|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गुजरातमध्ये निवडणुकांचा जाळ अन् महाराष्ट्रात धूर

गुजरातमध्ये निवडणुकांचा जाळ अन् महाराष्ट्रात धूर 

एन्झायटी हा मानवी गुण महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना सध्या लागू पडत आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांचा जाळ लागला असून त्याचा धूर दोन वर्षे आधीच महाराष्ट्रातून निघू लागला आहे.

माणूस हा कल्पनाशक्तीवर चालणारा प्राणी आहे. आजूबाजूला घडणाऱया सुखकारक घटनांमध्ये तो आपसुकच गुलाबी होतो. आणि जर अवतीभोवती भयानक घटना घडू लागल्या की त्याचा थरकाप उडालेला असतो. वास्तविक दोन्ही प्रकारच्या घटनांमध्ये त्याचा अर्थोअर्थी काही संबंध नसला तरी सभोवतालच्या वातावरणावरून स्वतःचे अनुमान काढण्याचा मानवी स्वभाव पुढे येतो. वैद्यकीय शास्त्रामध्ये याला ‘एन्झायटी’ म्हणतात. खरं तर याला एकप्रकारची वैज्ञानिक अंधश्रद्धा म्हणता येईल. जुन्या कोण्या मित्राला हृदयविकाराचा झटका आला असेल तर आपलेही बीपी मोजून घेण्यासारखाच हा प्रकार आहे. एन्झायटी हा मानवी गुण महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना सध्या लागू पडत आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांचा जाळ लागला असून त्याचा धूर दोन वर्षे आधीच महाराष्ट्रातून निघू लागला आहे.

गुजरात निवडणुकांची पार्श्वभूमी तयार करताना झालेल्या पाटीदार आंदोलनातून ‘हार्दिक पटेल’ पुढे आला. मात्र महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चातून राजकीय पक्षांना अपेक्षित असलेला कोणी ‘हार्दिक पाटील’ पुढे आलेला नाही. उलटपक्षी विरोधकांच्या ताब्यातील अनेक पाटील सत्तेच्या मार्गावर जाऊ लागल्याने विरोधकांचा भ्रमनिरास झाल्याचे वातावरण आहे.

आपल्या दिवाळीचा आनंद शेजारच्या आनंदाशी मोजून घेण्याचा मराठी स्वभाव आहे. प्रत्येक बाबतीत शेजाऱयाशी तुलना करण्याच्या या स्वभावामुळे गुजरात निवडणुकीचा अन्वयार्थ महाराष्ट्रात लावला जात आहे. गुजरात ही महाराष्ट्राची धाकटी पाती असल्यामुळे तिथल्या घटनांचा थोरल्या पातीवर काय व कसा परिणाम होईल याकडे साऱयांचे डोळे लागलेले आहेत.

गुजरात निवडणूक साऱया देशासाठी महत्त्वपूर्ण आहे. विधानसभेची एकही जागा कमी होणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी पराभवाहून कमी असणार नाही. तर पक्षाध्यक्ष व्हायला निघालेल्या काँग्रेसच्या राहुल गांधींना गुजरातची ही निवडणूक ‘करो या मरो’ सारखीच झाली आहे. सत्तेतून एकही जागा कमी होऊ नये म्हणून मोदी-शहांकडून राजकारणाचे सगळे डावपेच आखले जात आहेत. अवघ्या 188 जागांसाठी 14 केंद्रीय मंत्री व 14 अतिमहनीय व्यक्ती रणांगणात उतरवत भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. आगामी दोन वर्षानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने अशीच ताकद पणाला लावली तर….? या प्रश्नानेच महाराष्ट्रातल्या सेना, राष्ट्रवादी, काँग्रसेच्या काळजात धडकी भरवली आहे.

गुजरात निवडणुकीची पार्श्वभूमी पाटीदार आंदोलनावर उभी करण्याचा प्रयत्न बऱयापैकी फसला आहे. कोणत्याही पक्षाचे नाव न घेता गुजरातमध्ये पाटीदार आंदोलन उभे राहिले. काहीशा त्याचप्रकारे महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाकडे पाहिले जात आहे. पाटीदार आंदोलनाने गुजरातला हार्दिक पटेल दिला. तसा मराठा क्रांती मोर्चातून कोणी पाटील तयार होईल अशी पवारप्रणीत विरोधी विचारधारेची अपेक्षा होती ती फोल ठरली. उलटपक्षी राष्ट्रवादी व काँग्रेसमधील अनेक पाटील भाजपाच्या ताटाखाली जावून बसले.

औरंगाबाद खंडपीठाने जालन्यातील निवडणूक रद्द ठरवल्यामुळे सेनेचे संख्याबळ आणखीनच घटले. राज्यमंत्री खोतकरांना उशीर करणे नडले. सत्तेत राहून विरोधकांची भूमिका पार पाडणाऱया सेनेला ना सत्तेची ऊब मिळते आहे ना विरोधाचे समाधान. आत्ता भाजपाच्या हो मध्ये हो मिळवत राहिलो तर आगामी निवडणुकीत तोंडावर पडू या भीतीने उद्धव ठाकरेंनी शक्य त्या ठिकाणी भाजपाला विरोध करण्याचे तंत्र अवलंबले आहे. तर फडणवीसांनी सेनेच्या कोणत्याच विरोधाला फारसे महत्त्व दिलेले नाही.

नारायण राणेंच्या आमदारकीला शिवसेनेने विरोध करावा ही फडणवीसांचीच इच्छा…. त्यामुळे नारायण राणेंच्या स्वाभिमानाला शिवसेनेच्या काठीने ठेचण्याचा अचूक डाव त्यांनी साधून घेतला. सेना-भाजपमध्ये दरी वाढवण्यासाठी पवारांना कधी घर तर कधी घाट असे पळावे लागत आहे.

सत्ता भाजपची, विरोध सेनेचा आणि लुडबुड राष्ट्रवादीची अशा वातावरणात राज्यातील काँग्रेस दिवसेंदिवस गलितगात्र होत आहे. अशोक चव्हाणांनानंतर काँग्रेसने डागलेले ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्र आता उपाध्यक्षाच्या रूपाने पुन्हा दिल्लीत घेऊन जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्यासारखा राष्ट्रीय स्तरावरचा नेता राहुल गांधींच्या अध्यक्षपदानंतर दिल्लीतच असावा अशी विचारधारा सक्रिय होत आहे.

गुजरात निवडणुकीची एन्झायटी असलेल्या महाराष्ट्रातील पक्षांनी स्व. यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीदिनी आपापली रणनीती आखली. राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने पक्षात जान आणण्याबरोबरच दुसऱया फळीतील नेत्यांना पहिल्या फळीत आणण्याची मोहीम गतिमान केली आहे. तर त्याचवेळी भाजपाने अभिवादन यात्रेची आखणी केली. विदर्भातला अनुशेष पश्चिम महाराष्ट्राने ओढून नेला अशी कित्येक वर्षे ओरड करणाऱया विदर्भातल्या फडणवीसांनी या स्मृतीदिनी चव्हाण साहेबांच्या समाधीला प्रथमच अभिवादन केले.

हल्लाबोल व अभिवादन यात्रा यांच्या दुसऱयाच दिवशी चव्हाण साहेबांच्या कराडात येऊन उद्धव ठाकरेंनी, ‘सरकार कोणाचेही असो, मी शेतकऱयांसोबतच आहे’, असे ठणकावून सांगितले.

गुजरात निवडणुकीतील घटनाक्रमाचा आपापल्या दृष्टीने अन्वयार्थ काढून राजकीय पक्षांची वाटचाल सुरू आहे. जाळ तिकडे लागला असला तरी इकडून आत्ताच धूर सुरू झाला आहे.

दीपक प्रभावळकर

Related posts: