|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महामार्ग चौपदरीकरणाला चिपळूण टप्प्यात प्रारंभ

महामार्ग चौपदरीकरणाला चिपळूण टप्प्यात प्रारंभ 

वृक्षतोड, सपाटीकरण,बांधकामे काढण्यास सुरूवात,

पेढे ते खेरशेतपर्यंतचा टप्पा खड्डेमुक्त

 

प्रतिनिधी /चिपळूण

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या रत्नागिरी जिह्यातील कामाला अखेर प्रारंभ झाला आहे. पेढे ते खेरशेत या चिपळूण तालुक्यातील 37 कि. मी.च्या टप्प्यात बाधित वृक्षांच्या तोडीसह जमीन सपाटीकरण, इमारती बांधकामे काढण्यास नुकतीच सुरूवात झाली आहे. दरम्यान, महामार्गावरील खड्डे भरण्याचे कामही वेगाने सुरु आहे.

खेरशेत ः मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी चिपळूण टप्प्यात सुरू झालेले जमीन सपाटीकरण.

जिह्यातून जाणाऱया 275 कि.मी. पैकी खेडमधून 50, चिपळूण 37, रत्नागिरी 56, संगमेश्वर 72, लांजा 25 तर राजापूर तालुक्यात 35 कि.मी.चा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गाचे चौपदरीकरण होत असून कंत्राटदारांची नियुक्तीही झाली आहे. चौपदरीकरणाचे काम होईपर्यंत याच कंत्राटदारांनी महामार्गाची देखभाल दुरुस्ती क्करणे अभिप्रेत आहे. मात्र हे काम जिल्हय़ात योग्यपध्दतीने झालेले नसल्याबाबत विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली. मात्र तरीही चिपळूण वगळता इतर ठिकाणचा महामार्ग अद्यापही खड्डेमुक्त झालेला नाही. पेढे-सवतसडा ते खेरशेत दरम्यानचे काम करणाऱया परशुराम-आरवली हायवे प्रा. लि. या कंपनीने आपल्या टप्प्यातील खड्डे पूर्णपणे भरले आहेत.

चौपदरीकरणासाठी चिपळूण ते खेरशेतदरम्यानच्या टप्प्यातील शहर वगळून मोबदला वाटप केलेल्या एकूण तीनशेहून अधिक इमारत मालकांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने नोटीसा देऊन जागा खाली करून देण्याच्या सूचना दिल्यानंतर आता बांधकाम हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. खेरशेत, आगवे ते सावर्डे दरम्यानही कार्यवाही सुरू झाली आहे. चिपळूण शहराबरोबरच तालुक्यातील परशुराम, पेढे, वालोपे, कळंबस्ते, कापसाळ, कामथे, कामथे खुर्द, कोंडमळा, सावर्डे, कासारवाडी, आगवे, असुर्डे आणि खेरशेत या तेरा गावांतून महामार्ग जात आहे. महामार्ग चौपदरीकरणात बाधित होत असलेले वृक्ष तोडण्याचे कामही सुरू झाले आहे. काही भागात जमीन सपाटीकरणही सुरू करण्यात आलेले आहे. या टप्प्यातील चौपदरीकरणातील बहुतांश कामाला खेरशेत येथून सुरूवात करण्यात आलेली आहे.

दरम्यान, वृक्षतोड, सपाटीकरण, बांधकाम काढण्याबरोबरच रस्त्याची मध्यरेषा निश्चित करण्याचे कामही हाती घेण्यात आलेले आहे. यानंतर पाणीपुरवठा, वीजवाहिन्या, दूरध्वनी केबल आदींचे स्थलांतर हाती घेण्यात येणार आहे. महामार्गाचे कार्यकारी अभियंता पी. पी. बनगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील उपविभागीय अभियंता व्ही. एस. पवार, शाखा अभियंता आर. आर. मराठे, श्रीमती एम. ए. अहीरराव आदी चौपदरीकरणाच्या कामावर लक्ष ठेऊन आहेत.

Related posts: