|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ओक्खी चक्रीवादळाचा धोका वाढला

ओक्खी चक्रीवादळाचा धोका वाढला 

तामिळनाडू-केरळात पर्जन्यवृष्टी : पडझडीमुळे रस्ते-रेल्वेसेवा विस्कळीत

चेन्नई / वृत्तसंस्था

भारताच्या दक्षिण किनारपट्टीला ओक्खी चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. या चक्रीवादळामुळे केरळ-तामिळनाडूमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून बऱयाच भागात हाहाकार निर्माण झाला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये 12 जणांना जीव गमवावा लागला आहे. या वादळामुळे धोका वाढला असून पुढील 24 तासात ओक्खी चक्रीवादळ लक्षद्वीपच्या दिशेने सरकरणार आहे. या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये सावधगिरीचा आदेश देण्यात आला आहे.

ओक्खी चक्रीवादळ गुरुवारपासून दक्षिणेकडील समुद्रात घोंगावत आहे. या चक्रीवादळापासून दक्षिण तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीपला सर्वाधिक धोका आहे. बदलत्या वाऱयांमुळे निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा गुरुवारी अधिकच तीव्र झाला. त्यानंतर आता त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. शुक्रवारी तामिळनाडू-केरळात वादळी वाऱयांबरोबरच मुसळधार पाऊसही झाला. या पावसामुळे बऱयाच ठिकाणी पडझड झाली आहे. तसेच चक्रीवादळामुळे आणखी पडझड होण्याचा धोकाही आहे. पडझडीमुळे रस्ते आणि रेल्वेसेवाही विस्कळीत झाली आहे. वादळाचा फटका बसलेल्या भागात रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे एनडीआरएफ आणि आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोची आणि लक्षद्वीप बेटावर मदतकार्यासाठी दोन विशेष नौका तैनात करण्यात आल्या आहेत. सावधगिरीच्या उपाययोजना म्हणून किनारपट्टी भागातील शाळा-महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली आहे. तसेच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

Related posts: