|Saturday, October 20, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नांगरे पाटील यांची कबुली!

नांगरे पाटील यांची कबुली! 

सांगलीच्या अनिकेत कोथळेचा पेलीस कोठडीत अत्याचाराच्या अतिरेकाने मृत्यू आणि विल्हेवाट लावण्यासाठी आंबोलीत मृतदेह जाळण्याच्या माणुसकीला काळिमा फासणाऱया घटनेने पोलीस दलाची देशभर बदनामी झाली आहे. एका सहाय्यक निरीक्षकासह काही पोलीस जेलमध्ये तर उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱयासही आरोपी करावे यासाठी बंद, मोर्चे, आंदोलने झाली आहेत.  तपास सीआयडीकडे सोपविला आहे. पण अर्धवटच! राज्यातील एक नामवंत अधिकारी आणि कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या अखत्यारित झालेल्या या घटनेबद्दल समाजाची क्षमा मागत पोलिसांना चूक सुधारण्याची संधी मागितली आहे. पण, चुकीला माफी असते गुन्हय़ाला नाही हे सांगायची वेळ आली आहे. अनिकेत कोथळेला कोणत्या कारणांमुळे पोलिसांनी गुन्हय़ात गुंतवले येथपासूनच तपासाची गरज होती. प्रत्यक्षात 20 दिवसानंतरही तो तपास सुरू केला नाही. पुरती बेअब्रु झाल्यानंतर शासनाने सीआयडीकडे प्रकरण वर्ग केले. मात्र फक्त कोठडीतील मृत्यूच्याच तपासाचे अर्धवट आदेश निघाले. दरम्यान आरोपींची 14 दिवसांची पोलीस कोठडी संपली आणि आता ते न्यायालयीन कोठडीत गेले आहेत. एकाच गुन्हय़ाच्या तपासासाठी त्याच त्या आरोपींना पुन्हा ताब्यात घेणे, अटक आणि चौकशी करणे जवळपास अशक्यच असते. त्यामुळे सीआयडीला या आरोपींना तपासण्याची पुरती संधी पुन्हा मिळेल का, हा प्रश्नच आहे.  विश्वास नांगरे-पाटील यांची संपूर्ण देशाला ओळख निर्माण झाली आहे, ती 26/11 च्या हल्ल्यावेळी ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांशी दिलेल्या झुंजीमुळे. प्राणाची बाजी लावून मुंबई पोलिसांनी देशावरील तो हल्ला परतवून लावला आणि अजमल कसाबसारख्या अतिरेक्याला जिवंत पकडून पाकिस्तानचा भारतविरोधी कावा उघडकीस आणला. महाराष्ट्र पोलिसांच्या बाबतीत बोलताना अभिमानाने मान उंचावून सांगावी अशीच ही कामगिरी. मात्र समाज जसा या कामगिरीचे कौतुक करतो त्याच पद्धतीने सांगलीसारख्या घटनेची निंदा करणार हे गृहितच आहे. पण, समाजाने निंदा केली म्हणून पोलीस दलाने आपले काम ठप्प ठेवणे कितपत योग्य आहे? त्यातून सुधारण्याची संधी मिळणार कशी? कालांतराने लोक घटना विसरून जातात. मात्र कोथळे हत्येसारख्या घटनांचे व्रण समाजाच्या मनावर कायम राहतात. यातील आरोपींना शिक्षा करण्यासाठी संपूर्ण पोलीस दलाने शक्ती पणाला लावणे ही यातून प्रायश्चित्ताची खरी गरज आहे. मात्र प्रत्यक्षात हा तपास रेंगाळलेला आहे. न्यायवैद्यक प्रयोग शाळेने अद्याप डीएनएचा अहवाल दिलेला नाही. त्याला इतका विलंब का लागत आहे, हे कोणीही जाहीर करीत नाहीत. सीआयडी संपूर्ण सत्य समोर आणेल असे नांगरे-पाटील यांनी जाहीर केलेले आहे. मात्र सीआयडीकडे संपूर्ण प्रकरणाचा तपासच सेपवलेला नाही. मग कोणत्या प्रकारचे सत्य समाजासमोर येणार हा प्रश्नच आहे. हे संपूर्ण प्रकरण सोपवा अशी मागणी अजून सीआयडीनेही केलेली नाही आणि सरकारनेही दिलेली नाही. तशातच साक्षात मुख्यमंत्र्यांच्या दौऱयात वादग्रस्त अधिकाऱयांना मुख्यमंत्र्यांना भेटून म्हणणे मांडण्याची मिळालेली संधी समाजाची चिंता वाढवते. दुसरीकडे कोथळे कुटुंबीयांना मात्र मुख्यमंत्री भेटलेले नाहीत. फडणवीस यांची इच्छा असतानाही केवळ एका मंत्र्याच्या सांगण्यावरून ती भेट झाली नाही! त्यामुळे अधिवेशनात या विषयावर आरोप, प्रत्यारोप आणि घोषणाबाजीच होणार हे नक्की. मात्र हा कालापव्यय तपासावर मोठा परिणाम करू शकतो. ज्या पोलीस दलाला माफ करण्याची मागणी नांगरे-पाटील यांनी समाजासमोर केली आहे त्याच दलातील एका वादग्रस्त अधिकाऱयाने आपण यातून बचावल्याच्या आनंदात यंदाच्या 26/11 च्या स्मृतीदिनी जंगी पार्टी केली. नांगरे-पाटील यांच्यासह संपूर्ण समाज सांगलीत शहीद पोलीस अधिकाऱयांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती लावत होते त्याच काळात हे वादग्रस्त लोक पार्टीचे आयोजन करत होते. त्यांच्या लेखी शहीदांच्या बलिदानाच्या आणि शहीद पोलीस कुटुंबांच्या दुःखापेक्षा आपल्या आनंदाला अधिक महत्त्व होते. अशा लोकांच्या गुन्हय़ाला आणि गैरवर्तणुकीला ना समाज माफ करू शकतो ना पोलीस दल. त्यामुळे चूक आणि गुन्हा यात गल्लत न करता गुन्हेगारांना शिक्षेच्या ठिकाणापर्यंत पोचवण्याचे पोलीस दलाचे व्रत पाळण्याची ही वेळ आहे, हे समजूनच कृतीची अपेक्षा आहे. तसे झाले तर समाज ही दुर्घटना विसरूनही जाईल नाही तर पोलिसांचा हा गुन्हा नांगरे-पाटील यांच्यासारख्या कितीही वरिष्ठ अधिकाऱयांनी माफ करायची मागणी केली तरी समाज माफ करणार नाही. नांगरे-पाटील यांच्या कबुलीतील प्रामाणिकपणा ही समाजाचीही पोलिसांबद्दल विश्वास वाढविणारी घटना असली तरी त्याचे प्रतिबिंब तपासात उमटून सर्व गुन्हेगारांना शिक्षा होण्याइतपत कठोर होणे गरजेचे आहे. ती एकटय़ा सीआयडीची नव्हे तर नांगरे-पाटलांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण परिक्षेत्रातील पोलीस दलाचीही जबाबदारी आहे. या पद्धतीच्या तपासावर आमचा विश्वास नाही, प्रकरण सीबीआयकडे सोपवा म्हणत अनिकेतच्या दोघा भावांनी नुकताच पोलीस ठाण्यासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही देखील तितकीच दुःखद घटना. खुद्द नांगरे पाटील यांनी संपूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात पहिला गुन्हा कसा दाखल झाला, त्याबाबतीत कशा चुका घडल्या, पोलीस दलाने कसे वागले पाहिजे होते. याबाबतची वक्तव्ये नांगरे-पाटील यांनी केली आहेत ती पुरेशी बोलकी आहेत. सांगली पोलिसांनी आपल्या हातात असणारा कायदा कसा वापरला हेच त्यांनी दाखवून दिले आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात अनेक घटनांमध्ये पोलीस अशाच पद्धतीने चुका करतात. त्या कधी जाणून-बुजून तर कधी अजाणतेपणे घडतात. मात्र, सांगलीतील घटना जाणून-बुजून घडविली असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. तशी कबुली नांगरे-पाटील यांच्या वक्तव्यातून आली आहे. त्यामुळे ही चूक दुरूस्त करायची आणि गुन्हेगारांना माफी नाही हे दाखवून द्यायचे काम सीआयडीपेक्षा पोलिसांनाच करायचे आहे.

Related posts: