|Sunday, January 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » स्थानिक स्वराज संस्थांमध्येही भाजपची बाजी

स्थानिक स्वराज संस्थांमध्येही भाजपची बाजी 

उत्तर प्रदेशात 16 पैकी 14 महापौर भाजपचे काँग्रेसचा पूर्णपणे सफाया

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार बाजी मारली आहे. 16 पैकी 14 महापौर पदांवर विजय मिळवला आहे. तर अनेक ठिकाणी भाजपने लक्षणीय आघाडी घेतली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आघाडी घेतल्याने भाजपच्या ‘संसद से पंचायत तक’ घोषणा सत्यात उतरली आहे. या निवडणुकीतील विजयाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावरही शिक्का मोर्तब झाले आहे. काँग्रेसचा पूर्णपणे सफाया तर सपा, बसपाची यथातथा कामगिरी हे या निकालाचे वैशिष्टय़ ठरले आहे. गेल्या महिन्यात 22, 26 आणि 29 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात येथे मतदान झाले होते. शुक्रवारी याची मतमोजणी सुरु करण्यात आली. भाजपच्या या विजयाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पाया भक्कम करण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लखनऊला गेल्या 100 वर्षांमध्ये पहिल्यांदाच महिला महापौर मिळाल्या आहेत. भाजपच्या संयुक्ता भाटिया यांनी चौरंगी लढतीमध्ये काँग्रेससह सपा, बसपा आणि आप उमेदवारांचा पराभव केला आहे. तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदार संघातच काँग्रेसला एकाही जागा मिळवता न आल्याने त्यांना प्रचंड टिकेचा सामना करावा लागत आहे. योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेससाठी हा निकाल डोळय़ात अंजन घालणारा आहे. गुजरातमध्ये विजयाची स्वप्ने पाहणाऱया काँग्रेसला स्वतःच्याच मतदार संघात पराभव स्वीकारावा लागला असल्याने त्यांनी गांभीर्याने विचार करावा, असा सल्लाही दिला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विजयाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शुभेच्छा दिल्या असून ‘देशात पुन्हा विकासच जिंकला’ असल्याची मार्मिक टिप्पण्णी केली आहे.

गेल्या महिन्यात 22, 26 व 29 अशा तीन टप्प्यांमध्ये उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक झाली होती. 16 महानगरपालिका, 198 नगरपालिका आणि 438 नगरपंचायातींसाठी हे मतदान झाले होते. सुमारे साडेतीन कोटी मतदारांनी म्हणजे 53 टक्के मतदारांनी हक्क बजावला होता. शुक्रवारी या ठिकाणी मतमोजणी सुरु करण्यात आली होती. दुपारनंतर भाजपच्या दिशेने कौल मिळू लागल्यानंतर सर्वत्र जल्लोष सुरु झाला. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला मात्र दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभेला या दोन्ही पक्षांनी युती केली होती. परंतु तेथेही त्यांचा पराभवच झाला होता. भाजपच्या या विजयी घोडदौडीमुळे ‘संसद से पंचायत तक’ ही घोषणा सत्यात उतरल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला महापौर पदाचे खातेही उघडता आलेले नाही. तर शुक्रवारी सायंकाळपर्यंतच्या निकालामध्ये काँग्रेसच्या वाटय़ाला महापलिकेतील 76 नगरसेवक, नगरपालिकेचे 2 अध्यक्ष आणि 72 सदस्य, नगरपंचायतीचे 7 अध्यक्ष एवढय़ा अल्प विजयावर समाधान मानावे लागले होते.

काँग्रेस, सपाचा पराभव होण्याबरोबरच या निवडणुकीने भाजपच्या देशव्यापी विस्तारातही आघाडी घेतली हे वैशिष्टय़ ठरले आहे. याशिवाय लखनऊमध्ये भाजपच्या संयुक्ता भाटिया यांचा विजय झाल्याने गेल्या 100 वर्षात प्रथमच महिला महापौर होणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील जनतेचे आभार मानले असून मतदारांनी विकासाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला साथ दिल्याचे म्हटले आहे.

लखनऊला 100 वर्षांत प्रथमच महिला महापौर

भाजपच्या या लाटेमध्ये संयुक्ता भाटिया यांनी लखनऊच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. गेल्या 100 वर्षांत पहिल्यांदाच लखनऊमध्ये महिला महापौर झाल्या आहेत. संयुक्ता भाटिया यांनी बसपाच्या बुलबुल गोडियाल आणि सपाच्या मीरा वर्धन व काँग्रेसच्या प्रेमा अवस्थी यांच्याशी थेट लढत देत विजय प्राप्त केला आहे. 1916 साली लखनऊ नगरपालिकेच्या स्थापनेपासून येथे महिलेला नगराध्यक्ष म्हणून संधी मिळालेली नव्हती. भाटिया आरएसएसची थेट संबंधित असून त्यांचे भाऊ लखनऊ कॅन्टोमेंट मतदार संघाचे आमदार आहेत. 2012 सालीही त्यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु ऐनवेळी भाजपने डॉ. दिनेश शर्मा यांना संधी दिली होती.

योगी आदित्यनाथांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

उत्तर प्रदेशसारख्या मोठय़ा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रचंड वादग्रस्त निर्णय घेतल्याने योगी आदित्यनाथांच्या नेतृत्वक्षमतेकडे सर्वांचे लक्ष होते. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका त्यांच्यासाठी परीक्षाच होती. मात्र 16 पैकी 14 जागी भाजपने बाजी मारल्याने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. तथापि गोरखपूर येथील योगीच्या वॉर्डामध्ये अपक्ष उमेदवार नादिरा खातून यांनी भाजप उमेदवार माया त्रिपाठी यांचा पराभव केला आहे. खातून यांनी मात्र आपण योगीबाबाजींचे शेजारी आहोत. त्यांच्याच कृपेने निवडणूक आल्याचा दावा केला आहे.

 देशात पुन्हा विकासच जिंकला : पंतप्रधान मोदी

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांना ‘विकासा’वरुन जोरदार टिकेचा सामना करावा लागत होता. विकास वेडा झाला आहे, यापासून अनेक प्रकारे खिल्ली उडवली जात होती. परंतु उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीनंतर मात्र त्यांनी ‘देशात पुन्हा विकासच जिंकला’, अशी मार्मिक टिप्पण्णी केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे अभिनंदन करत आता जनतेच्या खऱया विकासासाठी वेगाने कामाला लागावे, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

काँग्रेसचा सफाया, अमेठीतच पराभव

लोकसभा, विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसची पराभवाची मालिका स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्येही कायम राहिली आहे. दस्तुरखुद्द काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठीतही काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. येथे नगरपालिकेच्या दोन आणि नगरपंचायतीच्या दोनही जागा गमवाव्या लागल्या आहेत. यामुळे राहुल यांना मोठय़ा टिकेला आणि उपहासाला सामोरे जावे लागत आहे. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर टिका करताना आपल्याच मतदार संघात आपल्याच उमेदवारांना विजयी करु शकत नाहीत ते गुजरातमध्ये विजयाची अपेक्षा कशी करु शकतात ? असा प्रश्न करत राहुल यांच्या क्षमतेची खिल्ली उडवली आहे. तर स्मृती इराणी यांनीही टिका करताना राहुल यांना त्यांच्याच मतदारांनी ठोकरले असल्याचे म्हटले आहे.

Related posts: