र सचिव पदावरून काही ठसा उमटला नाही, माईक पोम्पेओ त्या पदावर बसले तरी ठसा उमटण्याची शक्यता नाही, परंतु त्यांच्या विशिष्ट मतांमुळे आणि ट्रम्पच्या ‘हो’ ला ‘हो’ म्हणणाऱया सवयीमुळे पुढील तीन वर्षात अमेरिकेचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींना कदाचित वेगळीच दिशा मिळेल.

Related posts: